IND vs SA: भारताचे टी-२० मालिकेवर ३-१ असे वर्चस्व

हार्दिक पंड्या (२५ चेंडूंत ६३ धावा), तिलक वर्मा (४२ चेंडूंत ७३ धावा) यांनी साकारलेल्या तुफानी अर्धशतकांना गोलंदाजांच्या कामगिरीची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारताने पाचव्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव केला.
भारताचे टी-२० मालिकेवर ३-१ असे वर्चस्व
भारताचे टी-२० मालिकेवर ३-१ असे वर्चस्व
Published on

अहमदाबाद : हार्दिक पंड्या (२५ चेंडूंत ६३ धावा), तिलक वर्मा (४२ चेंडूंत ७३ धावा) यांनी साकारलेल्या तुफानी अर्धशतकांना गोलंदाजांच्या कामगिरीची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारताने पाचव्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव केला. याबरोबरच भारताने मालिकेत ३-१ असे यश संपादन केले.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ५ बाद २३१ धावांचा डोंगर उभारला. शुभमन गिलच्या पायाला दुखापत झाल्यामुळे संजू सॅमसनला सलामीला संधी देण्यात आली. त्याने या संधीचा योग्य लाभ उचलला. अभिषेक शर्मा व सॅमसन यांनी ३४ चेंडूंत ६३ धावांची सलामी नोंदवली. अभिषेकने २१ चेंडूंत ३४, तर सॅमसनने २२ चेंडूंत ३७ धावा केल्या. या दोघांना माघारी पाठवल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादव (५) पुन्हा एकदा अपयशी ठरला.

मात्र ३ बाद ११५ अशा स्थितीत १३व्या षटकात हार्दिक व तिलकची जोडी जमली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १०५ धावांची घणाघाती भागीदारी रचली. हार्दिकने ५ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करताना १६ चेंडूंतच अर्धशतक साकारले. तर तिलकने १० चौकार व १ षटकारासह अर्धशतकी खेळी सजवली. त्यानंतर शिवम दुबेने ३ चेंडूंत १० धावा काढून भारताला २३१ धावांपर्यंत नेले.

लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेला भारताने २० षटकांत ८ बाद २०१ धावांत रोखले. क्विंटन डीकॉक (३५ चेंडूंत ६५) व डेवाल्ड ब्रेविस (३१) यांनी आफ्रिकेकडून कडवी झुंज दिली. मात्र कर्णधार एडीन मार्करमसह मधल्या फळीला छाप पाडता आली नाही. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने ४, तर जसप्रीत बुमराने २ बळी मिळवून भारताल्या विजयात मोलाचे योगदान दिले. आता जानेवारीत भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय व टी-२० मालिका खेळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in