अहमदाबाद : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचवा टी-२० सामना खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ असा आघाडीवर असल्याने शुक्रवारी त्यांना मालिका विजयाची उत्तम संधी आहे, तर आफ्रिका मालिका बरोबरीत सोडवण्यासह दौऱ्याचा शेवट गोड करण्यास उत्सुक असेल.
पुढील वर्षी मायदेशात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड चाचणी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. भारताला विश्वचषकापूर्वी आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांविरुद्ध मायदेशातच प्रत्येकी ५-५ टी-२० सामने खेळायचे आहेत. त्याद्वारे विश्वचषकासाठी कशाप्रकारे संघरचना असावी, याची भारताला कल्पना येईल. आफ्रिकेविरुद्ध मालिकेत भारताने पहिल्या सामन्यात १०१ धावांनी त्यांचा फडशा पाडला. मग दुसऱ्या लढतीत आफ्रिकेने भारताला धूळ चारली. तिसऱ्या लढतीत गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारताने पुन्हा आफ्रिकेवर वर्चस्व गाजवले. लखनऊ येथील चौथा सामना धुक्यामुळे रद्द झाला. त्यामुळे भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी टिकवली आहे. आफ्रिकेकडे पाचवी लढत जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे, तर भारत २०२४च्या टी-२० विश्वचषकापासून सुरू असेलली मालिका विजयाची परंपरा कायम राखण्यास आतुर आहे.
दरम्यान, आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. त्यांनी कसोटी मालिकेत भारताला २-० अशी धूळ चारली होती. मात्र एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या तारांकित खेळाडूंच्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने आफ्रिकेला २-१ असे पराभूत केले. मग मोर्चा टी-२० मालिकेकडे वळला. २०२४ मध्ये भारताने रोहितच्या नेतृत्वात आफ्रिकेला नमवूनच टी-२० विश्वचषक उंचावला होता. मात्र आता रोहित, विराट हे टी-२० संघाचा भाग नसल्याने भारतापुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान असेल. सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने सप्टेंबरमध्ये आशिया चषकाचे जेतेपद मिळवले. मग ऑस्ट्रेलियात जाऊन त्यांनाही टी-२० मालिकेमध्ये नमवले. भारताने २०२४च्या विश्वचषकानंतर अद्याप एकही टी-२० मालिका गमावलेली नाही. गेल्या ३० टी-२० सामन्यांपैकी फक्त ५ लढतींमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे.
भारताला मात्र अखेरच्या लढतीतही कर्णधार सूर्यकुमारच्या कामगिरीची चिंता सतावत आहे. ३५ वर्षीय सूर्यकुमारला गेल्या वर्षभरात एकही आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक झळकावता आलेले नाही. तसेच गेल्या ३३ पैकी १५ डावांत तो एकेरी धावसंख्येतच बाद झाला आहे. सूर्याप्रमाणेच २६ वर्षीय गिलही संघर्ष करताना दिसत आहे. तसेच सरावात पायाला दुखापत झाल्याने तो पाचव्या लढतीला मुकण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ टी-२० सामन्यांतही त्याला अर्धशतक साकारता आले नव्हते.
बुमरा परतणार, सॅमसन प्रतीक्षेत
प्रशिक्षक गौतम गंभीरने मागेच टी-२० संघातील फलंदाजीचा क्रम सातत्याने बदलत राहील, असे स्पष्ट केले आहे. मात्र सलामीवीर अभिषेक शर्माचे स्थान पक्के आहे. अभिषेक आशिया चषकात सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. तसेच गिल पाचव्या लढतीसाठी उपलब्ध नसला, तर संजू सॅमसनला संधी मिळू शकते. अनेकांच्या मते सॅमसन व अभिषेकच सलामीला योग्य आहेत. मधल्या फळीत तिलक वर्मा व हार्दिक पंड्या छाप पाडत आहेत. मात्र सूर्यकुमारच्या कामगिरीवर लक्ष असेल. तसेच शिवम दुबे, जितेश शर्मा यांच्याकडून अखेरच्या षटकांत हाणामारी अपेक्षित आहे. गोलंदाजी भारताची ताकद असून जसप्रीत बुमरा या लढतीसाठी संघात परतणार आहे. त्याने वैयक्तिक कारणास्तव तिसऱ्या लढतीतून माघार घेतली होती. त्याशिवाय अर्शदीप सिंग व फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांनी सातत्याने चमक दाखवली आहे. कुलदीप यादवला संघ व्यवस्थापन संधी देण्यात अपयशी ठरत आहे. अक्षर पटेलच्या जागी भारतीय संघ कुणाला संधी देणार, हे पाहणे रंजक ठरेल. तसेच दव पुन्हा एकदा निर्णायक ठरणार असल्याने वेगवान गोलंदाजांची कामगिरी भारतासाठी मोलाची ठरेल.
आफ्रिकेला फलंदाजीत सुधारणा अपेक्षित
२०२४च्या टी-२० विश्वचषकातील अंतिम फेरीत आफ्रिकेला भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांची टी-२० प्रकारात कामगिरी ढासळत चालली आहे. पहिल्या सामन्यात आफ्रिकेचा संघ फक्त ७४ धावांत गारद झाला, तर तिसऱ्या सामन्यातही त्यांना भारताने ११७ धावांतच गुंडाळले. त्यामुळे फलंदाजांकडून आफ्रिकेला कामगिरीत सुधारणे अपेक्षित आहे. विशेषत: कर्णधार एडीन मार्करम व क्विंटन डीकॉक या सलामी जोडीने जबाबदारी घेणे गरजेचे आहे. डीकॉकने दुसऱ्या लढतीत अर्धशतक झळकावले. नंतर तो पुन्हा चाचपडताना दिसला. ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस असे फलंदाज आफ्रिकेकडे असले, तरी त्यांना भारताच्या दर्जेदार गोलंदाजांविरुद्ध आक्रमण करणे सोपे नसेल. २०१५मध्ये आफ्रिकेने भारतात अखेरची टी-२० मालिका जिंकली होती. गोलंदाजीत मार्को यान्सेन लयीत असून आनरिख नॉर्किएसुद्धा दीड वर्षांनी संघात परतला आहे. फिरकी विभागाची धुरा केशव महाराजकडे असेल.
उभय संघांत आतापर्यंत ३५ टी-२० सामने झाले असून भारताने त्यापैकी २०, तर दक्षिण आफ्रिकेने १३ लढती जिंकल्या आहेत. २ सामने रद्द करण्यात आले आहेत.
खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज
अहमदाबाद येथील वातावरण लखनाैपेक्षा नक्कीच उत्तम आहे. त्यामुळे येथे पूर्ण लढत होईल, असे अपेक्षित आहे. दवाचा येथे दुसऱ्या डावात फरक जाणवेल. त्यामुळे नाणेफेक पुन्हा निर्णायक ठरेल.
बुमरा या लढतीसाठी संघात परतणार असून अक्षर पटेल आजारी असल्याने संघाचा भाग नाही. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, संजू सॅमसन, जसप्रीत बुमरा, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाझ अहमद.
दक्षिण आफ्रिका : एडीन मार्करम (कर्णधार), ओटनिल बार्टमन, कॉर्बिन बोश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डीकॉक, डोनोवन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, आनरिख नॉर्किए, ट्रिस्टन स्टब्स, लुथो सिपामला.
वेळ : सायंकाळी ७ वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप