

रायपूर येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (दि.३) भारताला के एल राहुलच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ विकेटने पराभव पत्कारावा लागला. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पाच गडी बाद ३५८ धावा केल्या. परंतु, तरीही भारतावार नामुष्की ओढवली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने चार चेंडू शिल्लक असतानाच आरामात लक्ष्य गाठत भारताला पराभवाची धूळ चारली आणि मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. ३५८ धावांच्या मोठ्या धावसंख्येचा बचाव करण्यात अपयशी ठरल्यानंतर भारताचा कर्णधार के.एल राहुलने प्रतिक्रिया दिली आहे. ३५८ धावा करूनही भारताच्या पराभवाच्या कारणांचा पाढा त्याने वाचला.
"नाणेफेक गमावल्याबद्दल मी स्वतःला दोषी मारत मानतो."
सामन्यानंतर, पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये राहुलने भारताच्या पराभवाबाबत बोलताना, नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा होता, त्यामुळे नाणेफेक गमावल्याबद्दल मी स्वतःला दोषी मानतो असे म्हटले. पराभव पचवणे कठीण आहे का? यावर तो म्हणाला की, खरंतर नाही, दुसऱ्या डावात जितकं दव होतं, ते बघता गोलंदाजी करणे कठीण होते, पण पंचांनी चेंडू बदलून दिला हे चांगलं केलं. काही गोष्टी आम्ही मैदानात अधिक चांगल्याप्रकारे करू शकलो असतो.
मला माहित आहे की, ३५० धावा ही चांगली धावसंख्या आहे. पण अखेरच्या सामन्यानंतरही (पहिल्या वनडेनंतर) आपण अतिरिक्त २०–२५ धावा कशा जोडू शकतो, ज्यामुळे ओल्या चेंडूने गोलंदाजी करताना गोलंदाजांना थोडा आधार मिळेल, अशी आमच्यात चर्चा झाली होती. ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली यांच्यातील १९५ धावांच्या भागीदारीबद्दल बोलताना, "ऋतुने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते पाहून अप्रतिम वाटलं. विराटला आपण वारंवार अशा खेळी करताना पाहिलं आहे. तो फक्त आपलं काम करत राहतो. परंतु ऋतुला फलंदाजी करताना पाहून छान वाटलं, विशेषतः अर्धशतक गाठल्यानंतर त्याने ज्या पद्धतीने गती वाढवली, त्यामुळे आम्हाला मधल्या षटकांत अतिरिक्त २० धावा मिळाल्या, मात्र, खालच्या फळीतील खेळाडूंनी अजून धावा करायला हव्या होत्या, असे तो म्हणाला.