बॉर्डर-गावस्कर मालिकेत यंदा पाच कसोटी; भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २२ नोव्हेंबरपासून प्रारंभ

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत २-१ असे नमवून बॉर्डर-गावस्कर करंडक आपल्याकडे राखला आहे. त्याशिवाय गेल्या दोन दौऱ्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे.
बॉर्डर-गावस्कर मालिकेत यंदा पाच कसोटी; भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २२ नोव्हेंबरपासून प्रारंभ

मेलबर्न : प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी भारत-ऑस्ट्रेलिया आता ४ ऐवजी ५ कसोटी सामने खेळणार आहेत. २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथील कसोटीद्वारे भारत-ऑस्ट्रेलियातील या मालिकेला प्रारंभ होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी मालिकेचे वेळापत्रक तसेच ठिकाण जाहीर करतानाच ॲडलेड येथे प्रकाशझोतातील (डे-नाईट) कसोटी खेळवण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत २-१ असे नमवून बॉर्डर-गावस्कर करंडक आपल्याकडे राखला आहे. त्याशिवाय गेल्या दोन दौऱ्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. २०१८-१९मध्ये विराट कोहलीच्या, तर २०२०-२१मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत २-१ असे पराभूत केले. दर वेळेस मालिकेत ४ कसोटींचाच समावेश होता. मात्र आगामी दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळेल. १९९१-९२नंतर प्रथमच उभय संघ एकमेकांविरुद्ध पाच कसोटी खेळतील.

पहिल्या कसोटीनंतर ॲडलेड येथे दुसरी कसोटी गुलाबी चेंडू खेळवण्यात येणार असल्याने या लढतीपूर्वी ९ दिवसांच्या तयारीचा अवधी आहे. तसेच भारतीय संघ यादरम्यान एक सराव सामनाही खेळणार असल्याचे समजते. २०२०-२१मध्ये प्रकाशझोतातील कसोटीत भारतीय संघ ३६ धावांत गारद झाला होता.

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली कसोटी : २२ ते २६ नोव्हेंबर (पर्थ)

  • दुसरी कसोटी : ६ ते १० डिसेंबर (ॲडलेड)

  • तिसरी कसोटी : १४ ते १८ डिसेंबर (ब्रिस्बेन)

  • चौथी कसोटी : २६ ते ३० डिसेंबर (मेलबर्न)

  • पाचवी कसोटी : ३ ते ७ जानेवारी (सिडनी)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in