पदकांच्या 'विजयादशमी'ने प्रारंभ; पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्याच दिवशी तब्बल ४ सुवर्ण

पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच दिवशी भारताने पदकांची विजयादशमी साजरी केली. जपान येथे सोमवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ४ सुवर्ण, ५ रौप्य व २ कांस्य अशी एकूण ११ पदकांची कमाई केली.
पदकांच्या 'विजयादशमी'ने प्रारंभ; पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्याच दिवशी तब्बल ४ सुवर्ण
पदकांच्या 'विजयादशमी'ने प्रारंभ; पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पहिल्याच दिवशी तब्बल ४ सुवर्णx
Published on: 

नागोया : पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच दिवशी भारताने पदकांची विजयादशमी साजरी केली. जपान येथे सोमवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ४ सुवर्ण, ५ रौप्य व २ कांस्य अशी एकूण ११ पदकांची कमाई केली.

भारतासाठी नेमबाजीत मोना अगरवालने सुवर्णपदक पटकावले. त्याशिवाय ॲथलेटिक्समधील पुरुषांच्या लांब उडीमध्ये निशाद कुमार, भालाफेकीत रिंकू हूडा व महिलांच्या १,५०० मीटर शर्यतीत सौम्या यांनी सोनेरी कामगिरी नोंदवली. ज्युदो, जलतरण खेळांतही भारताने रौप्य व कांस्य यश मिळवले. यामुळे भारताने पहिल्या दिवसअखेरीस पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले. चीन, जपान आणि उझबेकिस्तान अनुक्रमे पहिल्या तीन स्थानांवर आहेत. तिरंदाज शीतल देवी हिने महिलांच्या कंपाऊंड पात्रता फेरीत विश्वविक्रमाची बरोबरी केली, तसेच राकेश कुमारसह मिश्र सांघिक प्रकारात नवीन विश्वविक्रम नोंदवला.

निशाद, सौम्या आणि रिंकू यांची सुवर्ण भरारी

दोन वेळचा पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेता निशाद कुमार याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिल्याच लांब उडी (टी-४७) प्रकारात ७.११ मीटरची उडी मारत सुवर्णपदक जिंकले. वयाच्या सहाव्या वर्षी गवत कापण्याच्या यंत्रामुळे त्याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती; मात्र त्याने जिद्दीच्या जोरावर यश मिळवले.

महिलांच्या १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीतील टी१२ प्रकारात दृष्टिदोष असलेल्या सौम्याने ५ मिनिटे १२.३९ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत सुवर्ण जिंकले. भारताच्या वेंकटेश राधाला याच प्रकारात रौप्यपदक मिळाले.

पुरुषांच्या एफ४६ भालाफेक प्रकारात रिंकूने ६५.११ मीटर भालाफेक करत सुवर्ण, तर अजित सिंहने ६५.०२ मीटरसह रौप्यपदक जिंकले. दोघांनीही हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली.

ज्युदो, जलतरणातही पदके

दृष्टिदोष असलेल्या कोकिला कौशिकाल्टेने ज्युदोमधील महिलांच्या जे२-५२ किलो गटात रौप्यपदक पटकावले. अंतिम फेरीत तिला किर्गिस्तानच्या प्रतिस्पर्धीकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या जे१-७० किलो गटात कपिल परमारने कांस्यपदक जिंकले. जलतरणात रवी कार्तिक बुडिगिनाने पुरुषांच्या १०० मीटर फ्रीस्टाइल एस-१३ प्रकारात ५६.६८ सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले.

टेबल टेनिस, बॅडमिंटनमध्ये पदकांची आशा

टेबल टेनिसमध्ये भाविना पटेल, प्राची पांडे आणि सोनलबेन यांनी आपापल्या गटांच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताची किमान तीन पदके निश्चित होण्याचा मार्ग मोकळा झाला. प्राचीने सहाव्या गटात प्रथमच भारतासाठी आशियाई पॅरा स्पर्धेतील पदक निश्चित केले.

बॅडमिंटनमध्ये नितेश कुमार आणि तुळसीमती मुरुगेसन या जोडीने एसएल ३-एसयू ५ प्रकारातील मिश्र दुहेरीच्या गटात उपांत्य फेरी गाठली आणि पदक निश्चित केले. पॅरालिम्पिक विजेता नितेशने पुरुष एकेरीतही विजय मिळवला. ऋतिक रघुपतीनेही पुरुष एसयू५ एकेरीत विजय नोंदवला.

एकूणच, पहिल्याच दिवशी खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, सातत्य आणि उत्कृष्ट कामगिरी यामुळे स्पर्धेतील भारताच्या पदक मोहिमेला दमदार सुरुवात झाली.

मोनाचा सोनेरी निशाणा ; अवनीला रौप्य

महिलांच्या १० मीटर एअर रायफल एसएच-१ प्रकारात मोनाने सहाव्या स्थानावरून जोरदार पुनरागमन करत सुवर्णपदक पटकावले. तिने २५०.० गुणांसह आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेचा विक्रम नोंदवला. एसएच-१ वर्गीकरण अशा नेमबाजांसाठी असते ज्यांच्या शरीराच्या खालच्या भागात (पायांच्या संबंधित) अपंगत्व असते.

पॅरिस पॅरालिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या मोनाने अवघ्या ०.४ गुणांनी दोन वेळची पॅरालिम्पिक विजेती अवनी लेखराला मागे टाकले. अवनीला २४९.६ गुणांसह रौप्यपदक मिळाले. या विजयामुळे भारताला २०२८च्या लॉस एंजेलिस पॅरालिम्पिकसाठी या प्रकारातील दुसरा कोटा मिळाला. मोनाने यापूर्वी जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकून एक कोटा मिळवला होता. याच प्रकारात कोरियाच्या युन्री ली हिने कांस्यपदक पटकावले.

जयपूरच्या या दोन नेमबाजांमधील चुरस शेवटच्या शॉटपर्यंत कायम होती. निर्णायक शॉटच्या आधी मोनाकडे अवनीच्या तुलनेत ०.१ गुणांची अत्यंत निसटती आघाडी होती. मोनाचे २३९.१ आणि अवनीचे २३९.२ गुण होते. मोनाने शेवटच्या प्रयत्नात १०.८ गुणांचा उत्कृष्ट शॉट लगावला, तर अवनीला १०.५ गुण मिळवता आले. यामुळे ३८ वर्षीय आणि दोन मुलांची आई असलेल्या मोनाने सुवर्ण आपल्या नावावर केले.

“मला फक्त एकच गोष्ट माहीत होती. मला माझ्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करायचे होते आणि सर्वोत्तम कामगिरी करायची होती. माझा विश्वास होता की, जर मी असे केले, तर मी पुन्हा अव्वल स्थानी पोहोचू शकेन. त्यामुळे, जेव्हा मी पिछाडीवर होते आणि स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका होता, तेव्हा मी फारसा विचार केला नाही,” असे मोना म्हणाली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in