IND vs SA 1st T20I : हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह परतणार अन् 'शतक' साकारणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात भारताचे स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांच्यावर विशेष लक्ष असणार आहे.
IND vs SA 1st T20I : हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह परतणार अन् 'शतक' साकारणार?
Published on

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात भारताचे स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांच्यावर विशेष लक्ष असणार आहे. या सामन्यात दोघांकडेही अनोखं 'शतक' साजरं करण्याची संधी असणार आहे.

३२ वर्षीय अष्टपैलू हार्दिक पांड्या अडीच महिन्यांनी भारतीय संघात परतणार आहे. हार्दिक सप्टेंबरमध्ये आशिया चषक स्पर्धेत जायबंदी झाला होता. बंगळुरू येथे हार्दिकने तंदुरुस्ती सिद्ध केली. मग मुश्ताक अली स्पर्धेत पंजाबविरुद्ध ४२ चेंडूंत नाबाद ७७ धावा फटकावून बडोद्याला २०० धावांचे लक्ष्य पार करून दिले आणि फॉर्म कायम असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर आता तो संघात पुनरागमनासाठी सज्ज आहे. तसेच, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील या मालिकेद्वारे संघात परतत आहे. बुमराह आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला होता, मात्र एकदिवसीय मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली होती.

दोघांनाही खुणावतोय 'रेकॉर्ड'

बुमराहला टी-२० कारकीर्दीतील १०० बळींचा टप्पा गाठण्यासाठी १ विकेटची गरज आहे, तर हार्दिकला बळींच्या शतकासाठी २ विकेट्स हव्या आहेत. त्यामुळे दोघांनाही या मालिकेत शतकाची संधी आहे. हार्दिकने १२० सामन्यांमध्ये १०८ डावांमध्ये २६.५८ च्या सरासरीने ९८ विकेट्स घेतल्या आहेत. आणखी दोन विकेट्स घेतल्यास, पांड्या क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकारात १०० विकेट्स पूर्ण करेल. तर, बुमराहने आतापर्यंत ८० टी-२० सामन्यांमध्ये ९९ बळी घेतले आहेत. त्याची सरासरी १८.११ आणि सर्वोत्तम आकडेवारी ७ धावांत ३ बळी आहे. भारतासाठी सर्वाधिक टी२० बळींचा विक्रम अर्शदीप सिंग (१०५) याच्या नावावर आहे.

मार्करमच्या नेतृत्वात आफ्रिका सज्ज

२०२४च्या टी-२० विश्वचषकातील अंतिम फेरीनंतर प्रथमच भारत-आफ्रिका यांच्यात एखादी टी-२० लढत होणार आहे. त्यावेळीही एडीन मार्करम आफ्रिकेचा कर्णधार होता. आता मार्करमच्या नेतृत्वात हा संघ पुन्हा एकदा भारताला कडवी झुंज देण्यास उत्सुक आहे. २०१५मध्ये आफ्रिकेने भारतात अखेरची टी-२० मालिका जिंकली होती. डेवाल्ड ब्रेविस, कॉर्बिन बोश, क्विंटन डीकॉक, ट्रिस्टन स्टब्स असे फलंदाज आफ्रिकेच्या ताफ्यात आहेत. शिवाय गोलंदाजीत मार्को यान्सेन लयीत असून आनरिख नॉर्किएसुद्धा दीड वर्षांनी संघात परतला आहे. फिरकी विभागाची धुरा केशव महाराजकडे असेल. रायन रिकल्टन व नांद्रे बर्गर मात्र या संघाचा भाग नाहीत.

फलंदाजीच्या क्रमाची उत्सुकता

भारतीय संघात फक्त अभिषेक शर्मा व गिल यांचे स्थान सलामीला पक्के मानले जात आहे. तिसऱ्या ते सहाव्या क्रमांकापर्यंत कोणता फलंदाज कोणत्या स्थानी येईल, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे या मालिकेत तरी भारतीय संघ ठराविक फलंदाजी क्रमानुसार जाणार का, हे पाहणे रंजक ठरेल. सूर्यकुमार, तिलक वर्मा, हार्दिक, शिवम दुबे, अक्षर अशी फलंदाजी भारताच्या ताफ्यात आहे. यष्टिरक्षकासाठी संजू सॅमसन व जितेश शर्मा यांच्यात चुरस आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत जितेशला संधी देण्यात आली होती. तिलकला आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्दीतील १००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी ४ धावांची, तर सॅमसनला ५ धावांची गरज आहे. गोलंदाजी बुमराच्या साथीने हर्षित राणा किंवा अर्शदीप सिंगपैकी एकाला संधी मिळेल. कुलदीप यादव व वरुण चक्रवर्ती यांची फिरकी जोडी एकत्रित खेळल्यास आफ्रिकेला धावा करणे कठीण जाऊ शकते.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर.

दक्षिण आफ्रिका : एडीन मार्करम (कर्णधार), ओटनिल बार्टमन, कॉर्बिन बोश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डीकॉक, डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, आनरिख नॉर्किए, ट्रिस्टन स्टब्स, लुथो सिपामला.

वेळ : सायंकाळी ७ वाजता; थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, २ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in