Ind vs Pak, CWC 2023: भारताची विजयी परंपरा कायम! पाकिस्तान संघाला पराभवाची धूळ चारत केली विजयाची हॅटट्रिक

हा सामना बघायला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर तब्बल सव्वा लाख प्रेक्षक उपस्थित होते.
Ind vs Pak, CWC 2023: भारताची विजयी परंपरा कायम! पाकिस्तान संघाला पराभवाची धूळ चारत केली विजयाची हॅटट्रिक

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपारिक स्पर्धकांचा सामना पार पडला. हा सामना बघायला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर तब्बल सव्वा लाख प्रेक्षक उपस्थित होते. भारतीय संघाने या सामन्यात अक्षरश: पाकिस्तानी संघाला झोडपून काढलं आहे. १५५ वर २ बाद असताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९१वर तंबूत परतला. यानंतर भारतीय फलंदाजांना हे लक्ष सहज पार केले. यासोबतच भारताने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत हॅट्रिक साजरी केली आहे. कर्णधार रोहित शर्माचं शतक या सामन्यात थोडक्यात हुकलं. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धची विजयाची मालिका 8-0अशी कायम ठेवली आहे.

यंदाच्या विश्वचषकातील पदार्पणाचा सामना खेळताना शुबमन गिलने धमाकेदार सुरुवात केली. हसन अलीच्या षटकात त्याने ३ चौकार खेचून पाकिस्तानी गोलंदाजांना दडपणात आणलं. मात्र, शाहिन आफ्रिदीच्या तिसऱ्या षटकात तो बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पाकिस्तानला चोप दिला. रोहितने आज षटकांचा पाऊस पाडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० षटकार ठोकणारा जगातील तिसरा आणि भारतातील पहिला फलंदाज ठरला. दरम्यान, रोहित आणि विराटच्या ५६ धावांच्या भागीदारीला हसन अलीने सुरुंग लावला. विराट कोहली हा १६ धावांवर झेलबाद झाला. रोहितने मात्र धुलाई सुरुच ठेवली. रोहितने ३६ चेंडूत अर्धशतक झळकावलं. रोहितने ६३चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८६ धावा केल्या. श्रेयश ५३ धावांवर नाबाद राहिला, तर लोकेशनेही १९ धावा ठोकल्या.

तत्पूर्वी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, हार्दीक पांड्या, रविंद्र जडेजा व सिराज यांनी प्रत्येकी विकेट्स घेताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९१ धावांत तंबूत पाठवला. अब्दुल्लाह शफीक २० धावांवर तर इमाम-उल-हक हा ३६ माघारी परतले. यानंतर बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी ८३ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण सिराजने बाबर आझमचा त्रिफळा उडवून सामन्यावर पकड मजबूत केली. सौद शकील ६ धावा आणि इफ्तिखार अहमद ४ धावांवर कुलदीपने माघारी पाठवले. यानंतर जसप्रीत बुमराहने रिझवानचा ४९ धावांवर त्रिफळा उडवून अवघ्या २ धावांत शादाब खानचीही दांडी गुल करत १५५ वर दोन बाद असेला पाकिस्तान संघाला १९१ वर रोखत तंबूत पाठवला.

logo
marathi.freepressjournal.in