अनंतपूर : मुंबईकर फिरकीपटू तनुष कोटियन (४७ धावांत ३ बळी) आणि वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा (५० धावांत ३ बळी) यांच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर भारत-असंघाने निर्णायक लढतीत भारत-क संघावर १३२ धावांनी मात करत दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
अखेरच्या फेरीपूर्वी दोन सामन्यांत सहा गुणांसह भारत-अ संघ भारत-क संघापेक्षा (९ गुण) तीन गुणांनी मागे होता. मात्र, निर्णायक लढतीतील विजयामुळे मयांक अगरवालच्या नेतृत्वाखालील भारत-अ संघाचे तीन सामन्यांत १२ गुण झाले. त्यामुळे गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेत त्यांनी विजेतेपद मिळवले.
सामन्याच्या अखेरच्या दिवशी ३५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारत-क संघ ८१.५ षटकांत २१७ धावांत गारद झाला. चहापानाच्या वेळी भारत-क संघाने ३ बाद १६९ धावा केल्या होत्या. साई सुदर्शन (१११) आणि इशान किशन (१७) खेळपट्टीवर होते. अखेरच्या सत्रात क-संघाला ३० षटकांत विजयासाठी १८२ धावांची आवश्यकता होती. यानंतर तनुषने किशन आणि अभिषेक पोरेलला (०) बाद केले. त्यानेच पुलकित नारंगलाही (६) माघारी धाडले. त्यापूर्वी आकिब खानने ऋतुराज गायकवाडला (४४) बाद केले, तर विजयकुमार वैशाख (१७) धावचीत झाला.
सुदर्शनने २०६ चेंडूंत १२ चौकारांच्या साहाय्याने १११ धावांची खेळी केल्यावर प्रसिधने त्याला माघारी धाडत सर्वांत मोठा अडसर दूर केला. प्रसिधने अंशुल कंबोज (०) आणि बाबा इंद्रजीत (०) यांनाही बाद करत भारत-अ संघाचा विजय निश्चित केला. त्यापूर्वी, दिवसाच्या सुरुवातीला भारत-अ संघाने ८ बाद २८६ धावसंख्येवर आपला दुसरा डाव घोषित करत एकूण ३४९ धावांची आघाडी घेतली.
बीसीसीआयचा निर्णय कौतुकास्पद!
देशांतर्गत क्रिकेटचे महत्त्व वाढवण्यासाठी बीसीसीआयने दुलीप तसेच रणजी स्पर्धेत खेळणे खेळाडूंना अनिवार्य केले आहे. आयसीसीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी गिडनी यांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे. “काही प्रमुख खेळाडू सोडल्यास भारताचे बहुतांश वरिष्ठ खेळाडू दुलीप ट्रॉफीत खेळताना दिसले. बीसीसीआयचा हा निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे संपूर्ण विश्वाला एक संदेश मिळत आहे. सर्व देशांनी त्यांचा प्रमुख खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची सक्ती केल्यास क्रिकेटचा अधिक प्रसार होईल,” असे गिडनी म्हणाले.