IND vs WI : फॉलोऑननंतर विंडीजचा प्रतिकार! तिसऱ्या दिवसअखेर २ बाद १७३ धावा; पहिल्या डावात भारताच्या कुलदीपचे पाच बळी

चायनामन कुलदीप यादवने (८२ धावांत ५ बळी) पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना फिरकीच्या तालावर नाचवून त्यांच्यावर फॉलोऑन लादला. मात्र दुसऱ्या डावात जॉन कॅम्पबेल (१४५ चेंडूंत नाबाद ८७ धावा) आणि शाय होप (१०३ चेंडूंत नाबाद ६६ धावा) यांनी कडवा प्रतिकार केला. त्यामुळे भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी चौथ्या दिवसापर्यंत लांबली आहे.
IND vs WI : फॉलोऑननंतर विंडीजचा प्रतिकार! तिसऱ्या दिवसअखेर २ बाद १७३ धावा; पहिल्या डावात भारताच्या कुलदीपचे पाच बळी
Photo : X (windiescricket)
Published on

नवी दिल्ली : चायनामन कुलदीप यादवने (८२ धावांत ५ बळी) पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना फिरकीच्या तालावर नाचवून त्यांच्यावर फॉलोऑन लादला. मात्र दुसऱ्या डावात जॉन कॅम्पबेल (१४५ चेंडूंत नाबाद ८७ धावा) आणि शाय होप (१०३ चेंडूंत नाबाद ६६ धावा) यांनी कडवा प्रतिकार केला. त्यामुळे भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी चौथ्या दिवसापर्यंत लांबली आहे.

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (कोटला) सुरू असलेल्या या लढतीत रविवारच्या तिसऱ्या दिवसअखेर विंडीजने ४९ षटकांत २ बाद १७३ धावा केल्या असून दुसऱ्या डावात अद्याप ते ९७ धावांनी पिछाडीवर आहेत. कॅम्पबेल व होप अनुक्रमे ८७ व ६६ धावांवर नाबाद असून त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी रचली आहे. त्यामुळे चौथ्या दिवशी विंडीजचे फलंदाज भारताला आणखी सतावणार की भारतीय संघ सामन्यासह मालिकाही खिशात घालणार, हे पाहणे रंजक ठरेल.

भारतीय संघाने सप्टेंबरमध्ये दुबईत आशिया चषक टी-२० स्पर्धा विक्रमी नवव्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर आता २५ वर्षीय शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मायदेशात प्रथमच कसोटी मालिका खेळत आहे. भारताने विंडीजला पहिल्या कसोटीत एक डाव आणि १४० धावांच्या फरकाने धूळ चारून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ही लढत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रातच संपुष्टात आली. त्यामुळे विंडीजच्या फलंदाजांवरही टीका झाली, तर खेळपट्टीही गोलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे समोर आले. दुसरी कसोटी मात्र चौथ्या दिवसापर्यंत लांबली असून विंडीज भारताला चोख प्रत्युत्तर देत आहे.

दरम्यान, दुसऱ्या कसोटीत भारताने पहिला डाव ५ बाद ५१८ धावांवर घोषित केला होता. भारताकडून यशस्वी जैस्वाल व गिल यांनी शतके साकारली. मग दुसऱ्या दिवसअखेर विंडीजने पहिल्या डावात ४ बाद १४० धावा केल्या होत्या. तेथून पुढे रविवारी तिसऱ्या दिवसाला प्रारंभ करताना विंडीजचा पहिला डाव फिरकीपटूंपुढे ढेपाळला. ३० वर्षीय फिरकीपटू कुलदीपने कसोटीत पाचव्यांदा डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला.

कुलदीपने प्रथम होपचा (३६) अफलातून चेंडूवर त्रिफळा उडवला. मग त्याने टेव्हिन एमलाच (२१) व जस्टिन ग्रीव्ह्स (१७) यांना पायचीत पकडले. खॅरी पियर (२३), अँडरसन फिलिप (नाबाद २४) व जेडन सील्स (१३) या तळाच्या फलंदाजांनी काही काळ सतावले. मात्र जसप्रीत बुमराने पियरचा त्रिफळा उडवला, मोहम्मद सिराजने जोमेल वॉरिकनला (१) बाद केले. मग कुलदीपने सील्सला पायचीत पकडून बळींचे पंचक पूर्ण केले व विंडीजचा पहिला डाव ८१.५ षटकांत २४८ धावांत गुंडाळला. कुलदीपला रवींद्र जडेजाने ३ बळी घेत उत्तम साथ दिली.

पहिल्या डावात भारताने २७० धावांची आघाडी घेतल्यामुळे गिल व प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी विंडीजवर फॉलोऑन लादण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने टेगनारायण चंदरपॉलला १० धावांवर माघारी पाठवले, तर वॉशिंग्टन सुंदरने अलिक अथांझेचा (७) त्रिफळा उडवला. २ बाद ३५ अशी विंडीजची स्थिती असल्याने एकवेळ तिसऱ्या दिवशीच सामना संपणार व भारत डावाने विजय मिळवणार, असे वाटले.

मात्र तेथून ३२ वर्षीय कॅम्पबेल व ३१ वर्षीय होप या अनुभवी फलंदाजांची जोडी जमली. दोघांनी तिसरे सत्रसुद्धा पूर्ण खेळून काढले. कॅम्पबेलने ९ चौकार व २ षटकारांसह कसोटीतील चौथे अर्धशतक साकारले, तर होपने ८ चौकार व २ षटकारांसह सहाव्यांदा अर्धशतकाची वेस ओलांडली. दोघांनी भारतीय फिरकीपटूंचा समर्थपणे मुकाबला करून तिसऱ्या विकेटसाठी आतापर्यंत १३८ धावांची भर घातली आहे. मुख्य म्हणजे या दोघांच्या स्वरुपात प्रथमच विंडीजकडून या मालिकेत दोन अर्धशतके झळकावण्यात आली.

त्यामुळे चौथ्या दिवशीसुद्धा या जोडीसह विंडीजचे अन्य फलंदाज ९७ धावांची पिछाडी फिटवून भारतासमोर मोठे लक्ष्य उभे करण्यासाठी प्रयत्नशील असतील. तर दुसऱ्या डावात अद्याप बळी मिळवू न शकलेल्या कुलदीप-जडेजा या जोडीकडून भारताला चौथ्या दिवशी चमकदार कामगिरी अपेक्षित आहे.

दरम्यान, गिलच्या नेतृत्वात भारताने जून ते ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली. भारताने इंग्लंडला २-२ असे बरोबरीत रोखले. आता त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ प्रथमच मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. २०२४मध्ये भारतात झालेल्या अखेरच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने आपल्याला ३-० अशी धूळ चारली होती. यावेळी मात्र चित्र बदलले असून आता गिलच्या नेतृत्वात भारत मायदेशात पहिली मालिका जिंकण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे.

भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्वही गिलकडे सोपवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत गिल भारताचा कर्णधार असेल. तर रोहित शर्मा व विराट कोहली हे तारांकित फलंदाज प्रथमच गिलच्या नेतृत्वात खेळतील. त्यामुळे या मालिकेकडे सर्वांचे लक्ष असेल.

कुलदीपचे १५ कसोटींमध्ये ६५ बळी झाले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये डावखुरा मनगटी फिरकीपटू म्हणून सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांमध्ये कुलदीप अग्रस्थानी आहे. मुख्य म्हणजे २०१७मध्ये कसोटीत पदार्पण करूनही कुलदीपच्या वाट्याला ८ वर्षांत फक्त १५ कसोटी सामने आले आहेत.

अवघ्या १५व्या कसोटीत कुलदीपने पाचव्यांदा एका डावात ५ बळी मिळवले. डावखुऱ्या मनगटी फिरकीपटूंमध्ये अशी कामगिरी करणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थान मिळवताना त्याने इंग्लंडच्या जॉनी वार्डल (२८ कसोटींत) यांच्यावर सरशी साधली. पॉल ॲडम्स या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ५ बाद ५१८ (डाव घोषित)

वेस्ट इंडिज (पहिला डाव) : ८१.५ षटकांत सर्व बाद २४८ (अलिक अथांझे ४१, शाय होप ३६; कुलदीप यादव ५/८२, रवींद्र जडेजा ३/४६)

वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : ४९ षटकांत २ बाद १७३ (जॉन कॅम्पबेल नाबाद ८७, शाय होप नाबाद ६६; मोहम्मद सिराज १/१०)

logo
marathi.freepressjournal.in