IND vs SL: सलग दुसऱ्या विजयाचे ध्येय! जगज्जेत्या भारतीय महिलांची आज विशाखापट्टणम येथे श्रीलंकेशी गाठ

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय महिला संघ मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. विशाखापट्टणम येथील डॉ. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर भारत-श्रीलंका यांच्यातील दुसरी टी-२० लढत रंगणार आहे.
सलग दुसऱ्या विजयाचे ध्येय! जगज्जेत्या भारतीय महिलांची आज विशाखापट्टणम येथे श्रीलंकेशी गाठ
सलग दुसऱ्या विजयाचे ध्येय! जगज्जेत्या भारतीय महिलांची आज विशाखापट्टणम येथे श्रीलंकेशी गाठ(संग्रहित छायाचित्र)
Published on

विशाखापट्टणम : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय महिला संघ मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. विशाखापट्टणम येथील डॉ. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर भारत-श्रीलंका यांच्यातील दुसरी टी-२० लढत रंगणार आहे. भारताने रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला ८ गडी व ३२ चेंडू राखून धूळ चारली. त्यामुळे भारत पाच लढतींच्या मालिकेत १-० असा आघाडीवर आहे.

२ नोव्हेंबर रोजी विश्वचषक उंचावल्यानंतर भारतीय महिला संघ दीड महिना विश्रांतीवर होता. काही दिवसांपूर्वी बहुतांश खेळाडू एका खेळाडूच्या खासगी कार्यक्रमातही एकत्रित दिसले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महिला संघाची भेट घेत त्यांचे कौतुक केले. एकूणच महिला क्रिकेटसाठी आता चांगले दिवस आले असून हरमनप्रीतच्या संघाने केलेल्या कामगिरीमुळे असंख्य महिलांना प्रेरणा मिळाली आहे.

आता महिला संघ पुन्हा क्रिकेटकडे वळला आहे. श्रीलंकेविरुद्ध भारताचे २१ ते ३० डिसेंबर या कालावधीत पाच टी-२० सामने होणार आहेत. २१ व २३ तारखेला विशाखापट्टणम येथे, तर २६, २८ व ३० डिसेंबरच्या लढती तिरुवनंतपुरम येथे होतील. त्यानंतर ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलचे चौथे पर्व रंगणार आहे. मग भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. १५ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत हा दौरा असेल. त्यामध्ये ३ टी-२०, ३ एकदिवसीय व १ कसोटी सामन्याचा समावेश आहे.

विश्वचषकाचा भाग असलेल्या उमा छेत्री, राधा यादव यांना टी-२० संघात स्थान लाभलेले नाही. तसेच यास्तिका भाटियासुद्धा अद्याप दुखापतीतून सावरलेली नाही. १७ वर्षीय गुनालन कमलिनी आणि डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्मा यांचा भारताच्या टी-२० महिला संघात प्रथमच समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी वैष्णवीने पहिल्याच लढतीत पदार्पण करताना ४ षटकांत फक्त १६ धावा दिल्या. पुढील वर्षी महिलांची टी-२० विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार आहे. त्यामुळे आता महिला संघाचे लक्ष टी-२० सामन्यांवर अधिक असेल.

दरम्यान, पहिल्या लढतीत भारताने फलंदाजी व गोलंदाजीत छाप पाडली. मात्र क्षेत्ररक्षणात नक्कीच सुविधेला वाव आहे. भारताने पहिल्या सामन्यात तब्बल पाच झेल सोडले. त्यांपैकी तीन झेल अतिशय सोपे होते. विशाखापट्टणम येथे दव मोठ्या प्रमाणात येत असल्याने धावांचा पाठलाग करणे सोपे मानले जाते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल पुन्हा निर्णायक ठरेल.

स्मृती, हरमनप्रीतवर फलंदाजीची भिस्त

विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा करणारी स्मृती मानधना, हरमनप्रीत यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. तसेच पहिल्या लढतीत शानदार अर्धशतक झळकावणारी जेमिमा रॉड्रिग्ज पुन्हा छाप पाडण्यास आतुर असेल. भारताकडे दीप्ती शर्मा, अमनजोत कौर यांच्यामुळे आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी लांबलेली आहे. गोलंदाजीत फिरकीपटू श्री चरणी व वेगवान गोलंदाज क्रांती गौड भारताची ताकद आहेत. तसेच आयपीएलमध्ये कोणाकडूनही बोली न लागलेली वैष्णवी धावा कंजूसीने देण्यात पटाईत आहे.

अटापटू, रणवीराकडून श्रीलंकेला अपेक्षा

श्रीलंकेची कर्णधार चामरी अटापटू व अनुभवी गोलंदाज इनोका रणवीरा यांच्याकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकेचा महिला संघ सातत्याने संघर्ष करत आहे. त्यांना एकदिवसीय विश्वचषकातसुद्धा साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. किमान टी-२० प्रकारात ते कडवी झुंज देतील, अशी अपेक्षा आहे. विश्मी गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा असे प्रतिभावान फलंदाज श्रीलंकेकडे आहेत. मात्र एकंदर सांघिक कामगिरी उंचावण्यात ते अपयशी ठरत आहेत.

जेमिमाच्या अर्धशतकामुळे विजयारंभ

उभय संघांतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ८ गडी व ३२ चेंडू राखून धुव्वा उडवला. मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने ४४ चेंडूंत नाबाद ६९ धावा फटकावून सामनावीर किताब पटकावला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत ६ बाद १२१ धावा केल्या. क्रांती गौड, श्री चरणी व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला, तर ३ फलंदाज धावचीत झाले. मग शफाली वर्मा (९) स्वस्तात बाद झाल्यावर स्मृती मानधना (२५) व जेमिमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५४, तर जेमिमा व हरमनप्रीत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची अभेद्य भागीदारी रचली. जेमिमाने १० चौकारांसह टी-२० तील १४वे अर्धशतक साकारले. हरमनप्रीतने नाबाद १५ धावा केल्या. या दोघांनी मिळून १४.४ षटकांत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता मंगळवारी भारतीय संघ २-० अशी आघाडी घेण्यासाठी उत्सुक असेल.

उभय महिला संघांत आतापर्यंत २७ टी-२० सामने झाले असून भारताने त्यापैकी २१, तर श्रीलंकेने फक्त ५ लढती जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आलेला आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग, रिचा घोष, गुनालन कमलिनी, श्री चरणी, वैष्णवी शर्मा.

श्रीलंका : चामरी अटापटू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, इमेशा दुलानी, शशिनी गिम्हानी, विश्मी गुणरत्ने, कौशिनी नुथायगना, काव्या काविंदी, मालकी मदारा, निमाशा मीपागे, हसिनी परेरा, इनोका रनवीरा, रश्मिका सेवांदी, मालशा स्नेहानी, निलाशिका सिल्व्हा.

वेळ : सायंकाळी ७ वाजता

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in