अहमदाबादमध्ये क्रांती, इतिहासाची पुनरावृत्ती! भारतीय संघाचा सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर कब्जा; बुमरा, सॅमसन, अभिषेक, किशन विजयाचे शिल्पकार

Ind vs NZ, ICC T20 WC26 : टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडताना सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक उंचावला. मुख्य म्हणजे भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला.
अहमदाबादमध्ये क्रांती, इतिहासाची पुनरावृत्ती! भारतीय संघाचा सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर कब्जा; बुमरा, सॅमसन, अभिषेक, किशन विजयाचे शिल्पकार
Published on

अहमदाबाद : अगर किसी चीज को दिलसे चाहो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है... एका लोकप्रिय हिंदी चित्रपटातील हा डायलॉग भारतीय संघासाठी रविवारी चपखल बसला. ८६ हजारांहून दर्दी क्रीडाप्रेमींच्या साक्षीने रंगलेल्या टी-२० विश्वचषकाच्या महाअंतिम मुकाबल्यात अखेर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय शिलेदारांनी बाजी मारली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाने क्रांती घडवतानाच इतिहासाची पुनरावृत्ती केली.

टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडताना सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक उंचावला. मुख्य म्हणजे भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. त्याचबरोबर भारताने आयसीसी जेतेपदाची हॅटट्रिक साध्य केली. भारताने २०२४मध्ये टी-२० विश्वचषक, २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब पटकावला होता. मोदी स्टेडियमवर २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम फेरीत भारताला पराभव पत्करावा लागला होता. तसेच या स्पर्धेतील सुपर-आठ सामन्यातही भारत येथेच पराभूत झाला होता. मात्र रविवारी अंतिम सामन्यात हे स्टेडियम भारतासाठी लकी ठरले. मुख्य म्हणजे भारताने न्यूझीलंडला आजवर टी-२० विश्वचषकात एकदाही नमवलेले नव्हते. मात्र यावेळी तीसुद्धा मालिका भारताने खंडित केली.

तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा (१५ धावांत ४ बळी), संजू सॅमसन (४६ चेंडूंत ८९ धावा), अभिषेक शर्मा (२१ चेंडूंत ५२), इशान किशन (२५ चेंडूंत ५४) व डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल (२७ धावांत ३ बळी) या पंचकामुळे भारताने एकंदर पंचतारांकित विश्वविजयाला गवसणी घातली. कारण भारताचा हा एकंदर पाचवा विश्वचषक आहे. भारताने दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक (१९८३, २०११), तर ३ वेळा टी-२० विश्वचषक (२००७, २०२४, २०२६) आपल्या नावे केला आहे.

या स्पर्धेत साखळी फेरीसाठी प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले होते. मग सुपर-आठ फेरीत दोन गट तयार करण्यात आले. पहिल्या गटातून दक्षिण आफ्रिका व भारत यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर दुसऱ्या गटातून इंग्लंड व न्यूझीलंड यांनी आगेकूच केली होती. बुधवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. मग भारताने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडला नमवून एकंदर चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती.

भारताने साखळी फेरीत सलग चार सामने जिंकताना अनुक्रमे अमेरिका, पाकिस्तान, नेदरलँड्स व नामिबिया या संघांना नमवले. मग सुपर-आठ फेरीत भारताला पहिल्याच लढतीत आफ्रिकेकडून दारुण पराभव पत्करावा लागला. मात्र त्यातून सावरत भारताने झिम्बाब्वे व वेस्ट इंडिज यांना पराभूत केले. आता इंग्लंडला नमवून भारताने एकंदर चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. भारताने २००७ व २०२४मध्ये टी-२० विश्वचषक उंचावलेला होता. तर २०१४मध्ये त्यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.

हे विक्रम महत्त्वाचे!

  • भारत हा मायदेशात विश्वचषक जिंकणारा पहिलाच देश ठरला. तसेच एकंदर तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा ही भारत पहिला संघ ठरला.

  • सॅमसनने या विश्वचषकात ३२१ धावा केल्या. भारताकडून एखाद्या टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने स्वत:च्या नावे केला. विराटने २०१६च्या विश्वचषकात ३१९ धावा केल्या होत्या.

  • बुमराने या विश्वचषकात सर्वाधिक १४ बळी मिळवले. स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत त्याने वरुण चक्रवर्तीसह संयुक्तपणे अग्रस्थान काबिज केले.

  • भारताने एकंदर पाचव्यांदा विश्वचषक जिंकला. यामध्ये दोन एकदिवसीय व तीन टी-२० विश्वचषकाचा समावेश आहे.

  • अहमदाबाद येथे भारताने गेल्या ४ वर्षांत प्रथमच एखाद्या आयसीसी स्पर्धाचा सामना जिंकला. २०२३च्या विश्वचषकातील अंतिम फेरीत व यंदाच्या विश्वचषकातील सुपर-आठ फेरीत भारताला पराभव पत्करावा लागला होता.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ५ बाद २५५ (संजू सॅमसन ८९, इशान किशन ५४, अभिषेक शर्मा ५२; जेम्स नीशाम ३/४६) विजयी

न्यूझीलंड : १९ षटकांत सर्व बाद १५९ (टिम सेईफर्ट ५२, मिचेल सँटनर ४३; जसप्रीत बुमरा ४/१५, अक्षर पटेल ३/१५)

सामनावीर : जसप्रीत बुमरा

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : संजू सॅमसन

logo
marathi.freepressjournal.in