भारत- आफ्रिका कसोटी मालिका: तिसऱ्या दिवशीच भारत चीत

सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्कवर झालेल्या या लढतीत आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर भारताचा दुसरा डाव ३४.१ षटकांत १३१ धावांतच संपुष्टात आला
भारत- आफ्रिका कसोटी मालिका: तिसऱ्या दिवशीच भारत चीत

सेंच्युरियन : रथी-महारथींचा समावेश असलेली भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या डावातही ढेपाळली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशीच तब्बल डावाने पराभव पत्करण्याची नामुष्की भारतावर ओढवली.

सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्कवर झालेल्या या लढतीत आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर भारताचा दुसरा डाव ३४.१ षटकांत १३१ धावांतच संपुष्टात आला. त्यामुळे आफ्रिकेने एक डाव व ३२ धावांनी भारताचा अक्षरश: फडशा पाडून दोन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कारकीर्दीतील अखेरची कसोटी मालिका खेळणाऱ्या डीन एल्गरला १८५ धावांच्या जिगरबाज खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. उभय संघांतील दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून सुरू होईल. मात्र पहिल्या सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघाचे आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाले. ३१ वर्षांत भारतीय संघ नवव्यांदा आफ्रिका दौऱ्यावर आला असून यंदा ते किमान मालिका बरोबरीत सोडवू शकणार का, इतकेच पाहावे लागेल.

तत्पूर्वी, बुधवारच्या ५ बाद २५६ धावांवरून पुढे खेळताना एल्गरने १५० धावांचा टप्पा गाठला. एल्गर व मार्को यान्सेन यांनी सहाव्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी रचून भारतीय गोलंदाजांना चांगलेच हैराण केले. यान्सेनने कसोटी कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावतानाच वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. अखेर शार्दूल ठाकूरने एल्गरला बाद करून ही जोडी फोडली. एल्गरने २८ चौकारांसह १८५ धावा करताना तब्बल ४२५ मिनिटे फलंदाजी केली. जसप्रीत बुमराने मग कॅगिसो रबाडा व नांद्रे बर्गर यांना झटपट बाद करून आफ्रिकेचा पहिला डाव १०८.४ षटकांत ४०८ धावांवर संपुष्टात आणला. कर्णधार टेम्बा बावुमा दुखापतीमुळे फलंदाजीस आला नाही. यान्सेन मात्र ११ चौकार व १ षटकारासह ८४ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून बुमराने चार, तर मोहम्मद सिराजने दोन बळी मिळवले. रविचंद्रन अश्विनने जेराल्ड कोएट्झेच्या (१९) रूपात एक गडी बाद केला.

आफ्रिकेने १६३ धावांची आघाडी घेतल्यामुळे दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज चोख प्रत्युत्तर देतील अशी अपेक्षा होती. मात्र रबाडा-बर्गर यांच्यापुढे आपल्या फलंदाजांनी गुडघे टेकले. रबाडाने रोहित शर्माचा शून्यावरच त्रिफळा उडवला, तर बर्गरने यशस्वी जैस्वालला ५ धावांवर माघारी पाठवले. मुंबईकरांची सलामी जोडी लवकर बाद झाल्याने त्यातून संघ अखेरपर्यंत सावरूच शकला नाही. युवा शुभमन गिलने झटपट २६ धावा केल्या. मात्र यान्सेनने त्याचा व श्रेयस अय्यरचा (६) त्रिफळा उडवून भारताला आणखी अडचणीत टाकले.

एका बाजूने फलंदाज बाद होत असताना विराट कोहलीने १२ चौकार व १ षटकारासह कारकीर्दीतील ३०वे अर्धशतक झळकावले. के. एल. राहुल (४), शार्दूल ठाकूर (२) हेसुद्धा यावेळी संघाला सावरू शकले नाहीत. अश्विनही पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. अखेर यान्सेनच्याच गोलंदाजीवर विराट बाद झाला व भारताच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. बर्गरने चार, यान्सेनने तीन, तर रबाडाने दोन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ६७.४ षटकांत सर्व बाद २४५ (के. एल. राहुल १०१, विराट कोहली ३८; कॅगिसो रबाडा ५/५९)

दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : १०८.४ षटकांत सर्व बाद ४०८ (डीन एल्गर १८५, मार्को यान्सेन नाबाद ८४; जसप्रीत बुमरा ४/६९)

भारत (दुसरा डाव) : ३४.१ षटकांत सर्व बाद १३१ (विराट कोहली ७६, शुभमन गिल २६; नांद्रे बर्गर ४/३३, मार्को यान्सेन ३/३६)

सामनावीर : डीन एल्गर

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in