मुंबई : सलामीवीर फोबे लिचफील्ड (८९ चेंडूंत ७८ धावा), एलिस पेरी (७२ चेंडूंत ७५) आणि ताहिला मॅकग्रा (५५ चेंडूंत ६८) या तिघींनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा ६ गडी व २१ चेंडू राखून सहज पराभव केला. भारताच्या जेमिमा रॉड्रिग्ज (७७ चेंडूंत ८२) आणि पूजा वस्त्रकार (४६ चेंडूंत ६२) यांची झुंज व्यर्थ ठरली.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत भारताने दिलेले २८३ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ४६.३ षटकांतच पार केले. कर्णधार एलिसा हिली (०) पहिल्याच षटकात बाद झाल्यावर लिचफील्ड व पेरी यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी रचून विजयाचा पाया रचला. ही जोडी माघारी परतल्यावर मॅकग्रा व बेथ मूनी (४२) यांनी चौथ्या विकेटसाठी ८८ धावांची भर घातली. मॅकग्रानेच विजयी चौकार लगावला. उभय संघांतील दुसरी लढत शनिवारी खेळवण्यात येईल.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताने अडखळत्या सुरुवातीतून सावरत ५० षटकांत ८ बाद २८२ अशी धावसंख्या उभारली. स्मृती मानधनाच्या अनुपस्थितीत कर्णधार हरमनप्रीत कौर (९), शफाली वर्मा (१), रिचा घोष (२१), दीप्ती शर्मा (२१) यांनी निराशा केली. यास्तिका भाटियाने ४९ धावांचे योगदान दिले. मात्र ७ बाद १८२ वरून जेमिमा व पूजा यांनी आठव्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचून भारताला पावणेतीनशे धावांपलीकडे नेले.