मुल्लानपूर : भारतीय पुरुष क्रिकेट संघाने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-२० सामना जिंकल्यानंतर आता गुरुवारी होणाऱ्या दुसऱ्या लढतीतही ते आफ्रिकेला धूळ चारण्यास उत्सुक असतील. मात्र मुल्लानपूरच्या महाराज यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणाऱ्या या लढतीत कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिलच्या कामगिरीची चिंता भारताला सतावत आहे.
पुढील वर्षी मायदेशात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड चाचणी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. भारताला विश्वचषकापूर्वी आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांविरुद्ध मायदेशातच प्रत्येकी ५-५ टी-२० सामने खेळायचे आहेत. सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने पहिल्या सामन्यात आफ्रिकेचा १०१ धावांनी फडशा पाडला. हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे भारताने पाच लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता गुरुवारी मुल्लानपूर येथे प्रथमच पुरुषांचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना होईल. सप्टेंबरमध्ये येथे महिलांचे दोन एकदिवसीय सामने झाले होते. त्यामुळे सायंकाळच्या वेळेस टी-२० सामन्यांसाठी येथील खेळपट्टी व वातावरण कसे असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्यांनी कसोटी मालिकेत भारताला २-० अशी धूळ चारली होती. मात्र एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या तारांकित खेळाडूंच्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने आफ्रिकेला २-१ असे पराभूत केले. गिल व श्रेयस अय्यर हे नियमित कर्णधार व उपकर्णधार विविध दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकल्याने के. एल. राहुलवर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणात तसेच राहुलच्या नेतृत्वात भारताने उत्तम कामगिरी केली.
आता मोर्चा भारताच्या प्रामुख्याने युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या टी-२० मालिकेकडे वळेल. पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात भारतात टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यापूर्वी भारताला आफ्रिकेविरुद्ध ५, तर न्यूझीलंडविरुद्धही ५ टी-२० सामने खेळायचे आहेत. त्यामुळे मायदेशातील या १० लढतींद्वारे भारताला विश्वचषकासाठी आपले सर्वोत्तम १५ खेळाडू निवडण्याची संधी आहे. २०२४ मध्ये भारताने रोहितच्या नेतृत्वात आफ्रिकेला नमवूनच टी-२० विश्वचषक उंचावला होता. मात्र आता रोहित, विराट हे टी-२० संघाचा भाग नसल्याने भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने सप्टेंबरमध्ये आशिया चषकाचे जेतेपद मिळवले. मग ऑस्ट्रेलियात जाऊन त्यांनाही टी-२० मालिकेमध्ये नमवले. भारताने २०२४च्या विश्वचषकानंतर अद्याप एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. गेल्या २७ टी-२० सामन्यांपैकी फक्त ४ लढतींमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे.
मात्र ३५ वर्षीय सूर्यकुमारला गेल्या वर्षभरात एकही आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक झळकावता आलेले नाही. तसेच गेल्या ३३ पैकी १५ डावांत तो एकेरी धावसंख्येतच बाद झाला आहे. पहिल्या सामन्यातही सूर्या १२ धावा काढून बाद झाला. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर अनुभवी खेळाडू म्हणून सूर्याने जबाबदारी घेत कामगिरी उंचावण्याची गरज आहे. सूर्याप्रमाणेच २६ वर्षीय गिलही संघर्ष करताना दिसत आहे. मानेच्या दुखापतीतून सावरत परतेलेला गिल पहिल्या लढतीत ४ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ टी-२० सामन्यांतही त्याला अर्धशतक साकारता आले नव्हते. संघातील वाढत्या स्पर्धेमुळे या दोघांवरही कामगिरीत सुधारणा करण्याचे नक्कीच दडपण असेल.
हार्दिक लयीत; तिलक, अभिषेकवर लक्ष
प्रशिक्षक गौतम गंभीरने मागेच टी-२० संघातील फलंदाजीचा क्रम सातत्याने बदलत राहील, असे स्पष्ट केले आहे. मात्र सलामीवीर अभिषेक शर्माचे स्थान पक्के आहे. अभिषेक आशिया चषकात सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. आता पहिल्या सामन्यातील अपयश पुसून काढत पुन्हा एकदा अभिषेक छाप पाडण्यास आतुर असेल. तसेच तिलक वर्माही धावगती उंचावण्यात अपयशी ठरत आहे. हार्दिकने २८ चेंडूंत नाबाद ५९ धावा फटकावून त्याचे महत्त्व सिद्ध केले. त्यामुळे त्याच्याकडून पुन्हा एकदा फटकेबाजी अपेक्षित आहे. गोलंदाजी भारताची ताकद असून जसप्रीत बुमरा व अर्शदीप सिंग यांची वेगवान जोडी प्रभावी मारा करत आहे. तसेच फिरकीपटू वरुण चक्रवर्तीदेखील लयीत आहे. अक्षर पटेल व कुलदीप यादव यांच्यापैकी एकालाच संधी मिळत आहे. यष्टिरक्षक म्हणून जितेश शर्माला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र गिल किंवा तिलक यांची कामगिरी सुधारली नाही, तर संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. दव पुन्हा एकदा निर्णायक ठरणार असल्याने वेगवान गोलंदाजांची कामगिरी भारतासाठी मोलाची ठरेल.
आफ्रिकेला फलंदाजीत सुधारणा अपेक्षित
२०२४च्या टी-२० विश्वचषकातील अंतिम फेरीत आफ्रिकेला भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांची टी-२० प्रकारात कामगिरी ढासळत चालली आहे. पहिल्या सामन्यात आफ्रिकेचा संघ फक्त ७४ धावांत गारद झाला. त्यामुळे फलंदाजांकडून आफ्रिकेला कामगिरीत सुधारणे अपेक्षित आहे. विशेषत: कर्णधार एडीन मार्करम व क्विंटन डीकॉक या सलामी जोडीने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस असे फलंदाज आफ्रिकेकडे असले, तरी त्यांना भारताच्या दर्जेदार गोलंदाजांविरुद्ध आक्रमण करणे सोपे नसेल. २०१५मध्ये आफ्रिकेने भारतात अखेरची टी-२० मालिका जिंकली होती. गोलंदाजीत मार्को यान्सेन लयीत असून आनरिख नॉर्किएसुद्धा दीड वर्षांनी संघात परतला आहे. फिरकी विभागाची धुरा केशव महाराजकडे असेल. कॉर्बिन बोशला संधी मिळू शकते.