

सूरत : २०३० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन अहमदाबादमध्ये करण्यात येणार असून २०३६ मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत उत्सुक आहे. या ऑलिम्पिकमध्ये १०० पदके जिंकण्याचे ध्येय आम्ही बाळगले आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी रविवारी सूरत येथे सांगितले.
‘रन फॉर गर्ल चाइल्ड’ मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान जय शहा म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३०मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. २०३० राष्ट्रकुल स्पर्धेनंतर २०३६मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्याचा भारताचा मानस आहे. २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला ८ पदकांवर समाधान मानावे लागले असले तरी २०३६ ऑलिम्पिकमध्ये १०० पदके मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यात गुजरातच्या खेळाडूंचा पदकांचा वाटा १० इतका असेल.”
२०२४मध्ये बार्बाडोस येथे झालेला टी-२० वर्ल्डकप तसेच २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील यशाबद्दल जय शहा यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे कौतुक केले. महिला खेळाडूंच्या वाढत्या प्रभावाविषयी ते म्हणाले की, “पूर्वी पालक आपल्या मुलाला विराट कोहलीसारखा बनवण्यासाठी धडपडत होते. आता बरेचसे पालक आपल्या मुलींना स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौरसारखी बनवण्यासाठी उत्सुक आहेत.”