धरमशाला: टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होण्याआधी भारतीय संघाचे फक्त आठ टी-२० सामने शिल्लक राहिल्यामुळे आता प्रशिक्षक गौतम गंभीर याच्यासमोर संघबांधणीचे प्रमुख आव्हान असणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म तसेच उपकर्णधार शुभमन गिलचे संघातील डळमळीत झालेले स्थान यामुळे आता भारताच्या फलंदाजीची खरी कसोटी लागणार आहे. त्यामुळे संघातील स्थान भक्कम करण्यासाठी पुढील तीन टी-२० सामन्यांत गिलच्या कौशल्याची सत्त्वपरीक्षा लागणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना रविवारी धरमशाला येथे खेळवला जाणार आहे.
पहिला टी-२० सामना भारताने १०१ धावांनी सहज जिंकल्यानंतर आफ्रिकेनेही परतफेड करत दुसरी टी-२० लढत ५१ धावांनी खिशात घातली. मालिकेत १-१ अशी बरोबरी असताना महत्त्वपूर्ण आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस लागणार आहे. मात्र १० अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानात खेळताना, धरमशालाच्या एचपीसीएच्या स्टेडियमवर दोन्ही संघांची खरी कसोटी असेल. आनरिख नॉर्किया, मार्को यान्सेन, लुंगी एन्गिडी, ओटनील बार्टमन आणि लुसो सिपाम्ला या आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय खेळपट्ट्यांवर प्रभावी कामगिरी केली आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना साथ मिळणाऱ्या एचपीसीएच्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना धावा काढताना घाम गाळावा लागणार आहे. भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ समतोल वाटत आहे. क्विंटन डीकॉक, आयडेन मार्करम, डेवाल्ड ब्रेविस, डोनोव्हॅन फरेरा, डेव्हिड मिलर आणि मार्को यान्सेन अशी भक्कम फलंदाजीची फौज त्यांच्याकडे आहे.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खराब कामगिरी केल्यामुळे संजू सॅमसनला संघातील स्थान गमवावे लागले. त्याच्या जागी आता शुभमन गिलचा समावेश करण्यात आला असून टी-२० वर्ल्डकपसाठी संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला दमदार कामगिरी करावी लागणार आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात पटेलला वनडाऊन फलंदाजीस पाठवण्याच्या अक्षर संघव्यवस्थापनाच्या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे आता कर्णधार सूर्यकुमार यादव आपल्या नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.
शिवम दुबेला आठव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय अंगाशी आल्यामुळे आता फलंदाजीच्या क्रमाबद्दल संघ व्यवस्थापनाला विचार करावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर हुकूमत गाजवणारा फिरकीपटू कुलदीप यादव याला अंतिम संघात स्थान मिळत नाही. एकाच सामन्यात वरुण चक्रवर्ती आणि कुलदीपचा समावेश करण्यात अडचणी येत आहेत. कुलदीप संघात नसल्यामुळे हार्दिक पंड्याला जसप्रीत बुमराच्या साथीने गोलंदाजीची सुरुवात करावी लागत आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग या मालिकेत फारसा प्रभावी ठरलेला दिसत नाही.
गेल्या सामन्यात भारताला आफ्रिकेकडून ५१ धावांनी हार पत्करावी लागली. या वर्षातील गेल्या १७ सामन्यांत भारताचा हा तिसरा पराभव ठरला. तसेच नाणेफेक जिंकल्यानंतर सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ भारतावर जानेवारीनंतर उद्भवली.
टी-२० मध्ये बळींचे अर्धशतक पार करण्यासाठी वरुण चक्रवर्तीला फक्त एका विकेट्सची आवश्यकता आहे. वरुण चक्रवर्तीच्या १५.३८ सरासरीपेक्षा चांगली गोलंदाजी करण्याचा मान कुलदीप यादव, राशिद खान, अजंथा मेंडिस आणि इम्रान ताहिर यांनी मिळवला आहे.
टी-२० मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून ७६ बळी मिळवणाऱ्या कॅगिसो रबाडापेक्षा लुंगी एन्गिडी फक्त एका विकेट्सनी मागे आहे. तबरेझ शम्सीने आफ्रिकेकडून सर्वाधिक ८९ बळी मिळवले आहेत, एन्गिडी त्याच्या फक्त १३ विकेट्सनी मागे आहे.
खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक
धरमशाला येथे सध्या १० अंशांपेक्षा खालीही पारा घसरल्यामुळे उबदार थंडीत खेळताना भारतीय खेळाडूंची खरी परीक्षा लागेल. थंड वातावरणात खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना साथ मिळणार आहे. धरमशाला येथे खेळवण्यात आलेल्या गेल्या पाच टी-२० सामन्यांत दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने चार सामने जिंकले आहेत.