आयपीएल संपली, आता वेळ कसोटीची! भारत-अ संघाची आजपासून इंग्लंड लायन्सविरुद्ध लढत; राहुलच्या कामगिरीकडे लक्ष

आयपीएलचा कुंभमेळा संपल्यानंतर आता पुन्हा खेळाडूंच्या परिपक्वतेसह तंदुरुस्तीचा कस लागणार आहे. लवकरच भारतीय संघ कसोटी क्रिकेटकडे वळणार असून त्यापूर्वी के. एल. राहुलला उत्तम सराव करण्याची संधी आहे. भारत-अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात शुक्रवारपासून नॉर्थहॅम्पटन येथे दुसरा चार दिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे.
आयपीएल संपली, आता वेळ कसोटीची! भारत-अ संघाची आजपासून इंग्लंड लायन्सविरुद्ध लढत; राहुलच्या कामगिरीकडे लक्ष
Published on

नॉर्थहॅम्पटन : आयपीएलचा कुंभमेळा संपल्यानंतर आता पुन्हा खेळाडूंच्या परिपक्वतेसह तंदुरुस्तीचा कस लागणार आहे. लवकरच भारतीय संघ कसोटी क्रिकेटकडे वळणार असून त्यापूर्वी के. एल. राहुलला उत्तम सराव करण्याची संधी आहे. भारत-अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात शुक्रवारपासून नॉर्थहॅम्पटन येथे दुसरा चार दिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे. भारताच्या मुख्य संघातील अनेक खेळाडू या लढतीत भारत-अ संघाचा भाग असल्याने त्यांच्या कामगिरीवरही लक्ष असेल.

यंदा आयपीएलचा १८वा हंगाम ३ जूनपर्यंत लांबला. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल मध्यंतरी १० दिवसांसाठी स्थगित करण्यात आली होती. अखेरीस विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथमच आयपीएलचे जेतेपद पटकावत या स्पर्धेची शानदार सांगता केली. मात्र एकीकडे आता विराटसह रोहित शर्मा कसोटीतून निवृत्त झालेला असताना आता भारतीय संघाची कसोटी लागणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यात २० जूनपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल.

त्यापूर्वी सराव म्हणून खेळवण्यात आलेली इंग्लंड लायन्सविरुद्धची पहिली चार दिवसीय लढत भारत-अ संघाने अनिर्णित राखली. या सामन्यात मुख्य भारतीय संघातील सहा खेळाडू होते. करुण नायरचे द्विशतक, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, नितीश रेड्डी यांची अर्धशतके हे पहिल्या सामन्यातील लक्षवेधी मुद्दे ठरले. मात्र भारतीय गोलंदाजांना इंग्लंड लायन्सच्या फलंदाजांनी संघर्ष करायला लावला. भारत-अ संघाच्या ५५७ धावांच्या प्रत्युत्तरात त्यांनी ५८७ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत मुकेश कुमारने फक्त छाप पाडली. आता दुसऱ्या सामन्यात राहुलसह करुण, जुरेल, नितीश, शार्दूल ठाकूर, आकाश दीप हे मुख्य संघातील खेळाडू ‘भारत-अ’साठी खेळतील. शुभमन गिल व साई सुदर्शन या सामन्यात सहभागी होण्याची शक्यता होती. मात्र ते ६ तारखेला संपूर्ण संघासह इंग्लंडला रवाना होतील.

दरम्यान, ३३ वर्षीय राहुल सध्या भारतीय कसोटी संघातील सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहे. राहुलच्या कारकीर्दीतील हा तिसरा इंग्लंड दौरा असेल. राहुलने इंग्लंडमध्ये दोन शतके झळकावली आहेत. त्यामुळे तो यशस्वी जैस्वालसह मुख्य मालिकेत तसेच शुक्रवारी इंग्लंड लायन्सविरुद्धही सलामीला येईल, हे निश्चित आहे. इंग्लंड लायन्सचा विचार करता जेम्स ऱ्यूकडे त्यांचे कर्णधापद असून ख्रिस वोक्स व जोश टंग या लढतीत खेळण्याची शक्यता आहे.

भारत-अ संघ

अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), के. एल. राहुल, यशस्वी जैस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, शार्दूल ठाकूर, इशान किशन, मानव सुतार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलिल अहमद, ऋतुराज गायकवाड, सर्फराझ खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे.

  • वेळ : दुपारी ३.३० वाजता

logo
marathi.freepressjournal.in