
हरारे : रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांसारख्या अनुभवी त्रिमूर्तीने आंतरराष्ट्रीय टी-२० प्रकाराला अलविदा केल्यानंतर शनिवारी नव्या दमाच्या भारतीय संघाची मुहूर्तमेढ करण्याला प्रारंभ होईल. झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांची टी-२० मालिका शनिवारपासून सुरू होणार असून या मालिकेत शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताची युवा फळी कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.
रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गेल्या शनिवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळवले. अंतिम फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात केली. १७ वर्षांनी प्रथमच भारताने ही स्पर्धा जिंकली, तर २०१३ नंतर त्यांचे हे पहिलेच आयसीसी जेतेपद ठरले. भारताने या स्पर्धेत अखेरपर्यंत अपराजित राहून जगज्जेतेपद काबिज केले. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली भारताची ही अखेरची स्पर्धा होती. २०२१पासून भारताचे प्रशिक्षकपद स्वीकारणाऱ्या द्रविड यांना थाटात निरोप देण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. तसेच रोहित, विराट व जडेजा यांनीही टी-२० तून निवृत्ती पत्करल्यामुळे आता युवा पिढीला त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. भारतासाठी टी-२० विश्वचषकात खेळणारा एकही खेळाडू या मालिकेचा सध्या भाग नसल्याने पूर्णपणे नव्या चेहऱ्यांना चाहत्यांना पाहता येईल.
नव्या प्रशिक्षकाची नेमणूक अद्याप झालेली नसून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ या मालिकेत खेळणार आहे. २०२६मध्ये भारतात टी-२० विश्वचषक रंगणार असल्याने त्यादृष्टीने आतापासूनच भारताचे संघबांधणी करण्यावर लक्ष्य असेल. हरारे स्पोर्ट्स क्लबवर होणाऱ्या या लढतीत फलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.
अभिषेक सलामीला, ऋतुराज मधल्या फळीत
यशस्वीचा या संघात समावेश असला तरी तो अद्याप झिम्बाब्वेत दाखल झालेला नाही. त्यामुळे गिलच्या साथीने डावखुरा अभिषेक शर्मा सलामीला येणार आहे. गिल व अभिषेक पंजाबच्या रणजी संघासाठीही एकेकाळी सलामीला यायचे. अभिषेकने आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळताना लक्षवेधी कामगिरी केली. महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असून रियान पराग, ध्रुव जुरेल, जितेश शर्मा यांना संधी मिळू शकते.
आवेश, मुकेशवर गोलंदाजीची मदार
आवेश खान व मुकेश कुमार हीच या संघातील सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाजांची जोडी आहे. त्यांच्यासह तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून तुषार देशपांडे किंवा खलिल अहमदला संधी मिळू शकते. फिरकीपटू रवी बिश्नोई व वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर मधल्या फळीत धावा रोखण्याची जबाबदारी असेल. हर्षित राणाला लगेच पदार्पण मिळण्याची शक्यता कमी आहे.
सिकंदर, ब्लेसिंगवर झिम्बाब्वेची भिस्त
झिम्बाब्वेला टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात अपयश आल्यावर यंदा सर्व नव्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. क्रेग एर्व्हिन, सीन विल्यम्स, रायन बर्ल यांना संघात स्थान लाभलेले नाही. त्यामुळे कर्णधार सिकंदर रझा, वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझरबानी यांच्यावर या संघाची भिस्त असेल. या संघात बेल्जियममध्ये जन्मलेल्या अंतुम नक्वीचाही समावेश करण्यात आला आहे. ३८ वर्षीय रझा हा या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असून त्याने ८६ टी-२० सामन्यांत झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
६ - २
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ८ टी-२० सामन्यांपैकी भारताने ६, तर झिम्बाब्वेने २ लढती जिंकल्या आहेत. २०२२च्या टी-२० विश्वचषकानंतर प्रथमच उभय संघ आमनेसामने येणार आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
भारत : शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलिल अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा, हर्षित राणा.
झिम्बाब्वे : सिकंदर रझा (कर्णधार), अक्रम फरझ, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंदई, जोंगवे लूक, काया इनोसंट, मॅडीन क्लाइव्ह, मधवीरे वेस्ले, मरुमनी तदिवांशे, मसाकाद्झा, मावुटा ब्रँडन, मुझरबानी ब्लेसिंग, मेयर्स डिओन, अंतूम नक्वी, नगरावा रिचर्ड, शुंबा मिल्टन.
वेळ : दुपारी ४.३० वाजल्यापासून g थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप