भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका: भारतीय महिलांकडून ऑस्ट्रेलियाचा धुव्वा

नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेले १४२ धावांचे लक्ष्य भारताने १७.४ षटकांत गाठून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका: भारतीय महिलांकडून ऑस्ट्रेलियाचा धुव्वा
Published on

नवी मुंबई : शफाली वर्मा (४४ चेंडूंत नाबाद ६४ धावा) आणि महाराष्ट्राची स्मृती मानधना (५२ चेंडूंत ५४ धावा) या सलामीवीरांनी झळकावलेल्या अर्धशतकांना तितास साधूच्या (१७ धावांत ४ बळी) कारकीर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजीची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारतीय महिला संघाने पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ९ गडी आणि १४ चेंडू राखून धुव्वा उडवला.

नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेले १४२ धावांचे लक्ष्य भारताने १७.४ षटकांत गाठून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. उभय संघांतील दुसरी लढत रविवारी याच मैदानावर खेळवण्यात येईल. मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने (नाबाद ६) विजयी चौकार लगावला. स्मृती व शफाली यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी करताना ९२ चेंडूंतच १३७ धावांची सलामी नोंदवली. स्मृतीने ७ चौकार व १ षटकार लगावला. जॉर्जिया वेरहॅमच्या गोलंदाजीवर मॅकग्राने तिचा अफलातून झेल पकडला. शफालीने मात्र अखेरपर्यंत नाबाद राहताना ६ चौकार व ३ षटकार फटकावले.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव १९.२ षटकांत १४१ धावांत संपुष्टात आला. १९ वर्षीय मध्यमगती गोलंदाज तितासने बेथ मूनी (१७), ताहिला मॅकग्रा (०), ॲश्लेघ गार्डनर (०) आणि ॲनाबेल सदरलँड (१२) यांचे महत्त्वपूर्ण बळी मिळवले. युवा फोबे लिचफील्ड (३२ चेंडूंत ४९) आणि एलिस पेरी (३० चेंडूंत ३७) यांनी पाचव्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. फिरकीपटू अमनजोत कौरने लिचफील्डचा, तर दीप्ती शर्माने पेरीचा अडथळा दूर केला.

logo
marathi.freepressjournal.in