IND W vs ENG W :हरमनप्रीत, शफालीकडून फलंदाजीत योगदान अपेक्षित; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे महिलांचे लक्ष्य

भारतीय महिला संघाला शुक्रवारी इंग्लंडमध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवण्याची संधी आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामना बुधवारी मँचेस्टर येथे रंगणार असून भारतीय संघ या मालिकेत २-१ असा आघाडीवर आहे. त्यामुळे बुधवारी लढत जिंकल्यास भारतीय महिलांना इंग्लंडमध्ये प्रथमच एखादी टी-२० मालिका जिंकता येईल. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सलामीवीर शफाली वर्मा या दोघांची बॅट तळपणे त्यासाठी आवश्यक आहे.
IND W vs ENG W :हरमनप्रीत, शफालीकडून फलंदाजीत योगदान अपेक्षित; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे महिलांचे लक्ष्य
Photo : X
Published on

लंडन : भारतीय महिला संघाला शुक्रवारी इंग्लंडमध्ये ऐतिहासिक कामगिरी नोंदवण्याची संधी आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामना बुधवारी मँचेस्टर येथे रंगणार असून भारतीय संघ या मालिकेत २-१ असा आघाडीवर आहे. त्यामुळे बुधवारी लढत जिंकल्यास भारतीय महिलांना इंग्लंडमध्ये प्रथमच एखादी टी-२० मालिका जिंकता येईल. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौर आणि सलामीवीर शफाली वर्मा या दोघांची बॅट तळपणे त्यासाठी आवश्यक आहे.

हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात उभय संघांत ५ टी-२० सामन्यांनंतर १६ जुलैपासून ३ एकदिवसीय लढतीही होणार आहेत. भारताने मे महिन्यात तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिका व श्रीलंका यांना नमवले. त्या मालिकेतील बहुतांश खेळाडूंना इंग्लंडविरुद्धही संघात कायम राखले आहे. उभय संघांतील या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने उपकर्णधार स्मृती मानधनाच्या शतकाच्या बळावर बाजी मारली. त्यानंतर दुसऱ्या लढतीत मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज व अमनजोत कौर यांनी अर्धशतके झळकावल्यामुळे महिला संघाने सलग दुसरा विजय नोंदवला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडला १७१ धावांत रोखूनही भारताला फक्त ५ धावांनी पराभव पत्करावा लागला.

आता बुधवारी चौथी लढत जिंकल्यास भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी घेईल. २००६मध्ये भारतीय महिलांनी इंग्लंडमध्ये एकमेव टी-२० सामना झाला होता. त्यावेळी ती लढत आपण जिंकली होती. मात्र एखाद्या टी-२० मालिकेत भारताने इंग्लंडला आजवर एकदाही नमवलेले नाही. भारतीय संघाची फलंदाजीत स्मृती, जेमिमा, हरमनप्रीत, अमनजोत यांच्यावर भिस्त असेल.

आठ महिन्यांनी टी-२० संघात परतलेल्या शफालीने पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे २० व ३ धावा केल्या. तर तिसऱ्या लढतीत तिने ४७ धावा फटकावल्या. मात्र निर्णायक क्षणी ती बाद झाली. हरमनप्रीतने पहिल्या सामन्याला मुकल्यावर उर्वरित दोन लढतींमध्ये अनुक्रमे १ व २३ धावा केल्या.

दुसरीकडे इंग्लंडची कर्णधार नॅट शीव्हर ब्रंट स्नायूंच्या दुखापतीमुळे या लढतीसही मुकणार आहे. अशा स्थितीत त्यांच्यावरील दडपण आणखी वाढले असून टॅमी ब्युमाँटकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. इंग्लंडला एमी जोन्स, सोफी एक्केलस्टोन व एलिस काप्सी यांच्याकडून कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे. तसेच सलामीवीर सोफिया डंकलीने चमकदार कामगिरी केली आहे.

भारतात यंदा महिलांचा एकदिवसीय विश्वचषक रंगणार असून यानंतर होणारी एकदिवसीय मालिकेही त्यादृष्टीने निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे शफालीकडे एकूणच लक्ष असेल.

भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तिका भाटिया, हरलीन देओल, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, श्री चरिणी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सतघरे.

logo
marathi.freepressjournal.in