IND vs SA : भारताचे विजयी आघाडीचे लक्ष्य; दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आज दुसरा एकदिवसीय सामना; रोहित-विराटवर पुन्हा नजरा

के. एल. राहुलच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत-आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना बुधवारी रंगणार आहे.
IND vs SA : भारताचे विजयी आघाडीचे लक्ष्य; दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आज दुसरा एकदिवसीय सामना; रोहित-विराटवर पुन्हा नजरा
IND vs SA : भारताचे विजयी आघाडीचे लक्ष्य; दक्षिण आफ्रिकाविरुद्ध आज दुसरा एकदिवसीय सामना; रोहित-विराटवर पुन्हा नजराPhoto : X
Published on

रायपूर : के. एल. राहुलच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ बुधवारी दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत-आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना बुधवारी रंगणार आहे. साहजिकच या लढतीतही रोहित शर्मा आणि विराट कोहली या तारांकित जोडीच्याच कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल.

विराटचे शानदार ५२वे शतक आणि रोहितच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने रविवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आफ्रिकेचा १७ धावांनी पराभव केला. रांची येथे झालेल्या लढतीत भारताने दिलेल्या ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने अखेरच्या षटकापर्यंत कडवी झुंज दिली. मात्र ४९.२ षटकांत त्यांचा संघ ३३२ धावांत गारद झाला. त्यामुळे भारताने ३ लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता रायपूरमध्येही या दोघांच्या कामगिरीवर चाहत्यांचे विशेष लक्ष असेल.

दरम्यान, सध्या आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्यांनी कसोटी मालिकेत भारताला २-० अशी धूळ चारली. आता ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर उभय संघांत पाच टी-२० सामनेही होणार आहेत. एकदिवसीय मालिकेसाठी अनुभवी फलंदाज राहुलकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. शुभमन गिल व श्रेयस अय्यर हे नियमित कर्णधार व उपकर्णधार विविध दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकणार असल्याने राहुलवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मालिकेच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा ३८ वर्षीय रोहित व ३७ वर्षीय विराट यांना खेळताना पाहण्याची संधी मिळत आहे.

रोहितने सलग ३ सामन्यांत ५०हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या लढतीत अर्धशतक, तर तिसऱ्या सामन्यात शतक साकारले होते. दुसरीकडे विराटनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या लढतीत अर्धशतक झळकावल्यावर आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेची सुरुवात शतकाद्वारे केली. त्यामुळे या दोघांना एकत्रित खेळताना पाहून चाहतेही आनंदी आहेत. तसेच उर्वरित दोन सामन्यांतही रोहित-विराट टीकाकारांची तोंडे बंद करून एकदिवसीय संघातील स्थान असेच टिकवून ठेवतील, अशी अपेक्षा आहे.

२०२७च्या विश्वचषकापर्यंत दोघांचे संघातील स्थान टिकून राहणार की नाही, याविषयी आतापासूनच चर्चा सुरू आहे. तसेच काही संकेतस्थळ व वृत्तपत्रांनी दिलेल्या बातमीनुसार प्रशिक्षक गौतम गंभीर, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर व बीसीसीआयचे पदाधिकारी एकदिवसीय मालिकेनंतर रोहित-विराटविषयी बैठक करणार असल्याचे समजते. मात्र रोहित व विराट या दोघांनीही गेल्या दोन मालिकांमध्ये आपल्या बॅटद्वारे सर्वांना प्रत्युत्तर देतानाच निवृत्तीच्या अफवांना धुडकावून लावले आहे. रोहित-विराट आता टी-२० व कसोटीतून निवृत्त झाले असून फक्त एकदिवसीय प्रकारातच भारताचे प्रतिनिधित्व करतात.

ऋतुराज, यशस्वीकडून फलंदाजीत अपेक्षा

गिल व श्रेयसच्या अनुपस्थितीत संधी लाभलेल्या यशस्वी जैस्वाल व ऋतुराज गायकवाड या महाराष्ट्राच्या खेळाडूंना पहिल्या लढतीत छाप पाडता आली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून दुसऱ्या लढतीत चांगली फलंदाजी अपेक्षित आहे. रोहित-विराट यांची जोडी लयीत आहेच. पाचव्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदरला पाठवण्याचा प्रयोग भारतासाठी यशस्वी ठरणार का, हे पाहणे रंजक ठरेल. राहुलने कर्णधार तसेच यष्टिरक्षक म्हणून पहिल्या लढतीत चमक दाखवली. त्यामुळे त्याने पाचव्या स्थानी फलंदाजी करणे अधिक उपयुक्त ठरू शकते. रवींद्र जडेजा अखेरच्या षटकांत हाणामारी करू शकतो.

कुलदीप, हर्षितवर गोलंदाजीची भिस्त

पहिल्या सामन्यात दव येत असूनही चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने ४ बळी मिळवून विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला वेगवान गोलंदाज हर्षित राणाने ३ बळी घेत उत्तम साथ दिली. दुसऱ्या सामन्यातही नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरेल. अर्शदीप सिंग व प्रसिध कृष्णा यांना धावांवर अंकुश ठेवावा लागेल. तसेच सुंदर व जडेजा या फिरकी गोलंदाजांनाही धावांचा बचाव करताना टिच्चून मारा करावा लागेल. भारताची प्रथम फलंदाजी आल्यास पुन्हा एकदा ३००हून अधिक धावांचा डोंगर पाहायला मिळू शकतो.

बव्हुमाचे पुनरागमन; आफ्रिकाला गोलंदाजीची चिंता

आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बव्हुमा या लढतीसाठी परतणार आहे. गेल्या लढतीत आफ्रिकेने १५ धावांतच ३ फलंदाज गमावले. त्यामुळे डीकॉक, रिकल्टन, मार्करम यांना कामगिरी सुधारावी लागणार आहे. मात्र त्यांची फलंदाजी आठव्या क्रमांकापर्यंत लांबलेली असल्याने आफ्रिकेने ३०० धावांचा पल्ला गाठाला. मार्को यान्सेन व कॉर्बिन बोश यांनी गोलंदाजीत धावा लुटल्या असल्या तरी फलंदाजीत अर्धशतके झळकावून भारताची भीती वाढवली आहे. फिरकीपटू केशव महाराजचा आफ्रिकेला उणीव जाणवली. तो दुसऱ्या लढतीसाठी परतल्यास आफ्रिकेची गोलंदाजी भक्कम होईल. नांद्रे बर्गरवर गोलंदाजीची मदार असेल. यान्सेन व बोश यांनी गोलंदाजीत कंजुशीने धावा दिल्या, तर आफ्रिकेला भारताला आणखी कडवी झुंज देईल.

खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज

  • रायपूर येथे आतापर्यंत फक्त एकच एकदिवसीय लढत झाली आहे. २०२३मध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यातील त्या लढतीत भारताने न्यूझीलंडला १०८ धावांत गुंडाळून ८ गडी राखत सहज विजय नोंदवला.

  • या लढतीवर पावसाचे सावट नसले तरी दवाचा परिणाम नक्कीच जाणवू शकतो. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ गोलंदाजी करण्यास प्राधान्य देईल.

logo
marathi.freepressjournal.in