
इंग्लंड क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड क्रिकेट टीमसोबत मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळत असतानाच यष्टिरक्षक आणि फलंदाज बेन फोक्सला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, कोरोनाची प्रकरणे अशीच समोर येत राहिली तर पुन्हा भारत आणि इंग्लंड यांच्यातील पुनर्नियोजित कसोटी सामना कोरोनामुळे पुन्हा रखडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
फोक्स हा लिड्समध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीच्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनचा भाग होता; पण तो कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या जागी आता सॅम बिलिंग्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी बेन फोक्स कोविड पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. यानंतर त्याला तत्काळ आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आले.
याबाबत इंग्लंड क्रिकेट मंडळाने (ईसीबी) सांगितले की, फोक्स संघात कधी परतणार, याबाबतची माहिती योग्य वेळी दिली जाईल. अशी आशा आहे की, तो येत्या १ जुलैपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी तंदुरुस्त होईल. जगभरात कोरोनाचे प्रमाण हळूहळू कमी होत असले, तरी ब्रिटनमधील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. अशा परिस्थितीत सध्या क्रिकेटमध्ये कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत.