Asia Cup 2025 : आणखी एका सुपर विजयाचे लक्ष्य! भारताची आज बांगलादेशशी गाठ; सलामीवीरांच्या कामगिरीकडे नजरा

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत आशिया चषक टी-२० स्पर्धेत दमदार खेळ करत आहे. सुपर-फोर फेरीत बुधवारी दुबईत अफगाणिस्तानविरुद्ध आणखी एक विजय मिळवणे हे त्यांचे लक्ष्य असेल.
Asia Cup 2025 : आणखी एका सुपर विजयाचे लक्ष्य! भारताची आज बांगलादेशशी गाठ; सलामीवीरांच्या कामगिरीकडे नजरा
Photo : X (@Sportskeeda)
Published on

दुबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ यंदाच्या आशिया चषक टी-२० स्पर्धेत जेतेपदाच्या प्रबळ दावेदाराला साजेशा खेळ करत आहे. आता बुधवारी दुबईच्या रणांगणात सुपर-फोर फेरीत आणखी एक सुपर विजय नोंदवण्याचे भारताचे ध्येय असेल. त्यांची बुधवारी अफगाणिस्तानशी गाठ पडणार आहे.

यंदा ९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत आशिया चषकाच्या १७व्या पर्वाची रणधुमाळी रंगत आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशियाई खंडातील देशांना सराव मिळावा, म्हणून यंदाचा आशिया चषक टी-२० प्रकारात खेळवण्यात येईल. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले असून त्यांची दोन गटांत विभागणी करण्यात आली होती. भारतीय संघासह पाकिस्तान, यूएई व ओमान अ-गटात आहेत. तर ब-गटात बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान व हाँगकाँग हे संघ आहेत. त्यांपैकी अ-गटातून भारत, पाकिस्तानने, तर ब-गटातून श्रीलंका, बांगलादेशने सुपर-फोर फेरी गाठली.

रविवारी भारताने सुपर-फोर फेरीतील पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ७ गडी राखून धूळ चारली. भारताने आठवडाभराच्या कालावधीत पाकिस्तानला दुसऱ्यांदा नमवले. फिरकीपटूंनी केलेल्या चमकदार कामगिरीला डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा व शुभमन गिल यांच्या धडाकेबाज फलंदाजीची सुरेख साथ लाभली. त्यामुळे भारताने सहज विजय नोंदवला. आता बुधवारची लढत जिंकून अंतिम फेरीतील स्थान पक्के करण्याची भारताला संधी आहे.

दुसरीकडे, लिटन दासच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बांगलादेशने सुपर-फोर फेरीतील पहिल्या लढतीत श्रीलंकेला धक्का दिला. त्यांनी १६८ धावांचे लक्ष्य गाठून साखळी फेरीत श्रीलंकेकडून पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा वचपा घेतला. त्यामुळे भारताला गाफील राहून चालणार नाही. टी-२० प्रकारात कोणताही संघ वरचढ ठरू शकतो. त्यातच बांगलादेशच्या संघातही चांगले फिरकीपटू असल्याने चाहत्यांना या लढतीत फिरकीपटूंमधील जुगलबंदी पाहायला मिळेल.

दरम्यान, भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असला तरी सर्व सामने अमिरातीतील दुबई व अबुधाबी येथे होतील. १९८४पासून आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत भारताचेच वर्चस्व दिसून आले आहे. आतापर्यंत भारताने सर्वाधिक ८ वेळा ही स्पर्धा जिंकली असून श्रीलंका ६ जेतेपदांसह दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तानने दोन वेळा जेतेपद मिळवले आहे. २०२२ नंतर पुन्हा एकदा टी-२० स्वरूपात ही स्पर्धा होत आहे. त्यावेळी श्रीलंकेने जेतेपद पटकावले होते, तर २०२३मध्ये एकदिवसीय स्वरूपात झालेल्या आशिया चषकात भारताने बाजी मारली. एकंदर तिसऱ्यांदा ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये होत आहे.

बुमराकडून सुधारणा अपेक्षित

एकीकडे चायनामन कुलदीप यादव व वरुण चक्रवर्ती यांची फिरकी जोडी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत असताना भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला संघर्ष करावा लागत आहे. गेल्या लढतीत बुमराने ४ षटकांत एकही बळी न मिळवता तब्बल ४५ धावा लुटल्या. त्यामुळे तो लवकरच लयीत परतेल, अशी आशा आहे. शिवम दुबेची मध्यमगती गोलंदाजी संघासाठी फायदेशीर ठरत आहे. अक्षर पटेल व हार्दिक गोलंदाजीतही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. कुलदीपने स्पर्धेत सर्वाधिक ९ बळी घेतले आहेत. त्यामुळे एकूणच भारताचा संघ कागदावर फार वरचढ वाटत आहे.

सॅमसनऐवजी जितेशला संधी?

या स्पर्धेत आतापर्यंत अभिषेकने सर्वाधिक १७४ धावा केल्या आहेत. त्याशिवाय गिलही उत्तम लयीत आहे. या दोघांही जोडी पुन्हा एकदा आक्रमण करण्यास उत्सुक असेल. सूर्यकुमार गेल्या सामन्यातील अपयश विसरून पुन्हा छाप पाडण्यास आतुर असेल. तिलक वर्मा व हार्दिक पंड्या यांनीही संधी मिळेल, तेव्हा चमक दाखवली. मात्र संजू सॅमसनच्या फलंदाजीची भारताचा चिंता आहे. ओमानविरुद्ध त्याने अर्धशतक झळकावले असले, तरी पाकिस्तानविरुद्ध मधल्या फळीत त्याने १७ चेंडूंत फक्त १३ धावा केल्या. पहिल्या तिघांतच सॅमसन प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे गरज पडल्यास जितेश शर्माला सॅमसनच्या जागी संधी दिली जाऊ शकते. आयपीएलमध्ये बंगळुरू संघाकडून खेळताना जितेशने पाचव्या-सहाव्या स्थानी अफलातून फटकेबाजी केली.

भारत-बांगलादेश यांच्यात आतापर्यंत झालेल्या १७ टी-२० सामन्यांत भारताने १६ वेळा विजय मिळवला आहे. बांगलादेशला फक्त एकदाच यश लाभले आहे.

खेळपट्टी आणि वातावरण

  • दुबईत सायंकाळी होणाऱ्या टी-२० सामन्यांत दवाचा घटक नेहमीच निर्णायक ठरतो. बुधवारीही वातावरण तसेच असेल. चॅम्पियन्स ट्रॉफीत येथे भारताने फिरकीच्या बळावर वर्चस्व गाजवले. त्यामुळे यावेळीही फिरकीपटूंना सहाय्य लाभेल.

  • त्याशिवाय सपाट खेळपट्ट्यांवर धावांचा पाठलाग करणे सोपे जाईल. दुबईत यावेळी उष्णता मात्र मोठ्या प्रमाणात असल्याने दोन्ही संघांतील खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा कस लागेल.

  • भारताने या स्पर्धेत आतापर्यंत ४ पैकी ३ सामन्यांत धावांचा यशस्वी पाठलाग केला, तर ओमानविरुद्ध त्यांनी धावांचा बचाव केला.

logo
marathi.freepressjournal.in