लखनौ : भारतीय पुरुष क्रिकेट संघाने बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथा टी-२० सामना खेळणार होता. मात्र धुक्यामुळे हा सामना रद्द झाला. त्यामुळे आता पाचव्या लढतीकडे सर्वंचे लक्ष असेल. शुक्रवारी ही लढत होईल.
उभय संघांतील या मालिकेत भारत २-१ असा आघाडीवर आहे. मात्र भारताला कर्णधार सूर्यकुमार यादव व उपकर्णधार शुभमन गिल यांच्या कामगिरीची चिंता सतावत आहे.
पुढील वर्षी मायदेशात रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड चाचणी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. भारताला विश्वचषकापूर्वी आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांविरुद्ध मायदेशातच प्रत्येकी ५-५ टी-२० सामने खेळायचे आहेत. सूर्यकुमारच्या नेतृत्वात भारताने पहिल्या सामन्यात आफ्रिकेचा १०१ धावांनी फडशा पाडला. मग दुसऱ्या लढतीत आफ्रिकेने भारताला धूळ चारली. तिसऱ्या लढतीत गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारताने पुन्हा आफ्रिकेवर वर्चस्व गाजवले.