लखनौ : के. एल. राहुलने (२१० चेंडूंत नाबाद १७६ धावा) साकारलेल्या दमदार दीड शतकाला डावखुऱ्या साई सुदर्शनच्या (१७२ चेंडूंत १००) शतकाची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारत-अ संघाने ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या चार दिवसीय कसोटी सामन्यात ४१२ धावांचा यशस्वी पाठलाग केला. भारताने ५ गडी राखून ही लढत जिंकत मालिकेत १-० अशी बाजी मारली.
उभय संघांतील पहिला चार दिवसीय सामना अनिर्णित राहिला होता. या लढतीसाठी ध्रुव जुरेल भारताचा कर्णधार असून के. एल. राहुल व मोहम्मद सिराज यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. श्रेयस अय्यरने पाठदुखीमुळे या लढतीतून माघार घेतली होती. आता ३० तारखेपासून भारत-अ आणि ऑस्ट्रेलिया-अ यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होईल.
लखनाैच्या इकाना स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया-अ संघाने पहिल्या डावात ४२० धावांचा डोंगर उभारला. मग भारत-अ संघ अवघ्या १९४ धावांत गारद झाला. त्यामुळे त्यांना तब्बल २२६ धावांची आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावात भारत-अ संघाच्या गोलंदाजांनी कामगिरी उंचावून ऑस्ट्रेलियाला १८५ धावांत गुंडाळले. त्यामुळे भारतापुढे ४१२ धावांचे लक्ष्य उभे ठाकले.
दरम्यान, शुक्रवारी म्हणजेच चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी आणखी २४३ धावांची गरज होती. गुरुवारच्या २ बाद १६९ धावांवरून पुढे खेळताना भारताने देवदत्त पडिक्कल (५) व नाइट वॉचमन मानव सुतारला (५) लवकर गमावले. मात्र सुदर्शन व गुरुवारी रिटायर्ड हर्ट होऊन पुन्हा मैदानात परतलेला राहुल यांनी जिद्दीने किल्ला लढवला. राहुलने १६ चौकार व ४ षटकारांसह १७६ धावा केल्या, तर सुदर्शनने ९ चौकार व १ षटकारासह शतक साकारले.
सुदर्शन बाद झाल्यावर कर्णधार जुरेलच्या साथीने (६६ चेंडूंत ५६) राहुलने संघाला विजयासमीप नेले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी रचली. अखेर राहुल व नितीश रेड्डी (नाबाद १६) या जोडीने ९१.३ षटकांत भारताचा विजय साकारला. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हा सहाव्या क्रमांकाचा यशस्वी पाठलाग ठरला. २०१०मध्ये दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पश्चिम विभागाने दक्षिण विभागाविरुद्ध ५१० धावांचा पाठलाग केला होता. तो विक्रम अद्याप अबाधित आहे.