विशाखापट्टणम : यशस्वी जैस्वालच्या पहिल्यावहिल्या शतकी खेळीच्या जोरावर तसेच रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी फलंदाजांच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्स आणि ६१ चेंडू शिल्लक राखून धुव्वा उडवला. यशस्वीच्या झंझावातामुळे भारताने तीन वनडे सामन्यांची ही मालिकात २-१ अशी जिंकली.
दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेले २७१ धावांचे आव्हान भारताने फक्त रोहित शर्माची विकेट गमावून ३९.५ षटकांत सहजपणे पार केले. यशस्वी जैस्वालने १२१ चेंडूंत १२ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी करत नाबाद ११६ धावांसह भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. रोहित शर्माने ७३ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ७५ धावा फटकावत त्याला चांगली साथ दिली. विराट कोहलीने ४५ चेंडूंत ६ चौकार आणि ३ षटकारांनिशी नाबाद ६५ धावा करत भारताच्या विजयात योगदान दिले.
आफ्रिकेला २७० धावांवर गुंडाळल्यानंतर हे लक्ष्य गाठताना यशस्वी आणि रोहित शर्मा यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला यशस्वी होऊ दिले नाही. त्यांनी पाहुण्यांच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत २५ षटकांत भारताला दीडशे धावांचा पल्ला गाठून दिला. या दोघांनी सलामीसाठी १५५ धावा रचत भारताचा विजय सुकर करून दिली. केशव महाराजच्या गोलंदाजीवर रोहित ब्रीट्झके याच्याकडे झेल देत माघारी परतला. आफ्रिकेला मिळालेले हे एकमेव यश. त्यानंतर यशस्वी आणि कोहली यांनी पुढचे सोपस्कार पार पाडले. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा यांच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर भारताने तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला २७० धावांवर रोखले. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मैदानावर दव असल्यामुळे भारतीय गोलंदाजांना त्यापासून लाभ उठवता आला. अर्शदीप सिंगने रायन रिकेलटनला (०) माघारी पाठवत भारताचा नाणेफेकीचा निर्णय सार्थ ठरवला. त्यानंतर मात्र क्विंटन डीकॉक आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी भारतीय गोलंदाजांची पिसे काढली. डीकॉकने भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करत सातवे शतक साजरे केले. त्याने ४२ चेंडूंत आधी अर्धशतक पटकावले आणि ७९ चेंडूंत शतकाला गवसणी घातली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
रवींद्र जडेजाच्या हातात चेंडू सोपवल्यानंतर त्याने बावुमाला विराट कोहलीकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. बावुमाने ६७ चेंडूंत ५ चौकारांसह ४८ धावा फटकावल्या. त्यानंतर डीकॉकने मॅथ्यू ब्रीट्झके याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावा जोडल्या. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ २ बाद १६८ अशा भक्कम स्थितीत होता. मात्र प्रसिध कृष्णाने ब्रीट्झके (२४), आयडेन मार्करन (१) आणि डीकॉक यांना माघारी पाठवत आफ्रिकेची अवस्था ५ बाद १९९ अशी केली. डीकॉकने ८९ चेंडूंत ८ चौकार आणि ६ षटकारांसह १०६ धावा फटकावल्या. तीन षटकांत तीन फलंदाज माघारी परतल्यामुळे आफ्रिकेचा संघ काहीसा अडचणीत सापडला. त्यानंतर फिरकीपटू कुलदीप यादवने तळाचे चार विकेट्स मिळवत पाहुण्यांना भलीमोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. भारताकडून कृष्णाने चार, तर कुलदीपनेही चार बळी मिळवले.
डीकॉकची वनडेत भारताविरुद्ध सर्वाधिक शतके
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक शतके पटकावण्याचा मान दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकने पटकावला. विशाखापट्टणम वनडेत डीकॉकने भारताविरुद्ध सातवे शतक साजरे केले. यापूर्वी डीकॉकने भारताविरुद्ध २३ वनडेत ६ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली होती. त्याने सात शतके झळकावणाऱ्या श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकले. त्याखालोखाल दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा (प्रत्येकी ६ शतके) यांचा क्रमांक लागतो.