कोलकाता : भारताचा कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे साई सुदर्शन किंवा नितीश रेड्डी या दोघांपैकी एकाचे संघातील पुनरागमन पक्के मानले जात आहे. सुदर्शनने मंगळवारी कसून सराव केला, तर नितीशला देखील भारत-अ संघ सोडून दुसऱ्या कसोटीसाठी गुवाहाटी येथे दाखल होण्याचे आदेश दिले आहेत.
कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या पहिल्या कसोटीत टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वात खेळणाऱ्या आफ्रिकेने भारतावर ३० धावांनी सरशी साधली. याबरोबरच आफ्रिकेने दोन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. शनिवार, २२ तारखेपासून गुवाहाटी येथे दुसरी कसोटी रंगणार आहे. मात्र पहिला सामना तिसऱ्या दिवशीच संपल्याने भारतीय संघाने पुढील दोन दिवस कोलकातामध्येच सराव करणे पसंत केले. बुधवारी भारतीय संघ गुवाहाटीला दाखल होणार आहे. मात्र पहिल्या कसोटीत फलंदाजी करताना मान लचकल्याने गिलला दुखापत झाली व तो दुसऱ्या कसोटीलाही मुकण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, गतवर्षी न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातच पत्कराव्या लागलेल्या कसोटी मालिका पराभवातून भारताने अद्याप बोध घेतला नसल्याचे पहिल्या कसोटीत स्पष्ट झाले. फिरकीला पूर्णपणे पोषक खेळपट्टी बनवण्याचा डाव भारताच्या अंगलट आला. कारण दक्षिण आफ्रिकेने १२४ धावांचा यशस्वी बचाव करताना भारतावर ३० धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. २०१० म्हणजे १५ वर्षांनी प्रथमच आफ्रिकेने भारताविरुद्ध भारतात एखादी कसोटी जिंकली, हे विशेष.
आफ्रिकेचा संघ हा जागतिक अजिंक्यपद विजेता असल्याने त्यांच्याविरुद्ध भारताचा कस लागेल, याचा अंदाज होता. या कसोटी मालिकेनंतर भारत-आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय व ५ लढतींची टी-२० मालिकासुद्धा रंगणार आहे. तूर्तास जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) दृष्टीने आफ्रिकेविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ जगज्जेत्या आफ्रिकेला कडवी झुंज देईल, अशी अपेक्षा होती. यानंतर भारताची पुढील कसोटी मालिका थेट जून २०२६ मध्ये असेल. मात्र सध्या भारताची डब्ल्यूटीसी गुणतालिकेत चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.
पुन्हा चार फिरकीपटू की परिपूर्ण फलंदाज?
वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत सुदर्शनने अर्धशतक झळकावले होते. तरीही त्याला आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी वगळण्यात आले. भारताने चार फिरकीपटूंना संघात स्थान देत तिसऱ्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदरला बढती दिली. त्यामुळे आता गिलच्या अनुपस्थितीत सुदर्शन जर परतला, तर तो कोणत्या स्थानी फलंदाजी करणार, हे पाहणे रंजक ठरेल.
गुवाहाटीची खेळपट्टी कोलकाताप्रमाणे पूर्णपणे फिरकीला पोषक नसेल, असे समजते. त्यामुळे अक्षर पटेल किंवा सुंदरपैकी एकाला वगळून संघ व्यवस्थापनामुळे नितीशचा समावेश करण्याचा पर्याय आहे. नितीशला पहिल्या कसोटीसाठी वगळून भारत-अ संघाकडून खेळण्याचे आदेश दिले होते. मात्र गिलच्या दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या कसोटीसाठी पुन्हा संघात बोलवण्यात आले आहे. फलंदाजी करण्यासह नितीश मध्यमगती गोलंदाजीही करतो.
आफ्रिकेचा संघ २०१९नंतर प्रथमच भारत दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी आला आहे. त्यावेळी भारताने त्यांना ३-० अशी धूळ चारली होती. गतवर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचे फलंदाज फिरकीविरुद्ध सपशेल अपयशी ठरले होते. त्यामुळे भारताला ०-३ असा व्हाइटवॉश पत्करावा लागला होता. आफ्रिकेच्या संघातही उत्तम असे फिरकीपटू आहेत. त्यांच्याविरुद्ध भारताचे फलंदाज कसे खेळणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून होते. गिलच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत भारताचे नेतृत्व करत होता. मात्र त्यालाही फारशी छाप पाडता आली नाही. आता गिल दुसऱ्या कसोटीला मुकल्यास पुन्हा पंतच कर्णधारपद भूषवेल, असे दिसते.