श्रेयसच्या नेतृत्वात भारत-अ संघ विजयी! तिसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलिया-अ संघावर २ गडी राखून मात

मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळताना भारत-अ संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया-अ संघावर २ गडी व २४ चेंडू राखून विजय मिळवला. याबरोबरच भारत-अ संघाने मालिकेत २-१ असे यश संपादन केले.
श्रेयसच्या नेतृत्वात भारत-अ संघ विजयी! तिसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलिया-अ संघावर २ गडी राखून मात
Published on

कानपूर : मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळताना भारत-अ संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया-अ संघावर २ गडी व २४ चेंडू राखून विजय मिळवला. याबरोबरच भारत-अ संघाने मालिकेत २-१ असे यश संपादन केले.

३० वर्षीय श्रेयसची काही दिवसांपूर्वीच भारताच्या एकदिवसीय संघाच्या उपकर्णधारपदी नेमणूक करण्यात आली. भारताचा अनुभवी फलंदाज असलेल्या श्रेयसने पाठदुखीमुळे लाल चेंडूने होणाऱ्या सामन्यांतून तब्बल सहा महिने विश्रांती घेतली आहे. श्रेयसला भारताच्या कसोटी संघातून मागेच वगळण्यात आले आहे. त्यातच आता पाठदुखीमुळे तो टी-२० व एकदिवसीय प्रकारांतच खेळताना दिसणार आहे. रोहित शर्माची कर्णधारपदावरून गच्छंती झाल्यावर श्रेयसकडे एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात यावे, अशी अनेकांची मागणी होती. मात्र अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती व प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी शुभमन गिलला पसंती दिली. गिल हा २५ वर्षांचा असून २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकात तोच भारताचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारत-अ आणि ऑस्ट्रेलिया-अ यांच्यातील मालिकेत पहिल्या सामन्यात भारताने ४१३ धावांचा डोंगर उभारला होता. त्या लढतीत श्रेयस (८३ चेंडूंत ११०) व प्रियांश आर्या (८४ चेंडूंत १०१) यांनी शतके साकारली. भारताने १७१ धावांनी ही लढत जिंकली. मग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया-अ संघाने भारत-अ संघावर ९ गडी राखून विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. तिलक वर्मा (९४) व रियान पराग (५८) यांनी दुसऱ्या लढतीत झुंज दिली.

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या निर्णायक तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४९.१ षटकांत सर्व बाद ३१६ धावा केल्या. कर्णधार जॅक एडवर्ड्स (८९) व कूपर कोनोली (६४) यांनी अर्धशतके झळकावली. हर्षित राणा व अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना प्रभसिमरन सिंगने ६८ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह १०२ धावांची तुफानी शतकी खेळी साकारली. त्याला श्रेयस (५८ चेंडूंत ६२), पराग (५५ चेंडूंत ६२) यांच्या अर्धशतकांची सुरेख साथ लाभली. अखेरीस विपराज निगम (नाबाद २४) व आयुष बदोनी (२१) यांनीही मोलाचे योगदान दिल्यामुळे भारताने ४६ षटकांत ३१७ धावांचे लक्ष्य गाठले. प्रभसिमरन सिंग सामनावीर, तर ३ सामन्यांत १८७ धावा फटकावणारा पराग मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

याबरोबरच ऑस्ट्रेलिया-अ संघाचा भारत दौरा समाप्त झाला. उभय संघांत झालेली दोन सामन्यांची कसोटी मालिकासुद्धा भारत-अ संघाने १-० अशी जिंकली, तर एकदिवसीय मालिकेत भारत-अ संघाने २-१ असे वर्चस्व गाजवले. आता १९ ऑक्टोबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून तेथे श्रेयस भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.

संक्षिप्त धावफलक

भारत-अ : ४६ षटकांत ८ बाद ३२२ (प्रभसिमरन सिंग १०२, श्रेयस अय्यर ६२, रियान पराग ६२; तन्वीर संघा ४/७२)

ऑस्ट्रेलिया-अ : ४९.१ षटकांत सर्व बाद ३१६ (जॅक एडवर्ड्स ८९, लियाम स्कॉट ७३; अर्शदीप सिंग ३/३८, हर्षित राणा ३/६१) पराभूत वि.

श्रेयसच एकदिवसीय संघाचा कर्णधार हवा!

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने रोहितकडून कर्णधारपद काढून घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. तसेच रोहितनंतर श्रेयस अय्यर एकदिवसीय संघाचा कर्णधार हवा होता, असेही त्याने म्हटले आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रंगणार आहे. त्यानंतर उभय संघांत ३ टी-२० सामनेही खेळवण्यात येणार आहेत. या दोन्ही मालिकांसाठी शनिवारी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. मात्र ३८ वर्षीय रोहितकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेत २५ वर्षीय शुभमन गिलकडे सोपवण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला. रोहित व विराट कोहली या मालिकेद्वारे जवळपास सात महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार आहेत. परंतु रोहित मात्र यावेळी फक्त खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. मात्र काही महिन्यांपूर्वीच भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देणारा कर्णधार या संघात फक्त खेळाडू म्हणून असल्याने अनेकांचा हिरमोड झाला. रोहितच्या नेतृत्वात गेल्या तीन आयसीसी स्पर्धांमध्ये भारताने फक्त एक सामना गमावला होता.

logo
marathi.freepressjournal.in