संकटमोचक अश्विन! झळकावले कसोटीतील सहावे शतक, बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत सावरला भारताचा डाव

India-Bangladesh Test Series: ६ बाद १४४ अशा स्थितीतून अनुभवी अश्विनने (११२ चेंडूंत नाबाद १०२ धावा) कसोटी कारकीर्दीतील झुंजार सहावे शतक साकारले. त्यामुळे भारताने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पिछाडीवरून सरशी साधत वर्चस्व प्रस्थापित केले.
संकटमोचक अश्विन! झळकावले कसोटीतील सहावे शतक, बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत सावरला भारताचा डाव
PTI
Published on

चेन्नई : एका दिवसापूर्वीच वयाची ३८ वर्षे पूर्ण करणाऱ्या रविचंद्रन अश्विनने गुरुवारी जणू संपूर्ण भारताला वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट दिले. ६ बाद १४४ अशा स्थितीतून अनुभवी अश्विनने (११२ चेंडूंत नाबाद १०२ धावा) कसोटी कारकीर्दीतील झुंजार सहावे शतक साकारले. त्यामुळे भारताने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पिछाडीवरून सरशी साधत वर्चस्व प्रस्थापित केले. पहिल्या दिवसअखेर भारताने ८० षटकांत ६ बाद ३३९ धावांपर्यंत मजल मारली आहे.

घरच्या मैदानात खेळणाऱ्या अश्विनला मुंबईकर यशस्वी जैस्वाल (११८ चेंडूंत ५६ धावा) आणि रवींद्र जडेजा (११७ चेंडूंत नाबाद ८६ धावा) या डावखुऱ्या फलंदाजांच्या अर्धशतकांची सुरेख साथ लाभली. दिवसअखेर अश्विन व जडेजा यांची जोडी नाबाद असून या दोघांनी सातव्या विकेटसाठी १९५ धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी या जोडीसह भारताचे तळाचे फलंदाज बांगलादेशला किती सतावणार, हे पाहणे रंजक ठरेल.

तत्पूर्वी, चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम या स्टेडियमवर सुरू असलेल्या उभय संघांतील या कसोटीत बांगलादेशचा कर्णधार नजमूल होसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. २४ वर्षीय वेगवान गोलंदाज हसन महमूदच्या भेदक माऱ्यापुढे भारताची एकवेळ भंबेरी उडाली. कर्णधार रोहित शर्मा (६), शुभमन गिल (०) व विराट कोहली (६) यांना महमूदने जाळ्यात अडकवले. रोहितचा शांतोने स्लीपमध्ये झेल टिपला. तर गिल लेग-साइडवरील चेंडूवर दुर्दैवी ठरला. विराट मात्र पुन्हा एकदा ऑफ-स्टम्पबाहेरील चेंडूला छेडताना बाद झाला.

३ बाद ३४ स्थितीतून यशस्वी व जवळपास ७०० दिवसांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा यष्टिरक्षक ऋषभ पंत यांनी संघाचा डोलारा सावरला. या दोघांनी उपहारापर्यंत भारताला ३ बाद ८८ धावांपर्यंत मजल मारून दिली. दुसऱ्या सत्रात २२ वर्षीय यशस्वीने पाचवे अर्धशतक साकारले. यशस्वी व पंतने चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भर घातली. मात्र महमूदने पंतला ३९ धावांवर बाद करून भारताचा चौथा झटका दिला. त्यानंतर नाहिद राणाने यशस्वीला (५६), तर फिरकीपटू मेहदी हसन मिराजने के. एल. राहुलला (१६) माघारी पाठवून भारताला ६ बाद १४४ अशा संकटात टाकले.

तेथून अश्विन व जडेजा यांनी संघाला सावरताना चहापानापर्यंत भारताला ६ बाद १७६ धावांपर्यंत नेले. तिसऱ्या सत्रात अश्विनने विशेषत: आक्रमक फलंदाजी केली. त्यांनी अखेरच्या सत्रातील ३२ षटकांत तब्बल १६३ धावा कुटल्या. १० चौकार व २ षटकारांसह दिवसाच्या ७८व्या षटकात अश्विनने शतक साकारले. अश्विनने ३ वर्षांनी कसोटीत शतक झळकावण्याचा पराक्रम केला. तर जडेजानेसुद्धा १० चौकार व २ षटकारांसह अर्धशतक झळकावून शतकाच्या दिशेने कूच केली आहे. त्यामुळे भारतीय संघ ४०० धावांपर्यंत मजल मारण्याची शक्यता आहे. बांगलादेशसाठी महमूदने ४, तर नाहिद व हसनने प्रत्येकी १ बळी मिळवला आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ८० षटकांत ६ बाद ३३९ (रविचंद्रन अश्विन नाबाद १०२, रवींद्र जडेजा नाबाद ८६, यशस्वी जैस्वाल ५६, ऋषभ पंत ३९; हसन महमूद ४/५८)

> अश्विनने कसोटी कारकीर्दीतील सहावे शतक साकारले. त्याने आतापर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध चार, तर इंग्लंड व बांगलादेशविरुद्ध प्रत्येकी एक शतक झळकावले आहे.

> अश्विनचे हे घरच्या मैदानात सलग दुसरे शतक ठरले. यापूर्वी २०२१मध्ये इंग्लंडविरुद्धही त्याने या मैदानात शतक साकारले होते. तसेच त्याने १०८ चेंडूंत शतक झळकावून कारकीर्दीतील आतापर्यंतचे वेगवान कसोटी शतक पूर्ण केले.

कुलदीपऐवजी आकाशला संधी

भारताने या कसोटीसाठी ३ वेगवान व २ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशनेसुद्धा हेच सूत्र अवलंबले. भारताने आकाश दीप, जसप्रीत बुमरा व मोहम्मद सिराज यांना संधी दिली. त्यामुळे फिरकीपटू कुलदीप यादवला संघाबाहेर रहावे लागले. घरच्या मैदानात खेळताना भारताने ५ वर्षांनी प्रथमच तीन वेगवान गोलंदाजांना अंतिम संघात स्थान दिले. यापूर्वी २०१९मध्ये बांगलादेशविरुद्ध डे-नाइट कसोटीत भारताने उमेश यादव, इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांचे त्रिकुट खेळवले होते. तसेच यष्टिरक्षक म्हणून पंतला प्राधान्य देत राहुलला भारताने सहाव्या क्रमांकावर खेळवण्याचे ठरवले. पुढील सामन्यातही पंतच त्याच्या आधी फलंदाजीस येण्याची शक्यता अधिक आहे.

लाल मातीच्या खेळपट्टीवर फलंदाजी करायला मला नेहमीच आवडते. त्यामुळे मी पंतच्या शैलीत दुसऱ्या चेंडूपासूनच चौकार लगावण्यास सुरुवात केली. या खेळपट्टीवर तुम्ही सातत्याने बचाव केलात, तर धावाही होणार नाहीत व तुम्ही गोलंदाजाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी व जडेजाने धावा काढण्यावर भर दिला.

- रविचंद्रन अश्विन

logo
marathi.freepressjournal.in