भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका : अक्षरपुढे ऑस्ट्रेलिया निरुत्तर! चौथ्या सामन्यात भारताचे ४८ धावांनी वर्चस्व; मालिकेत विजयी आघाडी

डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने गुरुवारी अष्टपैलू चमक दाखवताना ११ चेंडूंत नाबाद २१ धावा फटकावल्या व २० धावांत २ निर्णायक बळी मिळवले. त्यामुळेच भारताने चौथ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी सहज पराभव केला.
भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका : अक्षरपुढे ऑस्ट्रेलिया निरुत्तर! चौथ्या सामन्यात भारताचे ४८ धावांनी वर्चस्व; मालिकेत विजयी आघाडी
Published on

गोल्ड कोस्ट : डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने गुरुवारी अष्टपैलू चमक दाखवताना ११ चेंडूंत नाबाद २१ धावा फटकावल्या व २० धावांत २ निर्णायक बळी मिळवले. त्यामुळेच भारताने चौथ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी सहज पराभव केला. याबरोबरच भारताने पाच लढतींच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली असून शनिवारी अखेरचा सामना खेळवण्यात येईल.

गोल्ड कोस्ट येथील करारा ओव्हल मैदानावर झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने दिलेल्या १६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १८.२ षटकांत ११९ धावांत गारद झाला. कर्णधार मिचेल मार्शने त्यांच्यासाठी सर्वाधिक ३० धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने ३, तर अक्षर व शिवम दुबे यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. तसेच अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा व वरुण चक्रवर्ती यांनीही प्रत्येकी १ बळी मिळवून योगदान दिले. त्यामुळे भारताने १६७ धावांचा यशस्वी बचाव केला.

दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका काही दिवसांपूर्वी पार पडली. मार्शच्या नेतृत्वात खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतावर २-१ असा विजय मिळवला. मात्र त्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहितने शतक, तर विराटने अर्धशतक झळकावून चाहत्यांची मने जिंकली. तसेच अद्यापही आपल्यात धमक असून २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आपण शर्यतीत असल्याचे दाखवले. मात्र आता भारताच्या युवा ब्रिगेडकडे सर्वांचे लक्ष असेल.

पुढील वर्षी मार्च महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक रंगणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने संघबांधणी करण्यासह प्रयोगांची चाचपणी करण्यासाठी भारताला या मालिकेत संधी मिळेल. सूर्यकुमारच्या नेतृत्वात सप्टेंबरमध्ये भारताने दुबईत नवव्यांदा आशिया चषक टी-२० स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. या मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धसुद्धा टी-२० मालिका खेळणार आहे.

उभय संघांतील कॅनबरा येथील पहिली लढत पावसामुळे रद्द झाली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर सहज वर्चस्व गाजवले. मग होबार्ट येथील तिसऱ्या सामन्यात भारताने पलटवार केला व मालिकेत बरोबरी साधली. चौथ्या सामन्यासाठी भारताने संघात एकही बदल केला नाही. ऑस्ट्रेलियाने पुन्हा नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

अभिषेक शर्मा व शुभमन गिल यांनी ४० चेंडूंत ५६ धावांची सलामी नोंदवली. खेळपट्टी काहीशी आव्हानात्मक असल्याने येथे पॉवरप्लेनंतर फटकेबाजी करणे सोपे नव्हते. तसेच फिरकीपटूंना उत्तम सहाय्य लाभत होते. झाम्पाने अभिषेकला (२८) बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर नॅथन एलिसने गिल (४६) व शिवम दुबेचा (२२) अडसर दूर केला. सूर्यकुमारने १० चेंडूंत २० धावा केल्या. मात्र तो बार्टलेटच्या गोलंदाजीवर फसला. झाम्पानेच मग तिलक वर्मा (५) व जितेश शर्मा (३) यांनाही जाळ्यात अडकवले. आठव्या क्रमांकावर आलेल्या अक्षरने मात्र ११ चेंडूंत नाबाद २१ धावा फटकावून भारताला २० षटकांत ८ बाद १६७ धावांपर्यंत मजल मारून दिली. झाम्पा व एलिसने प्रत्येकी ३ बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात केली. अक्षरने मग मॅथ्यू शॉर्टला २५ धावांवर पायचीत पकडले. त्यानेच जोश इंग्लिसचा (१२) त्रिफळाही उडवला. येथून मग कांगारूंची गाडी घसरली. दुबेने मार्श (३०) व टिम डेव्हिड (१४) या धोकादायक फलंदाजांना माघारी पाठवले. ग्लेन मॅक्सवेल (२) अपयशी ठरला व वरुणच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. अखेरीस सुंदरने तळाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळून ऑस्ट्रेलियाचा डाव ११९ धावांत संपुष्टात आणला. ३ बाद ९१ वरून २८ धावांत ऑस्ट्रेलियाने उर्वरित ७ विकेट्स गमावल्या.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे जोश हेझलवूड, ट्रेव्हिस हेड हे खेळाडू उर्वरित मालिकेचा भाग नसतील. ॲशेस कसोटी मालिकेच्या तयारीसाठी त्यांना वेळ देण्यात आला आहे. अशा स्थितीत त्यांना नॅथन एलिस, बेन ड्वारशुइस व झेव्हियर बार्टलेट या वेगवान गोलंदाजांकडून अपेक्षा होत्या. फलंदाजीत मार्शसह जोश इंग्लिस, टिम डेव्हिड व ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर कांगारूंची भिस्त होती. भारतीय संघ आता थेट २०२७नंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे टी-२० मालिकेतील पाचवी लढत जिंकून मायदेशी परतण्यासाठी भारत उत्सुक असेल.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ८ बाद १६७ (शुभमन गिल ४६, अभिषेक शर्मा २८; नॅथन एलिस ३/२६, झाम्पा ३/४५) विजयी वि. g ऑस्ट्रेलिया : १८.२ षटकांत सर्व बाद ११९ (मिचेल मार्श ३०, मॅथ्यू शॉर्ट २५; वॉशिंग्टन सुंदर ३/३, अक्षर पटेल २/२०)

सामनावीर : अक्षर पटेल

उभय संघांत आतापर्यंत ३६ टी-२० सामने झाले असून भारताने त्यापैकी २३, तर ऑस्ट्रेलियाने १२ लढती जिंकल्या आहेत. दोन सामने रद्द करण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in