IND vs PAK, ICC World Cup 2023 :  अहमदाबादच्या रणभूमीत आज भारत-पाकिस्तान आमनेसामने

IND vs PAK, ICC World Cup 2023 : अहमदाबादच्या रणभूमीत आज भारत-पाकिस्तान आमनेसामने

पावसाचा या लढतीवर प्रभाव राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अहमदाबाद : वर्षाचे महिने, महिन्यातील आठवडे, आठवड्यातील दिवस, दिवसातील तास, तासातील मिनिटे आणि मिनिटाचे सेकंद उलटले; तरी गेल्या ७६ वर्षांपासून भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढतीचे औत्सुक्य टिकून आहे. गेल्या काही वर्षांत राजनैतिक संबंध बिघडल्यामुळे उभय संघांतील सामन्यांची संख्या रोडावली आहे. मात्र शनिवारी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. पावसाचा या लढतीवर प्रभाव राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकदिवसीय विश्वचषकात भारताने पाकिस्तानवर नेहमीच वर्चस्व गाजवले आहे. १९९२ ते २०१९ पर्यंतच्या सात विश्वचषकात भारताने त्यांच्यावर विजय मिळवला आहे. आता या पारंपरिक द्वंद्वातील आठव्या अंकातही बाजी मारून रोहित शर्माचे भारतीय शिलेदार यंदाच्या विश्वचषकातील सलग तिसरा सामना जिंकतील, असे अपेक्षित आहे. भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून सरशी साधली, तर दुसऱ्या लढतीत अफगाणिस्तानचा ८ गडी राखून धुव्वा उडवला.

दुसरीकडे बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघानेही सलग दोन विजयांची नोंद करून स्पर्धेची धडाक्यात सुरुवात केली आहे. त्यांनी सर्वप्रथम नेदरलँड्सला नेस्तनाबूत केले. मग श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत विश्वविक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना दमदार विजय नोंदवला. भारताची फलंदाजी विरुद्ध पाकिस्तानची गोलंदाजी यांच्यातील द्वंद्वाकडे चाहते लक्ष ठेवून असून या लढतीसाठी असंख्य तारांकित मंडळीही उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in