भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका: मुंबईकर दुबेमुळे दणदणीत विजय

लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात शून्यावर धावचीत झाला.
भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका: मुंबईकर दुबेमुळे दणदणीत विजय

मोहाली : मुंबईकर शिवम दुबेने भारतीय संघात अष्टपैलू कामगिरीद्वारे झोकात पुनरागमन केले. त्याने गोलंदाजीत ९ धावांत १ बळी मिळवल्यानंतर फलंदाजीत ४० चेंडूंतच नाबाद ६० धावांची जिगरबाज खेळी साकारल्याने भारताने गुरुवारी पहिल्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानला ६ गडी आणि १५ चेंडू राखून सहज नामोहरम केले.

मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत अफगाणिस्तानने दिलेले १५९ धावांचे लक्ष्य भारताने १७.३ षटकांत गाठून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली. उभय संघांतील दुसरा सामना रविवारी इंदौर येथे खेळवण्यात येईल. अक्षर पटेल (२३ धावांत २ बळी) व मुकेश कुमार (३३ धावांत २ बळी) या गोलंदाजांनीही भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात शून्यावर धावचीत झाला. त्यानंतर शुभमन गिल (२३) व तिलक वर्मा (२६) यांना मोठी खेळी साकारता आली नाही. कारकीर्दीतील १९वा सामना खेळणाऱ्या ३० वर्षीय दुबेने मात्र ५ चौकार व २ षटकारांसह दुसरे अर्धशतक झळकावले. दुबे ऑक्टोबरमध्ये आशियाई स्पर्धेत अखेरचा सामना खेळला होता. त्याने जितेश शर्मासह चौथ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी रचली. जितेश ३१ धावांवर माघारी परतल्यावर रिंकू सिंगच्या (नाबाद १६) साथीने दुबेने पाचव्या विकेटसाठी ४२ धावांची अभेद्य भागीदारी रचली. दुबेनेच चौकार लगावून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या भारताने अफगाणिस्तानला २० षटकांत ५ बाद १५८ धावांवर रोखले. अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी काहीशी सावध सुरुवात करताना ८ षटकांत ५० धावा फलकावर लावल्या. मात्र रहमनुल्ला गुरबाझ (२३), कर्णधार इब्राहिम झादरान (२५), अझमतुल्ला ओमरझाई (२९) या आघाडीच्या तिन्ही फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचा लाभ उचलता आला नाही. अक्षरने गुरबाझ व रहमत शाह (३) यांचे बळी मिळवले, तर दुबेने झादरानचा अडथळा दूर केला.

३ बाद ५७ वरून ओमरझाई आणि अनुभवी मोहम्मद नबी (४२) यांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची मोलाची भागीदारी रचली. मुकेशने एकाच षटकात या दोघांना बाद करून धावसंख्येला लगाम घातला. अखेरीस नजीबुल्ला झादरान (नाबाद १९) व करिम जनत (नाबाद ९) यांनी सहाव्या विकेटसाठी झटपट १२ चेंडूंत २८ धावांची भागीदारी रचून संघाला दीडशे धावांपलीकडे नेले.

दरम्यान, यशस्वी जैस्वाल या लढतीसाठी अनुपलब्ध होता, तर विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली.

अक्षर पटेलने गेल्या तीन टी-२० सामन्यांत ६ बळी पटकावून प्रत्येक वेळेस ४ षटकांत २४पेक्षाही कमी धावा दिल्या आहेत.

शिवम दुबेने टी-२० कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने २०१९मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पहिले अर्धशतक साकारले होते.

संक्षिप्त धावफलक

अफगाणिस्तान : २० षटकांत ५ बाद १५८ (मोहम्मद नबी ४२, अझमतुल्ला ओमरझाई २९; अक्षर पटेल २/२३, मुकेश कुमार २/३३) पराभूत वि.

भारत : १७.३ षटकांत ४ बाद १५९ (शिवम दुबे नाबाद ६०, जितेश शर्मा ३१, तिलक वर्मा २६; मूजीब उर रहमान २/२१)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in