

दाम्बुला : तिरंगी मालिकेतील गुरुवारी झालेल्या सामन्यात अफागाणिस्तान-अ संघाने तारांकित भारत अ संघाचा डकवर्थ-लुईस-स्टर्न (डीएलएस) पद्धतीच्या आधारे ४ धावांनी पराभव करत मोठा उलटफेर केला. पावसाच्या व्यत्ययामुळे अफागाणिस्तानला ३८ षटकांत २९४ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले होते. खेळ थांबला तेव्हा अफागाणिस्तानने २५.५ षटकांत २ बाद १७७ धावा केल्या होत्या आणि ते पार स्कोअरपेक्षा ४ धावांनी पुढे असल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाने ४९ षटकांत ९ बाद ३४९ धावांचा डोंगर उभारला होता. भारताकडून सलामीवीर प्रबसिमरन सिंग याने ६९ चेंडूंत ८४ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला कर्णधार तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी प्रत्येकी ६६ धावा करत उत्तम साथ दिली. अफागाणिस्तानकडून अब्दुल्ला अहमदझाई याने ६८ धावांत ५ बळी घेत डावाला वेसण घातले.
धावांचा पाठलाग करताना अफागाणिस्तानच्या संघाने आक्रमक सुरुवात केली. कर्णधार इम्रान याने ७० चेंडूंत नाबाद ७५ धावा केल्या, तर हसन इसाखिल याने २९ चेंडूंत ३४ धावांचे योगदान दिले. बहीर शाहने ५२ चेंडूंत ५१ धावा करत इम्रानला चांगली साथ दिली. खेळ थांबला तेव्हा हे दोघे खेळपट्टीवर होते.
यापूर्वी भारताच्या डावात वैभव सूर्यवंशी याने अवघ्या २२ चेंडूंत ९ चौकारांसह ४४ धावा कुटल्या. सूर्यवंशी आणि प्रबसिमरन यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या ७.१ षटकांत ७४ धावांची भागीदारी केली. प्रबसिमरनने ऋतुराज गायकवाडसोबत तिसऱ्या विकेटसाठी ७९ धावा जोडल्या. ऋतुराज आणि तिलक वर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. अखेरच्या षटकांत तिलकने सुर्यांश शेडगेसोबत ७० धावा जोडल्याने भारताला ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला.