अक्षरची अष्टपैलू चमक; भारताचा विजयारंभ; पहिल्या सामन्यात ६ गडी राखून वर्चस्व; आज दुसरी लढत

कर्णधार शुभमन गिलची ८० धावांची दिमाखदार खेळी आणि अक्षर पटेलने (नाबाद ५७ धावा आणि ४ बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ६ गडी व २८ चेंडू राखून पराभव केला. याबरोबरच भारताने ३ लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना गुरुवारी कार्डिफ येथे खेळवण्यात येईल.
अक्षरची अष्टपैलू चमक; भारताचा विजयारंभ; पहिल्या सामन्यात ६ गडी राखून वर्चस्व; आज दुसरी लढत
X | BCCI
Published on

बर्मिंगहॅम : कर्णधार शुभमन गिलची ८० धावांची दिमाखदार खेळी आणि अक्षर पटेलने (नाबाद ५७ धावा आणि ४ बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा ६ गडी व २८ चेंडू राखून पराभव केला. याबरोबरच भारताने ३ लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना गुरुवारी कार्डिफ येथे खेळवण्यात येईल.

यूके दौऱ्यातील भारताचा हा पहिलाच विजय ठरला. यापूर्वी आयर्लंडविरुद्ध भारताने ०-२ अशी टी-२० मालिका गमावली, तर इंग्लंडविरुद्धही त्यांच्या पदरी ०-४ अशी निराशा पडली. टी-२० मालिकेतील सुमार कामगिरीमुळे टीका सहन करणाऱ्या अक्षरने ६२ धावांत ४ विकेट्स घेत आणि नंतर नाबाद ५७ धावा करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन मैदानावर भारताने इंग्लंडचे २५९ धावांचे आव्हान ४५.२ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले.

भारताने २५९ धावांचा पाठलाग करताना एका बाजूने रोहित शर्मा अवघ्या ११ धावांवर आणि विराट कोहली ५ धावांवर बाद झाल्याने भारताची २ बाद ४८ अशी स्थिती झाली होती. मात्र, कर्णधार गिलने श्रेयस अय्यरच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी रचत डाव सावरला. अय्यरने ३५ धावांचे योगदान दिले. गिलला डावादरम्यान पायाच्या स्नायूंच्या त्रासाचा सामना करावा लागला, ज्यामुळे १०व्या शतकाच्या जवळ असताना त्याला ८० धावांवर ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन मैदान सोडावे लागले. गिल बाद झाल्यानंतर भारताची ४ बाद १६० अशी स्थिती झाली होती. मात्र, सुंदर आणि अक्षर यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद १०२ धावांची भागीदारी करत संघाला ४५.२ षटकांत विजय मिळवून दिला. सुंदरने ६३ चेंडूंत नाबाद ५२ धावा केल्या, तर अक्षरने ५२ चेंडूंत नाबाद ५७ धावांची खेळी केली. आता गुरुवारी भारताला विजयी आघाडी घेण्याची संधी आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in