भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका: धोनी आणि हसीमुळे फलंदाजीत सुधारणा! आत्मविश्वास उंचावलेल्या शिवम दुबेची कबुली

भारतीय क्रिकेट संघाच्या राष्ट्रीय निवड समितीतील एका सदस्यासाठी बीसीसीआयने सोमवारी अर्जांची मागणी केली.
भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका: धोनी आणि हसीमुळे फलंदाजीत सुधारणा! आत्मविश्वास उंचावलेल्या शिवम दुबेची कबुली

इंदूर : आयपीएलदरम्यान चेन्नई सुपर किंग्जने मला स्वातंत्र्य दिले. विशेषत: महेंद्रसिंह धोनी व माईक हसी यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे माझ्या खेळात नक्कीच सुधारणा झाली, अशी प्रतिक्रिया भारताचा डावखुरा अष्टपैलू शिवम दुबेने व्यक्त केली.

सध्या अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत शिवमने सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. तसेच गोलंदाजीतही २ बळी मिळवून अष्टपैलू योगदान दिले. भारतीय संघ या मालिकेत २-० असा आघाडीवर असून तिसरी लढत बुधवारी होणार आहे. दरम्यान, ३० वर्षीय शिवमने दुसऱ्या लढतीतील विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्याचा उंचावलेला आत्मविश्वास व फलंदाजीतील सुधारणेविषयी भाष्य केले.

“आयपीएलच्या काळात माही भाई (धोनी) व माईक हसी यांनी माझ्या फलंदाजीवर बारकाईने लक्ष दिले. विशेषत: हसीने माझा डावखुऱ्या फलंदाजाने एखाद्या गोलंदाजाला सामोरे जाताना कोणत्या मानसिकतेने विचार करून खेळावे, हे सांगितले. धोनीने षटकार लगावण्यास नेहमीच प्रोत्साहन दिले. भारतीय संघासाठी धोनीने जे काम वर्षानुवर्षे केले, तेच करण्याचा मी प्रयत्न करत आहे,” असे शिवम म्हणाला.

त्याशिवाय सध्या टी-२० विश्वचषकातील स्थानाचा विचार न करता आगामी तिसरा सामना व आयपीएलमध्ये कशाप्रकारे कामगिरीत सातत्य राखता येईल, याकडेच आपले लक्ष असल्याचे शिवमने नमूद केले. फिरकीपटूंना जागेवरूनच लांब षटकार लगावण्याची कला एकप्रकारे दैवी देणगी असल्याचेही शिवमने सांगितले.

निवड समितीच्या एका पदासाठी अर्जांची मागणी

भारतीय क्रिकेट संघाच्या राष्ट्रीय निवड समितीतील एका सदस्यासाठी बीसीसीआयने सोमवारी अर्जांची मागणी केली. पश्चिम विभागातील सलील अंकोला यांच्या जागी नव्या सदस्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे समजते. सध्या अजित आगरकर निवड समितीचा अध्यक्ष असून तोसुद्धा पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करतो. एकाच विभागातील दोन सदस्य समितीत असू शकतात. मात्र सर्व विभागाच्या प्रतिनिधींना समान न्याय मिळावा, यासाठी बीसीसीआय उत्तर विभागातील उमेदवाराचा शोध घेत आहे. त्यामुळे अंकोला यांच्या जागी लवकरच नव्या सदस्याची नेमणूक केली जाऊ शकते. यासाठी ७ कसोटी, ३० एकदिवसीय किंवा २० प्रथम श्रेणी सामने या तिघांपैकी एकाचा अनुभव असलेला उमेदवार २५ जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in