
सिडनी : ३७ वर्षीय रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी स्वत:हून विश्रांती घेतली आहे, असे कर्णधार जसप्रीत बुमरा शुक्रवारी नाणेफेकीच्या वेळीस म्हणाला. त्याचवेळी स्पष्ट झाले की विश्रांतीच्या नावाखाली रोहितला संघातून डच्चू देण्यात आला असून कदाचित त्याची कसोटी कारकीर्दही संपुष्टात आली आहे. या लढतीनंतर जून महिन्यापर्यंत भारतीय संघ एकही कसोटी सामना खेळणार नाही. त्यामुळे मेलबर्नला झालेली चौथी कसोटीच रोहितच्या कारकीर्दीतील अखेरची ठरली, असे म्हटले जात आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यातच प्रशिक्षक गौतम गंभीरने गुरुवारी पत्रकार परिषदेत रोहितच्या समावेशाविषयी साशंका व्यक्त केली होती. रोहितने या मालिकेतील ३ कसोटींमध्ये फक्त ३१ धावा केल्या आहेत. मुख्य म्हणजे त्याला एकाही डावात १० पेक्षा अधिक धावा करता आलेल्या नाहीत. न्यूझीलंडविरुद्धही मायदेशात रोहितची सुमार कामगिरी सुरू होती. ती मालिका भारताने ०-३ अशा गमावली. मधल्या फळीत अपयशी ठरल्यावर सलामीलाही त्याला छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे फक्त कर्णधार असल्याने रोहित संघातील स्थान अडवून धरत आहे, अशी प्रतिक्रिया काही चाहत्यांनी तसेच माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केली होती. शुक्रवारी नाणेफेकीसाठी बुमरा कोट परिधान करून मैदानात उतरला, त्यावेळी रोहित या लढतीत खेळणार नाही, हे स्पष्ट झाले.
“आमच्या कर्णधाराने स्वत:हून पुढाकार घेत संघ हितासाठी या कसोटीतून माघार घेतली आहे. त्यामुळे गिलचे संघात पुनरागमन झाले आहे,” असे बुमरा नाणेफेकीच्या वेळीस म्हणाला. मात्र प्रत्यक्षात काही दिवसांपूर्वी ड्रेसिंग रूममध्ये गंभीर व रोहित यांच्यात झालेले मतभेद यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा आहे. तसेच सरावात व पहिल्या दिवशी पॅव्हेलियनमध्येही रोहित गंभीरशी फारसा संवाद साधताना दिसून आला नाही.
भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या कृतीमुळे मात्र सध्या दोन गट निर्माण झाले आहे. काही माजी क्रिकेटपटू तसेच चाहते रोहितला संघाने चुकीची वागणूक दिली, असे म्हटले. संघातील सर्वच फलंदाज जवळपास संघर्ष करत असताना फक्त २ मालिकांच्या आधारे रोहितला वगळण्यात आले आहे, असे ते म्हणाले. तर काहींनी रोहितची कसोटी संघात जागा बनत नाही. त्याने या मालिकेनंतर निवृत्ती जाहीर करावी, असेही म्हटले.
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांनी मात्र स्पष्टपणे रोहितची कर्णधारपदासह भारतीय संघातूनही गच्छंती करण्यात आली आहे, असे मत नोंदवले. तसेच विदेशातील माजी क्रिकेटपटूंनीही रोहितविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आता रोहित माध्यमांसमोर येईल, तेव्हाच या प्रकरणामागील सर्व रहस्यांचा खुलासा होईल.
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपासून ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीपर्यंत झालेल्या १० लढतींमध्ये भारताचा पहिला डाव ८ वेळा २०० धावांच्या आत संपुष्टात आला. यावरूनच भारतीय फलंदाजांचा संघर्ष स्पष्ट होतो.
बुमराने यावेळी फलंदाजीत २२ धावांचे योगदान दिले. भारतीय कर्णधाराकडून या मालिकेतील ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. कारण यापूर्वीच्या तीन सामन्यांत रोहितला एकाही डावात १० धावांचा आकडा गाठता आला नाही.
विराटची गेल्या १० कसोटी सामन्यांतील फलंदाजीची सरासरी १२.६ इतकी घसरली आहे. शुक्रवारी ६९ चेंडू खेळूनही त्याला एक चौकार लगावता आला नाही. २०२१नंतर प्रथमच असे घडले.
माजी क्रिकेटपटूंची मतमतांतरे
कर्णधाराला तुम्ही विश्रांतीचे कारण देत संघाबाहेर करू शकत नाही. यामुळे आपण चाहत्यांना चुकीचा संदेश देत आहोत. मार्क टेलर, मोहम्मद अझरुद्दीन यांसारखे खेळाडू जवळपास वर्षभर फलंदाजीत अपयशी ठरत असूनही आपापल्या संघाचे कर्णधार होते. रोहितने भारतीय संघासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्याला मालिकेच्या मध्यात अशाप्रकारे विश्रांती देणे पूर्णपणे चुकीचे आहे.
- नवज्योत सिंग सिद्धू
भारतीय संघ डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीसाठी पात्र न ठरल्यास मेलबर्नची कसोटी रोहितच्या कारकीर्दीतील अखेरची ठरली, असेच मानायला लागेल. २०२५ ते २०२७ या कालावधीत रोहितविषयी निवड समिती विचार करेल, असे वाटत नाही.
- सुनील गावस्कर
कर्णधार म्हणून रोहितने स्वत:हून विश्रांती घेणे कौतुकास्पद आहे. मात्र ही काळाची गरज आहे, असे मला वाटते. गेल्या काही मालिकांपासून त्याचे पदलालित्य हरवले आहे. धावा होत नसल्याने त्याचा प्रभाव कर्णधारपदावरही झाला. जून महिन्यापर्यंत भारताचा एकही कसोटी सामना नाही. त्यामुळे पाचव्या कसोटीच्या अखेरीस रोहित निवृत्ती जाहीर करू शकतो.
- रवी शास्त्री
रोहितने घेतलेला निर्णय संघहिताचा आहे. त्याने नेहमीच अशाप्रकारचे निर्णय घेतलेले आहेत. मात्र याविषयी उगाच विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रशिक्षक अथवा संघ व्यवस्थापनाला आणखी चांगल्याप्रकारे हे सादर करता आले असते. कारण सगळीकडे रोहितला वगळल्याची चर्चा सुरू आहे.
- संजय मांजरेकर