महाराष्ट्राच्या एकाच खेळाडूला मिळाले स्थान; ऑलिम्पिकसाठी भारताचा १५ नेमबाजांचा चमू जाहीर

आगामी पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी मंगळवारी भारताचा १५ जणांचा नेमबाजांचा चमू जाहीर करण्यात आला.
इशा सिंग, रिदम सांगवान आणि मनू भाकर यांचा 15 नेमबाजांच्या चमूमध्ये समावेश.
इशा सिंग, रिदम सांगवान आणि मनू भाकर यांचा 15 नेमबाजांच्या चमूमध्ये समावेश. पीटीआय, संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : आगामी पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी मंगळवारी भारताचा १५ जणांचा नेमबाजांचा चमू जाहीर करण्यात आला. या संघात महाराष्ट्राच्या फक्त एकमेव स्वप्निल कुसळेला स्थान लाभले आहे. २२ वर्षीय मनू भाकरवर मात्र दुहेरी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रायफल व पिस्तूल प्रकारासाठी ही संघनिवड करण्यात आली आहे.

यापूर्वीच्या दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय नेमबाजांनी सपशेल निराशा केली होती. त्यांना एकही पदक जिंकता आले नव्हते. यंदा मात्र नेमबाजांकडून चाहत्यांना चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. भारताने यावेळी २४ पैकी २१ नेमबाजीचे कोटे मिळवले. त्यापैक रायफल व पिस्तूल प्रकारातील १५ जणांची नावे मंगळवारी जाहीर करण्यात आली. टोकियो ऑलिम्पिकमध्येसुद्धा भारताचे १५ नेमबाज पात्र होते.

दरम्यान, मनू १० मीटर तसेच २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात सहभागी होईल. २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये पिस्तूलमध्ये बिघाड झाल्याने मनू अंतिम फेरी गाठू शकली नव्हती. महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष पाटीलला संघात स्थान न मिळाल्याने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रुद्रांक्षने १० मीटर एअर रायफल प्रकारात कोटा मिळवला होता. मात्र त्याची संघात निवड झालेली नाही. त्याशिवाय महाराष्ट्राच्या राही सरनोबत, तेजस्विनी सावंत यांचीही कामगिरी गेल्या काही वर्षांत ढासळल्याने त्यांच्याकडे यावेळी दुर्लक्ष करण्यात आले आहे. २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होणार असून यंदा भारतीय पथकाकडून किमान १० पदकांची अपेक्षा आहे.

भारताचा चमू

रायफल : संदीप सिंग, अर्जुन बबुता, इलाव्हेनिल वालारिवन, रमिता जिंदाल, सिफ्ट कौर सामरा, अंजुम मुदगिल, ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर, स्वप्निल कुसळे

पिस्तूल : सरबजोत सिंग, अर्जुन चीमा, मनू भाकर, रिदम सांगवान, अनिष भानवाल, विजयवीर सिधू, इशा सिंग.

logo
marathi.freepressjournal.in