भारताच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात घाबरून बचावात्मक पवित्रा घेतला -माजी प्रशिक्षक रवी शास्त्री

पहिल्यांदा फलंदाजी करताना ४१६ धावा केल्यानंतर इंग्लंडला २८४ धावात गुंडाळत पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतली होती.
भारताच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात घाबरून  बचावात्मक पवित्रा घेतला -माजी प्रशिक्षक रवी शास्त्री
Published on

गेल्या वर्षीच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पुनर्नियोजित पाचव्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात घाबरून बचावात्मक पवित्रा घेतला. त्यामुळे इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करता आले, असे रोखठोक मत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

भारताने पाचव्या कसोटीत पहिल्यांदा फलंदाजी करताना ४१६ धावा केल्यानंतर इंग्लंडला २८४ धावात गुंडाळत पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी केली. त्यांना दुसऱ्या डावात २४५ धावांपर्यंतच मजल मारता आली. याबाबत या कसोटी सामन्याचे स्काय स्पोर्ट्सवर समालोचन करणाऱ्या रवी शास्त्रींनी सांगितले की, भारताने ज्या प्रकारे दुसऱ्या डावात फलंदाजी केली ते चित्र निराशाजनक होते. आपण दमदार फलंदाजी केली असती इंग्लंडला सामन्यात पुनरागमनाची संधीच मिळाली नसती.

ते पुढे म्हणाले की, भारतीय संघाने दोन सत्रांपर्यंत फलंदाजी करणे गरजेचे होते. मला असे वाटते की ते चौथ्या दिवशी बचावात्मक पवित्र्यात गेले. ते चौथ्या दिवशी घाबरले होते. विशेषकरून उपाहारानंतर त्यांना भीती वाटली. विकेट गेल्यानंतरही ते धोका पत्करून आक्रमक खेळू शकले असते. त्यावेळी सामन्यात धावा करणे खूप गरजेचे होते. ते खूपच बचावात्मक पवित्र्यात गेले. त्यांनी विकेट लवकर गमावले. यामुळे इंग्लंडला फलंदाजीसाठी बराच वेळ मिळाला.

शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना गेल्या वर्षी भारताने इंग्लंडमधील कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र मालिकेतील पाचवा सामना हा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आला होता.

logo
marathi.freepressjournal.in