टी-२० विश्वचषकासाठी संघबांधणी सुरू; रोहित, विराट यांच्या पुनरागमनाकडे लक्ष; भारत-अफगाणिस्तान मालिकेला आजपासून प्रारंभ

भारत-अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला गुरुवारपासून प्रारंभ होणार असून याद्वारे भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणी करण्याला प्राधान्य देणार आहे.
टी-२० विश्वचषकासाठी संघबांधणी सुरू; रोहित, विराट यांच्या पुनरागमनाकडे लक्ष; भारत-अफगाणिस्तान मालिकेला आजपासून प्रारंभ

भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका

रोहित व विराट तब्बल १४ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणार आहेत. यापूर्वी नोव्हेंबर २०२२मध्ये टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध ते अखेरचे खेळले होते. रोहितचा हा १४९वा, तर विराटचा ११६वा टी-२० सामना असणार आहे.

मोहाली : कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे दोन सर्वाधिक अनुभवी फलंदाज तब्बल १४ महिन्यांनंतर टी-२० प्रकारात पुनरागमन करण्यास सज्ज आहेत. भारत-अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला गुरुवारपासून प्रारंभ होणार असून याद्वारे भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणी करण्याला प्राधान्य देणार आहे.

मोहाली येथील आयएस ब्रिंदा स्टेडियमवर उभय संघ आमनेसामने येणार असून भारत-अफगाणिस्तानमध्ये प्रथमच टी-२० मालिका रंगणार आहे. १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. विश्वचषकापूर्वी भारताची ही अखेरची टी-२० मालिका आहे. यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर मार्च अखेरीस आयपीएल सुरू होईल. ती मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू असेल. आयपीएलनंतर भारतीय संघ थेट विश्वचषकासाठी रवाना होईल. त्यामुळे एकंदरच विश्वचषकातील १५ खेळाडू निवडण्याच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरेल.

दरम्यान, ३६ वर्षीय रोहित व ३५ वर्षीय विराट नोव्हेंबर २०२२मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला आहेत. इंग्लंडविरुद्ध २०२२च्या विश्वचषकातील त्या उपांत्य फेरीत भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. रोहितच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्याने भारताचे टी-२०मध्ये नेतृत्व केले, तर काही वेळेस सूर्यकुमार यादवही कर्णधार होता. मात्र आता हार्दिक व सूर्यकुमार दुखापतीमुळे अनुपलब्ध असताना निवड समिती पुन्हा एकदा रोहित व विराट जोडीकडे वळली आहे. त्यामुळे ते टी-२० विश्वचषकासाठी संघात असतील, हे जवळपास स्पष्ट दिसत आहे. अफगाणिस्तानच्या झुंजार वृत्तीच्या फिरकीपटूंपुढे भारताचा या मालिकेत कस लागेल, हे मात्र निश्चित.

रशिद संपूर्ण मालिकेला मुकणार

अफगाणिस्तानचा तारांकित लेगस्पिनर रशिद खान पाठीच्या दुखापतीमुळे या टी-२० मालिकेला मुकणार आहे. रशिदच्या पाठीवर नोव्हेंबरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रशिदचा संघात समावेश करण्यात आला असून तो संघासह भारतातही आला आहे. मात्र अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झादराननेच रशिद या मालिकेत खेळू शकणार नाही. तो अन्य गोलंदाजांना मार्गदर्शन करेल, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. रशिदच्या अनुपस्थितीत मुजीब उर रहमान, चायनामन नूर अहमद, मोहम्मद नबी यांच्यावर अफगाणच्या फिरकीची, तर नवीन उल हक व फझलहक फारुकी यांच्यावर वेगवान माऱ्याची भिस्त असेल.

कर्णधार झादरानवर दुहेरी जबाबदारी

अफगाणिस्तानने विश्वचषकात इंग्लंड, पाकिस्तान यांसारख्या संघांना सहज नमवले होते. त्यामुळे भारतीय संघ त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही. मोहालीच्या खेळपट्टीवर दवाचा घटक मोलाची भूमिका बजावले. अशा स्थितीत फलंदाजीत कर्णधार झादरानसह रहमनुल्ला गुरबाझ, अझमतुल्ला ओमरझाई, रहमत शाह या खेळाडूंवर अफगाणिस्तानची भिस्त असेल.

5 उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ५ टी-२० सामन्यांपैकी भारताने ४ लढतींमध्ये वर्चस्व गाजवले आहे, तर एक लढत रद्द करण्यात आलेली आहे.

यशस्वी, तिलक यांच्यात चुरस

रोहित व विराट संघात परतल्याने पहिल्या ६ स्थानांवरील फलंदाजांसाठी कडवा संघर्ष पाहायला मिळेल. मुंबईकर यशस्वी जैस्वाल व डावखुरा तिलक वर्मा या युवांना मालिकेत मिळालेल्या संधीचे सोने करावे लागेल. रोहितच्या साथीने यशस्वीच सलामीला येण्याची शक्यता आहे. विराट तिसऱ्या क्रमांकावर असल्याने शुभमन गिल कोणत्या स्थानी खेळणार, हे पाहणे रंजक ठरेल. मधल्या फळीत रिंकू सिंगचे स्थान पक्के मानले जात असून इशान किशन व के. एल. राहुल यांच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संजू सॅमसमला प्राधान्य दिले जाईल. शिवम दुबेचा अष्टपैलू पर्यायही भारताकडे उपलब्ध आहे.

मुकेश, आवेश, अर्शदीपवर मदार

आवेश खान, मुकेश कुमार व डावखुरा अर्शदीप सिंग या त्रिकुटावर वेगवान माऱ्याची मदार असेल. या तिघांपैकी दोन नक्कीच विश्वचषकासाठी भारतीय संघात असतील. जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. डावखुरा कुलदीप यादव हा प्रमुख फिरकीपटू असेल. त्याच्यासह रवी बिश्नोई, अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर हे फिरकीचे पर्याय भारताकडे आहेत. लेगस्पिनर युझवेंद्र चहलकडे या मालिकेसाठी दुर्लक्ष करण्यात आले आहे.

नव्या प्रयोगांचे द्रविडकडून संकेत

भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघ कोणकोणते प्रयोग या मालिकेत करू शकतो, याचे संकेत दिले. यशस्वीने यापूर्वीच्या दोन टी-२० मालिकांमध्ये सलामीवीराची भूमिका बजावली. त्यामुळे तो व रोहित सलामीला येतील, हे पक्के मानले जात आहे. मात्र द्रविड यांनी विराटही सलामीला येण्याचा पर्याय खुला ठेवला आहे.

“यशस्वीने सलामीवीर म्हणून भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. मात्र आम्ही सर्व पर्यायांची पडताळणी करून पाहणार आहोत. त्यामुळे विराट व रोहित सलामीला येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या जोडीने टी-२०मध्ये एकत्रित कधीच सलामीला फलंदाजी केलेली नसली, तरी ते आव्हानास सामोरे जातील,” असे द्रविड म्हणाले.

“संघात डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश असल्याने फलंदाजी क्रम त्यानुसारच आखण्यात येईल. मात्र एखादा फलंदाज डावखुरा असण्यापेक्षा त्याच्या कामगिरीला अधिक प्राधान्य दिले जाईल. रिंकू, तिलक व यशस्वी यांनी मिळालेल्या संधीचा पूरेपूर लाभ घेतला आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे,” असेही द्रविड यांनी आवर्जून नमूद केले.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

अफगाणिस्तान : इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमनुल्ला गुरबाझ, इक्रम अलिखिल, हझरतुल्ला झझई, रहमत शाह, नजीबुल्ला झादरान, मोहम्मद नबी, करिम जनत, अझमतुल्ला ओमरझाई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलाबदीन नईब.

- वेळ : सायंकाळी ७ वाजल्यापासून g थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप

logo
marathi.freepressjournal.in