IND W vs ENG W : महिलांचा सलग दुसरा विजय; भारताची इंग्लंडवर २४ धावांनी मात; अमनजोतची अष्टपैलू चमक

भारतीय महिला संघाने मंगळवारी मध्यरात्री झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर २४ धावांनी मात केली. या विजयासह भारताने पाच लढतींच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
IND W vs ENG W : महिलांचा सलग दुसरा विजय; भारताची इंग्लंडवर २४ धावांनी मात; अमनजोतची अष्टपैलू चमक
Published on

ब्रिस्टल : २४ वर्षीय प्रतिभावान फलंदाज अमनजोत कौरने (४० चेंडूंत नाबाद ६३ धावा आणि १ बळी) अष्टपैलू चमक दाखवली. त्यामुळे भारतीय महिला संघाने मंगळवारी मध्यरात्री झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर २४ धावांनी मात केली. या विजयासह भारताने पाच लढतींच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

ब्रिस्टल येथील कौंटी क्रिकेट मैदानावर झालेल्या या लढतीत भारताने दिलेल्या १८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकांत ७ बाद १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. अमनजोतला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याशिवाय मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज (४१ चेंडूंत ६३), रिचा घोष (२० चेंडूंत नाबाद ३२) आणि फिरकीपटू श्री चरिणी (२८ धावांत २ बळी) यांनीसुद्धा भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडला ९७ धावांनी धूळ चारली होती. सलग दोन विजयांसह भारताने आता मालिका जिंकण्याच्या दिशेने कूच केली आहे. शुक्रवारी उभय संघांतील तिसरी लढत ओव्हल येथे खेळवण्यात येईल.

प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ४ बाद १८१ धावा केल्या. गेल्या सामन्यातील शतकवीर स्मृती मानधना (१३) व शफाली वर्मा (३) स्वस्तात बाद झाल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरही (१) छाप पाडू शकली नाही. त्यामुळे पॉवरप्लेच्या अखेरीस भारताची ३ बाद ३१ अशी दारुण अवस्था होती. तेथून मग जेमिमा व अमनजोत यांची जोडी जमली.

जेमिमाने ९ चौकार व १ षटकारासह टी-२० कारकीर्दीतील १३वे अर्धशतक साकारले. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या अमनजोतने ९ चौकारांसह पहिलेच अर्धशतक झळकावले. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचली. लॉरेन बेलने जेमिमाचा अडसर दूर केला. त्यानंतर अमनजोत व रिचा यांनी पाचव्या विकेटसाठी ५७ धावांची अभेद्य भागीदारी रचून संघाला १८० धावांपलीकडे नेले. इंग्लंडकडून बेलने २ बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघही ३ बाद १७ अशा संकटात सापडला. अमनजोतने कर्णधार नॅट शीव्हर ब्रंटचा (१३) निर्णायक बळी मिळवला. टॅमी ब्युमाँटने ५४ धावांची झुंज देत संघाच्या आशा कायम राखल्या. मात्र ती धावचीत झाली व इंग्लंडचा संघ ढेपाळला. सोफी एक्केलस्टोनने २३ चेंडूंत ३५ धावा फटकावल्या. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. परिणामी इंग्लंडला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ४ बाद १८१ (जेमिमा रॉड्रिग्ज ६३, अमनजोत कौर नाबाद ६३; लॉरेन बेल २/१७) विजयी वि. g इंग्लंड : २० षटकांत ७ बाद १५७ (टॅमी ब्युमाँट ५४; श्री चरिणी २/२८)

logo
marathi.freepressjournal.in