हार्दिकचा घणाघात व्यर्थ; ऑस्ट्रेलियाची भारतावर मात

विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून उभय संघांतील दुसरा सामना शुक्रवारी खेळवण्यात येईल.
हार्दिकचा घणाघात व्यर्थ; ऑस्ट्रेलियाची भारतावर मात

हार्दिक पंड्याने (३० चेंडूंत नाबाद ७१ धावा) साकारलेल्या अर्धशतकानंतरही भारताच्या पदरी निराशा पडली. कॅमेरून ग्रीन (३० चेंडूंत ६१) आणि मॅथ्यू वेड (२१ चेंडूंत नाबाद ४५) या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतावर चार गडी आणि चार चेंडू राखून मात केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून उभय संघांतील दुसरा सामना शुक्रवारी खेळवण्यात येईल. भारताने दिलेले २०९ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १९.२ षटकांत गाठले. तत्पूर्वी, हार्दिक आणि सलामीवीर के. एल. राहुल (३५ चेंडूंत ५५) यांनी फटकावलेल्या अर्धशतकांच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात सहा बाद २०८ धावांपर्यंत मजल मारली. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताने कर्णधार रोहित शर्मा (११) आणि विराट कोहली (२) यांना पहिल्या पाच षट्कांत ३५ धावांतच गमावल्यामुळे फिंचचा निर्णय योग्य ठरणार, असे वाटले. त्यानंतर मात्र सूर्यकुमार यादव आणि राहुल यांनी फटकेबाजीस प्रारंभ केला. सूर्यकुमारने २५ चेंडूंत दोन चौकार आणि चार षट्कारांसह ४६ धावा फटकावल्या. त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. सूर्यकुमार व राहुलने तिसऱ्या गड्यासाठी ६८ धावांची भर घातली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in