

कोलकाता : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात १४ नोव्हेंबरपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर कसोटी सामना रंगणार आहे. या कसोटीसाठी एका दिवसाचे तिकीट फक्त ६० रुपयांना म्हणजेच ३०० रुपयांत पाचही दिवसांचे तिकीट चाहत्यांना खरेदी करता येणार आहे.
२५ वर्षीय शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने जून ते ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली. भारताने इंग्लंडला २-२ असे बरोबरीत रोखले. आता त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ प्रथमच मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. २०२४मध्ये भारतात झालेल्या अखेरच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने आपल्याला ३-० अशी धूळ चारली होती. यावेळी मात्र चित्र बदलले असून आता गिलच्या नेतृत्वात भारत मायदेशात पहिली मालिका जिंकली. भारताने विंडीजला २-० असे नेस्तनाबूत केले.
रोहित शर्मा व विराट कोहली असे तारांकित खेळाडू निवृत्त झाल्यावर कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने एका दिवसाचे तिकीट फक्त ६० रुपयांना विकण्याचे ठरवले आहे. याबाबत त्यांनी रविवारी घोषणा केली. भारत-आफ्रिका यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. दुसरी कसोटी २२ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत गुवाहाटी येथे खेळवण्यात येईल. दुसऱ्या कसोटीचे तिकीट दर अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.
दरम्यान, भारतीय संघाने सप्टेंबरमध्ये दुबईत आशिया चषक टी-२० स्पर्धा विक्रमी नवव्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या मार्गक्रमण करत आहे. विंडीजला कसोटी मालिकेत धूळ चारल्यावर भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. गिलकडे एकदिवसीय संघाचे नेतृत्वही सोपवण्यात आले आहे. तसेच टी-२० संघाचा गिल उपकर्णधार आहे.