भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात रविवारी वनडे सिरीज मधील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. विजयासाठी श्रीलंकेने भारताला २४१ धावांचे आव्हान दिले होते, मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात टीम इंडिया अयशस्वी ठरली आणि अवघ्या २०८ धावांवर ऑल आउट झाली. या सामन्यादरम्यान भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीच्या विकेटवरून वाद पाहायला मिळाला. ज्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूला राग अनावर होऊन त्याने हेल्मेट आपटलं.
श्रीलंकेच्या कोलंबो शहरातील स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना टाय झाला. तर दुसरा सामना रविवार ४ ऑगस्ट रोजी पारपडला. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम बॉलिंगचे आव्हान दिले. यावेळी श्रीलंकेच्या बॅटर्सनी जबरदस्त खेळी करून २४० धावा केल्या आणि भारताला २४१ धावांचे आव्हान दिले होते. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची जोडी सलामीची उतरली, त्यांनी जवळपास ९७ धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर अक्षर पटेल (४४) वगळता टीम इंडियाचा इतर कोणताही बॅट्समन चांगली कामगिरी करू शकला नाही.
रोहित शर्माची विकेट गेल्यावर विराट कोहली मैदानात आला यावेळी त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती मात्र विराट तशी कामगिरी करू शकला नाही. विराटने श्रीलंकेविरुद्ध १४ धावांची खेळी केली. मात्र या खेळीदरम्यान विराटच्या विकेटवरून मैदानात श्रीलंकेचे खेळाडू आणि अंपायरमध्ये वाद पाहायला मिळाला. विराटने मैदानात उतरताच दोन चौकार मारले मात्र दुसरा चौकार मारल्यावर भलतंच घडलं. श्रीलंकेचा बॉलर अकिला धनंजया याने ओव्हरचा शेवटचा बॉल टाकला. या बॉलवर LBW ची अपील करण्यात आली तेव्हा फिल्ड अंपायरने विराटला बाद म्हणून घोषित केले, मात्र यावेळी विराटने रिव्ह्यू घेतला.
रिव्ह्यूमध्ये बॉल विराटच्या बॅट जवळून जाताना दिसला. तर स्नीकोमीटरमध्ये आवाज सुद्धा नोंदवण्यात आला. त्यामुळे बॉल हा बॅटला लागून मग पॅडला लागल्याचं सिद्ध झालं, ज्यामुळे थर्ड अंपायरला फिल्ड अंपायरचा निर्णय मागे घ्यावा लागला. ज्यावरून श्रीलंकेचे खेळाडू भलतेच चिडले. यावेळी श्रीलंकेचा हेड कोच सनथ जयसूर्या ड्रेसिंग रूममधून थेट मैदानात आला आणि बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या अंपायरशी वाद घालू लागला. तर विकेटकीपर कुसल मेंडिसने सुद्धा रागात हेल्मेट आपटलं. श्रीलंकेचे खेळाडू या निर्णयावरून कोहली सोबत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते मात्र विराट त्यांच्याशी काही संवाद न करता हसताना दिसला. अखेर १९. ४ ओव्हरला विराट कोहलीची विकेट पडली. जेफ्री वँडरसे या बॉलरने त्याला LBW बाद केले.