IND vs WI Test : दुसऱ्या दिवसअखेर भारत ५ बाद ४४८ अशा भक्कम स्थितीत; २८६ धावांनी आघाडीवर; राहुल, जुरेल, जडेजाचा शतकी जलवा

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुक्रवारी अनुभवी के. एल. राहुल (१९७ चेंडूंत १०० धावा), युवा ध्रुव जुरेल (२१० चेंडूंत १२५ धावा) आणि डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजा (१७६ चेंडूंत नाबाद १०४ धावा) यांचा शतकी जलवा पाहायला मिळाला. त्यामुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीवर भक्कम पकड मिळवली आहे.
IND vs WI Test : दुसऱ्या दिवसअखेर भारत ५ बाद ४४८ अशा भक्कम स्थितीत; २८६ धावांनी आघाडीवर; राहुल, जुरेल, जडेजाचा शतकी जलवा
Published on

अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुक्रवारी अनुभवी के. एल. राहुल (१९७ चेंडूंत १०० धावा), युवा ध्रुव जुरेल (२१० चेंडूंत १२५ धावा) आणि डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजा (१७६ चेंडूंत नाबाद १०४ धावा) यांचा शतकी जलवा पाहायला मिळाला. त्यामुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीवर भक्कम पकड मिळवली आहे.

दुसऱ्या दिवसअखेर भारताने १२८ षटकांत ५ बाद ४४८ धावांपर्यंत मजल मारली असून पहिल्या डावात त्यांनी एकूण २८६ धावांची आघाडी मिळवली आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा शतकवीर जडेजाच्या साथीने वॉशिंग्टन सुंदर ९ धावांवर नाबाद होता. त्यामुळे भारतीय संघ तिसऱ्या दिवशी विंडीजच्या गोलंदाजांना आणखी किती काळ हैराण करणार, हे पाहणे रंजक ठरेल.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने दुबईत आशिया चषक टी-२० स्पर्धा विक्रमी नवव्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. आता शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ विंडीजशी कसोटी मालिकेत दोन हात करत आहे. भारताच्या कसोटी संघाचा भाग असलेले गिल, चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा व अष्टपैलू अक्षर पटेल हे आशिया चषक खेळून आता लगेचच कसोटीच्या आव्हानासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या शारिरीक तंदुरुस्तीचाही या मालिकेत कस लागेल. अनुक्रमे अहमदाबाद (२ ते ६ ऑक्टोबर) व दिल्ली (१० ते १४ ऑक्टोबर) येथे उभय संघांत दोन कसोटी सामने खेळवण्यात येतील.

गिलच्या नेतृत्वात भारताने जून ते ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली. भारताने इंग्लंडला २-२ असे बरोबरीत रोखले. गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ प्रथमच मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. २०२४मध्ये भारतात झालेल्या अखेरच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने आपल्याला ३-० अशी धूळ चारली होती. त्यांनतर ऑस्ट्रेलिया संघाकडून भारताला कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे भारताकडून यावेळी कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. वेस्ट इंडिजचा संघ रॉस्टन चेसच्या नेतृत्वात खेळत आहे.

दरम्यान, गुरुवारी लढतीच्या पहिल्या दिवशी भारताने वेस्ट इंडिजचा पहिला डाव १६२ धावांत गुंडाळला. मग दिवसअखेर त्यांनी २ बाद १२१ धावांपर्यंत मजल मारली होती. तेथून पुढे शुक्रवारी दुसऱ्या दिवसाला प्रारंभ करताना गिल व राहुल यांनी उत्तम सुरुवात केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचली. गिलने पाच चौकारांसह कसोटीतील आठवे अर्धशतक साकारले. चेसने ५० धावांवर गिलचा अडसर दूर केला. राहुलने मात्र कसोटीतील एकंदर ११वे, तर मायदेशातील दुसरे शतक साकारताना १२ चौकार लगावले. त्यामुळे उपहाराला भारताने ३ बाद २१८ धावांपर्यंत मजल मारली.

दुसऱ्या सत्रात राहुल व जुरेल यांची जोडी विंडीजला आणखी सतावणार, असे वाटले. मात्र जोमेल वॉरिकनने सत्रातील पहिल्याच षटकात राहुलला बाद केले. राहुलने १९७ चेंडूंत १०० धावा केल्या. तेथून मग जुरेल व जडेजाची जोडी जमली. या दोघांनी चहापानापर्यंत भारताला ४ बाद ३२६ अशी मजल मारून दिली. विशेषत: जडेजाने सुरुवातीच्या ३० धावात ३ षटकार लगावून आक्रमण केले. तिसऱ्या सत्रातही या दोघांनी एकेरी-दुहेरी धावांसह विंडीजवर वर्चस्व राखले.

११६व्या षटकात जुरेलने चेसला चौकार लगावून थाटात कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने जडेजाच्या साथीने पाचव्या विकेटसाठी २०६ धावांची भागीदारी रचून भारताची आघाडीसुद्धा २०० पलीकडे नेली. अखेरीस फिरकीपटू खॅरी पेरीने कारकीर्दीतील पहिला बळी मिळवताना जुरेलची खेळी संपुष्टात आणली. २४ वर्षीय जुरेलने १५ चौकार व ३ षटकारांसह १२५ धावा केल्या. जुरेलने आपले शतक भारतीय सैन्याला व वडिलांना समर्पित केले.

३६ वर्षीय जडेजाने मग सुंदरच्या साथीने किल्ला लढवला. ६ चौकार व ५ षटकारांसह त्याने कारकीर्दीतील सहावे शतक पूर्ण करून तलवारबाजीच्या शैलीत सेलिब्रेशन केले. मुख्य म्हणजे इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत जडेजाने सात वेळा ५० हून अधिक धावसंख्या केली होती. त्यामुळे कारकीर्दीतील अखेरच्या टप्प्यातही तो उत्तम योगदान देत आहे. सुंदर व जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी २४ धावांची भर घातली आहे. त्यामुळे या दोघांसह नितीश रेड्डी शनिवारी विंडीजच्या गोलंदाजांना घाम गाळायला लावणार, यात शंका नाही.

दरम्यान, माजी क्रिकेटपटू शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा टेगनारायण यांचा विंडीजच्या संघात समावेश करण्यात आला आहे. टेगनारायण हा २०२४मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरची कसोटी खेळला आहे. २९ वर्षीय टेगनारायणने १० कसोटींमध्ये १ शतकासह फक्त ५६० धावा केल्या आहेत. अनुभवी क्रेग ब्रेथवेटला मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध जुलैमध्ये झालेल्या मालिकेतील कामगिरीमुळे संघातून काढण्यात आले. दोन सामन्यांतील चार डावांत तो एकदाही १० पेक्षा अधिक धावा करू शकला नाही. त्याशिवाय शामर जोसेफ व अल्झारी जोसेफ दुखापतीमुळे मालिकेबाहेर गेल्याने विंडीजची गोलंदाजी कमकुवत वाटत आहे. अशा स्थितीत ते भारताला कसे आव्हान देणार, याकडे लक्ष असेल.

उभय संघांत आतापर्यंत १०० कसोटी सामने झाले आहेत. त्यांपैकी भारताने २३, तर विंडीजने ३० लढती जिंकल्या आहेत. ४७ लढती अनिर्णित आहेत. मात्र तूर्तास भारताचे पारडे जड आहे.

संक्षिप्त धावफलक

  • वेस्ट इंडिज (पहिला डाव) : सर्व बाद १६२

  • भारत (पहिला डाव) : १२८ षटकांत ५ बाद ४४८ (ध्रुव जुरेल १२५, रवींद्र जडेजा नाबाद १०४, के. एल. राहुल १००, शुभमन गिल ५०; रॉस्टन चेस २/९०)

logo
marathi.freepressjournal.in