धरमशाला : फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (११ धावांत २ बळी), चायनामन कुलदीप यादव (१२ धावांत २ बळी) आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (१३ धावांत २ बळी) या त्रिकुटाने रविवारी शानदार कामगिरी केली. त्यामुळे भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ गडी व २५ चेंडू राखून धूळ चारली.
धरमशाला येथील हिमाचल प्रदेश असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या या लढतीत आफ्रिकेला २० षटकांत ११७ धावांत गुंडाळल्यावर भारताने १५.५ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. अभिषेक शर्मा (१८ चेंडूंत ३५), तिलक वर्मा (नाबाद २६) व शिवम दुबे (नाबाद १०) यांनी फलंदाजीत चांगले योगदान दिले. त्यामुळे भारताने ५ लढतींच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. अर्शदीपला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. बुधवारी लखनौ येथे चौथी लढत खेळवण्यात येईल.
पुढील वर्षी मायदेशात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड चाचणी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. भारताला विश्वचषकापूर्वी आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांविरुद्ध मायदेशातच प्रत्येकी ५-५ टी-२० सामने खेळायचे आहेत. भारताने पहिल्या सामन्यात आफ्रिकेचा १०१ धावांनी फडशा पाडला. हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्यामुळे भारताने विजय मिळवला. मग दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने भारताला धूळ चारून बरोबरी साधली. त्यामुळे तिसऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
दरम्यान, आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्यांनी कसोटी मालिकेत भारताला २-० अशी धूळ चारली होती. मात्र एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या तारांकित खेळाडूंच्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने आफ्रिकेला २-१ असे पराभूत केले. गिल व श्रेयस अय्यर हे नियमित कर्णधार व उपकर्णधार विविध दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेला मुकल्याने के. एल. राहुलवर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणात तसेच राहुलच्या नेतृत्वात भारताने उत्तम कामगिरी केली. आता मोर्चा भारताच्या प्रामुख्याने युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या टी-२० मालिकेकडे वळला आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात भारतात टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे.
दरम्यान, तिसऱ्या लढतीत भारतीय गोलंदाजांपुढे आफ्रिकेचा निभाव लागला नाही. अर्शदीपने रीझा हेंड्रिक्स (०) व कर्णधार एडीन मार्करम (६१) यांचे निर्णायक बळी मिळवले, तर वरुणने डोनोवन फरेरा (२०) व मार्को यान्सेनला (२) जाळ्यात अडकवले. हर्षित राणाने क्विंटन डीकॉक (१) व डेवाल्ड ब्रेविस (२) यांचे मोलाचे बळी मिळवले. मार्करमनेच ६ चौकार व २ षटकारांसह एकाकी झुंज दिली.
मग लक्ष्यचा पाठलाग करताना शुभमन गिल व कर्णधार सूर्यकुमार यांच्यावर नजर होती. मात्र गिल २८ चेंडूंत २८, तर सूर्यकुमार ११ चेंडूंत १२ धावांवर बाद झाला. अभिषेकने १८ चेंडूंत ३५ धावा फटकावून संघाची धावगती वाढवली. अखेरीस तिलक व दुबे यांनी १६व्या षटकात भारताचा विजय साकारला.
संक्षिप्त धावफलक
भारत : १५.५ षटकांत ३ बाद १२० (अभिषेक शर्मा ३५, तिलक वर्मा नाबाद २६, शुभमन गिल २८; कॉर्बिन बोश १/१८)
दक्षिण आफ्रिका : २० षटकांत सर्व बाद ११७ (एडीन मार्करम ६१, डोनोवन फरेरा २०; अर्शदीप सिंग २/१३, वरुण चक्रवर्ती २/११) पराभूत वि.
सामनावीर : अर्शदीप सिंग