अश्विनपुढे बांगलादेश पुन्हा ढेर! पहिल्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय, दुसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा

अनुभवी रविचंद्रन अश्विन पुन्हा एकदा बांगलादेशसाठी खलनायक ठरला. पहिल्या डावात फलंदाजीत शतक झळकावून छाप पाडल्यानंतर अश्विनने दुसऱ्या डावात फिरकीच्या तालावर बांगला टायगर्सला नाचवत ८८ धावांत ६ मोहरे टिपले.
अश्विनपुढे बांगलादेश पुन्हा ढेर! पहिल्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय, दुसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा
एक्स
Published on

चेन्नई : अनुभवी रविचंद्रन अश्विन पुन्हा एकदा बांगलादेशसाठी खलनायक ठरला. पहिल्या डावात फलंदाजीत शतक झळकावून छाप पाडल्यानंतर अश्विनने दुसऱ्या डावात फिरकीच्या तालावर बांगला टायगर्सला नाचवत ८८ धावांत ६ मोहरे टिपले. त्यामुळे भारताने पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या बांगलादेशचा रविवारी सकाळी म्हणजे चौथ्या दिवशीच २८० धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने २ लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

चेन्नईतील एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या कसोटीत भारताने दिलेल्या ५१५ धावांच्या डोंगराइतक्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव ६२.१ षटकांत २३४ धावांत आटोपला. ६ बळी घेणाऱ्या अश्विनला डावखुऱ्या रवींद्र जडेजाने ३, तर जसप्रीत बुमराने १ बळी घेत चांगली साथ दिली. भारताचा हा बांगलादेशविरुद्ध १२वा कसोटी विजय ठरला. तर बांगलादेशची मात्र अद्याप पहिल्या विजयाची प्रतीक्षा कायम आहे. ११३ धावांच्या शतकी खेळीसह लढतीत ६ बळी टिपणाऱ्या अश्विनलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. उभय संघांतील दुसरी कसोटी २७ सप्टेंबरपासून कानपूर येथे खेळवण्यात येईल.

शनिवारच्या ४ बाद १५८ धावांवरून पुढे खेळताना बांगलादेशला विजयासाठी ३५७ धावांची गरज होती. शाकिब अल हसन आणि कर्णधार नजमूल होसेन शांतो यांनी चौथ्या दिवसाचा पहिला अर्धा तास नेटाने खेळून काढला. त्यामुळे भारताला विजयासाठी संघर्ष करावा लागणार, असे वाटले. मात्र कर्णधार रोहित शर्माने अश्विनच्या हाती चेंडू सोपवला व त्याने पहिल्याच षटकात शाकिबचा (२५) अडसर दूर केला. शाकिब व शांतो यांनी पाचव्या विकेटसाठी ४८ धावांची भर घातली.

५ बाद १९४ वरून मग बांगलादेशचा संघ सावरूच शकला नाही. जडेजाने लिटन दासला (१) बाद केले. तर अश्विनने मेहदी हसन मिराज (८) व तस्किन अहमदला (५) जाळ्यात अडकवून कारकीर्दीत ३७व्यांदा डावात पाच बळी मिळवण्याची किमया साधली. जडेजाने शांतोला बाद करून बांगलादेशचा पराभव पक्का केला. शांतोने ८ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावांची झुंज दिली. मग जडेजानेच ६३व्या षटकातील पहिल्या चेंडूवर हसन महमूदचा (७) त्रिफळा उडवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

- अश्विनने कसोटी कारकीर्दीत ३७व्यांदा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी मिळवण्याची कामगिरी केली. याबरोबरच शेन वॉर्नच्या विक्रमाची बरोबरी केली. कसोटीत सर्वाधिक ५ बळी श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने (६७ वेळा) मिळवले आहेत.

- भारताचा हा ५८० कसोटी सामन्यांतील १७९वा विजय ठरला. १९३२पासून क्रिकेट खेळण्यास प्रारंभ करणाऱ्या भारताच्या कसोटी विजयाची संख्या (१७९) प्रथमच पराभवापेक्षा (१७८) अधिक आहे. उर्वरित २२२ कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत, तर १ लढत टाय झाली आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा सारखाच संघ

बांगलादेशविरुद्ध २७ तारखेपासून कानपूरला रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताने संघात कोणताही बदल केलेला नाही. पहिल्या कसोटीसाठीचे खेळाडूच कायम राखण्यात आले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशातच न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामने खेळणार आहे. त्या मालिकेसाठी काही प्रमुख खेळाडूंना आलटून पालटून विश्रांती देता येऊ शकते.

संक्षिप्त धावफलक

-भारत (पहिला डाव) : ३७६

-बांगलादेश (पहिला डाव) : १४९

-भारत (दुसरा डाव) : ४ बाद २८७ (डाव घोषित)

-बांगलादेश (दुसरा डाव) : ६२.१ षटकांत सर्व बाद २३४

(नजमूल होसेन शांतो ८२, शदमन इस्लाम ३५;

रविचंद्रन अश्विन ६/८८, रवींद्र जडेजा ३/५८)

सामनावीर : रविचंद्रन अश्विन

logo
marathi.freepressjournal.in