महिलांची मालिकेत विजयी आघाडी; भारत-अ संघाची दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर २ गडी राखून सरशी

राधा यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारत-अ महिला संघाने शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर दमदार विजय नोंदवला. त्यांनी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया-अ संघावर २ गडी व १ चेंडू राखून मात करत तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
महिलांची मालिकेत विजयी आघाडी; भारत-अ संघाची दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर २ गडी राखून सरशी
PM
Published on

ब्रिस्बेन : राधा यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारत-अ महिला संघाने शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर दमदार विजय नोंदवला. त्यांनी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया-अ संघावर २ गडी व १ चेंडू राखून मात करत तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. फिरकीपटू मिन्नू मणीची (४६ धावांत ३ बळी) प्रभावी गोलंदाजी व यास्तिका भाटिया (७१ चेंडूंत ६६ धावा), राधा (७८ चेंडूंत ६०) व तनुजा कन्वर (५७ चेंडूंत ५०) या तिघींच्या अर्धशतकांमुळे भारताने हे यश साध्य केले.

भारतात यंदा ३० सप्टेंबरपासून महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. त्यापूर्वी भारत-अ संघाद्वारे काही प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले आहेत. युवा खेळाडूंसह खेळताना भारतीय महिलांना टी-२० मालिकेत ०-३ असा दारुण पराभव पत्करावा लागला. मात्र एकदिवसीय मालिकेत भारत-अ संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात सलग दोन लढतींमध्ये धूळ चारली. पहिल्या सामन्यात भारताने ३ गडी राखून सरशी साधताना २१४ धावांचा पाठलाग केला. आता दुसऱ्या सामन्यातही भारताने ४९.५ षटकांत २६६ धावांचे लक्ष्य गाठले. रविवारी उभय संघांतील तिसरी लढत खेळवण्यात येईल. त्यानंतर दोन्ही संघांत एक चार दिवसीय कसोटी होईल. हा दौरा संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा मुख्य संघ भारताच्या मुख्य महिला संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे.

दरम्यान, भारत-अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया-अ संघाने ५० षटकांत ९ बाद २६५ धावांपर्यंत मजल मारली. एलिसा हीलीने ८७ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ९१ धावांची खेळी साकारली. तिला किम गार्थच्या नाबाद ४१ धावांची उत्तम साथ लाभली. मिन्नूने ३, तर साइमा ठाकोरने २ बळी मिळवले. तसेच राधा, तनुजा व प्रेमा रावत यांनी गोलंदाजीतही योगदान देताना प्रत्येकी १ गडी बाद केला.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने शफाली वर्मा (४), धारा गुर्जर (०) यांना लवकर गमावले. मात्र २४ वर्षीय डावखुरी सलामीवीर यास्तिकाने सलग दुसरे अर्धशतक साकारताना ९ चौकारांसह ६६ धावा केल्या. ४ बाद ८३ स्थितीतून यास्तिका व राधा यांनी पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचली. राधाने ५ चौकार व १ षटकारासह ६० धावा केल्या.

३९व्या षटकात राधाच्या रूपात भारताने सातवी विकेट गमावली. त्यावेळी संघाला विजयासाठी ७३ धावांची गरज होती. मात्र तनुजा आणि प्रेमा यांची आठव्या विकेटसाठी ६८ धावांची निर्णायक भागीदारी रचली. तनुजाने ३ चौकारांसह ५० धावा केल्या. अखेरच्या षटकात ५ धावांची गरज असताना तनुजा बाद झाली. मात्र प्रेमाने (३३ चेंडूंत नाबाद ३२ धावा) संयमीपणे संघाला ४९.५ षटकांत विजयीरेषा ओलांडून दिली. ऑस्ट्रेलियाकडून जॉर्जिया प्रेस्टिज, एमी एगर व एला हॉयर्डने प्रत्येकी २ बळी मिळवले. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले.

संक्षिप्त धाव‌फलक

  • भारत-अ : ४९.५ षटकांत ८ बाद २६६ (यास्तिका भाटिया ६६, राधा यादव ६०, तनुजा कन्वर ५०, प्रेमा रावत नाबाद ३२; एमी एगर २/५५)

  • ऑस्ट्रेलिया-अ : ५० षटकांत ९ बाद २६५ (एलिसा हीली ९१, किम गार्थ नाबाद ४१; मिन्नू मणी ३/४६) पराभूत वि.

न्यूझीलंडच्या महिलांचा चेन्नईत सराव

न्यूझीलंडचा महिला संघ विश्वचषकाच्या तयारीसाठी भारतात दाखलसुद्धा झाला असून त्यांनी चेन्नई येथील चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या अकादमीत सरावाला प्रारंभ केला आहे. मात्र न्यूझीलंड संघातील जेस कर, जॉर्जिया प्लिमर, ब्रूक हालिडे यांच्यासह सात खेळाडू, मुख्य प्रशिक्षक बेन सॉयर, सहाय्यक प्रशिक्षक क्रेग मॅकमिलन हे भारतात आले आहेत. प्रामुख्याने फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवर सराव व्हावा, म्हणून ते चेन्नईत विशेष खेळपट्ट्यांवर खेळत आहेत. गतवर्षी आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणारा न्यूझीलंडचा सलामीवीर रचिन रवींद्रसुद्धा अशाच प्रकारच्या सरावासाठी भारतात आला होता. त्यानंतर भारत-न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका झाली. त्यामध्ये रचिनने उत्तम योगदान देत संघाला ३-० असे जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

logo
marathi.freepressjournal.in