टी-२० सामन्यांत भारताने मिळवला दक्षिण आफ्रिकेवर विजय

भारतीय गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक धक्के दिल्याने पहिल्या १० षटकात आफ्रिकेची अवस्था ४ बाद ६० धावा अशी झाली होती
टी-२०  सामन्यांत भारताने मिळवला दक्षिण आफ्रिकेवर विजय

पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतीत तिसऱ्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ४८ धावांनी विजय मिळविला. विजयासाठी १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ १९.१ षटकांत १३१ धावांतच गारद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावण्यात अपयश आले. भारताच्या हर्षल पटेलने २५ धावांच्या मोबदल्यात चार बळी टिपले. सामनावीर युझवेंद्र चहलने २० धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. भारतीय गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक धक्के दिल्याने पहिल्या १० षटकात आफ्रिकेची अवस्था ४ बाद ६० धावा अशी झाली होती.

त्याआधी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने दमदार सुरूवात केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांनी सहाव्या षटकातच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. आक्रमक पवित्रा घेत त्यात ऋतुराजने मोठा वाटा उचलला. ऋतुराजने अर्धशतकी खेळी (३५ चेंडूत ५७ धावा) करत भारताला दहाव्या षटकात ९५ धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र त्यानंतर केशव महाराजने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत ही जोडी फोडली. इशान किशनने आक्रमक फलंदाजी करत ३१ चेंडूत अर्धशतक झळकाविले. भारताचे शतक अकराव्या षटकात झळकले. मात्र तबरेज शमसीने श्रेयस अय्यरला १४ धावांवर बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. त्यांनतर प्रेटोरियसने इशान किशनला (३५ चेंडूत ५४ धावा) बाद करत भारताला तिसरा धक्का दिला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in