भारताचा विजयी 'दांडिया'! दुसऱ्या कसोटीतही बांगलादेशचा धुव्वा उडवत दिला 'व्हाइटवॉश', मायदेशातील मक्तेदारी कायम

नवरात्रीसाठी दोन दिवस शिल्लक असतानाच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने कानपूरमध्ये विजयी दांडिया केला.
भारताचा विजयी 'दांडिया'! दुसऱ्या कसोटीतही बांगलादेशचा धुव्वा उडवत दिला 'व्हाइटवॉश', मायदेशातील मक्तेदारी कायम
Published on

कानपूर : नवरात्रीसाठी दोन दिवस शिल्लक असतानाच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने कानपूरमध्ये विजयी दांडिया केला. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे जवळपास अडीच दिवसांचा खेळ वाया जाऊनही भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. यासह भारताने मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले. जसप्रीत बुमरा, रवींद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन हे गोलंदाजीचे त्रिकुट भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

मंगळवारी पाचव्या दिवशी बांगलादेशचा दुसरा डाव ४७ षटकांत १४६ धावांत गुंडाळल्यावर भारतापुढे विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. यशस्वीने ८ चौकार व १ षटकारासह सलग दुसरे अर्धशतक झळकावून भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. त्याला विराट कोहलीची (३७ चेंडूंत नाबाद २९) चांगली साथ लाभली. त्यामुळे भारताने १७.२ षटकांतच ३ फलंदाजांच्या मोबदल्यात विजय साकारला. मुख्य म्हणजे दुसऱ्या व तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे पूर्णपणे वाया जाऊनही टी-२० शैलीत केलेली फटकेबाजी आणि गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीमुळे भारताने हा अविश्वसनीय विजय मिळवला. दोन्ही डावांत अर्धशतक साकारणारा यशस्वी सामनावीर, तर मालिकेत ११४ धावा करण्यासह ११ बळी मिळवणारा अनुभवी रविचंद्रन अश्विन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. यासोबतच रोहित शर्माच्या शिलेदारांनी मायदेशातील कसोटी मालिकांमध्ये भारताचे वर्चस्व अबाधित राखले.

उभय संघांतील दोन लढतींच्या मालिकेत भारताने पहिली लढत जिंकून १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या कसोटीत भारताला विजय मिळवणे जवळपास अशक्य असल्याचे सर्व चाहते म्हणत होते. पहिल्या दिवशी फक्त ३५ षटकांचा खेळ झाला. त्यानंतर थेट चौथ्या दिवशी खेळ सुरू झाला. सोमवारी बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांत गुंडाळल्यावर भारताने टी-२० शैलीत फटकेबाजी करताना ३५ षटकांत २८५ धावा करून ५२ धावांची निर्णायक आघाडी मिळवली. मग चौथ्या दिवसअखेर बांगलादेशची २ बाद २६ अशी स्थिती होती. त्यामुळे पाचव्या दिवशी उर्वरित ८ बळी ल‌वकरात लवकर मिळवण्यासह लक्ष्य साध्य करण्याचे भारतापुढे आव्हान होते.

२ बाद २६ धावांवरून पाचव्या दिवसाला सुरुवात करताना बांगलादेशने मोमिनूल हकला (२) लवकर गमावले. अश्विनने त्याला बाद केले. मात्र चौथ्या विकेटसाठी भारताला तासभर संघर्ष करावा लागला. कर्णधार नजमूल होसेन शांतो व शदमन इस्लाम यांनी चौथ्या विकेटसाठी १४ षटकांत ५५ धावांची भागीदारी रचली. अखेर २८व्या षटकात रोहितने प्रथमच रवींद्र जडेजाच्या हाती चेंडू सोपवला. व त्याने दुसऱ्याच चेंडूवर शांतोचा (१९) त्रिफळा उडवला. शांतो रिव्हर्स स्वीप खेळताना बाद झाला. तेथून सामन्याला कलाटणी मिळाली.

पुढच्याच षटकात कारकीर्दीतील चौथे अर्धशतक साकारणाऱ्या शदमनला (५०) आकाश दीपने जाळ्यात अडकवले. जडेजाने मग एकाच षटकात लिटन दास (१) व शाकिब अल हसन (०) यांचा अडसर दूर करून भारताच्या विजयाचा पाया रचला. ३ बाद ९१ वरून बांगलादेशची ७ बाद ९४ अशी घसरगुंडी उडाली. मेहदी हसन (९) व मुशफिकूर रहिम (३७) यांनी काहीसा प्रतिकार केला. मात्र बुमराने प्रथम मेहदी, मग तैजुल इस्लाम आणि अखेरीस रहिमला बाद करून बांगलादेशचा डाव ४७ षटकांत १४६ धावांवर संपुष्टात आणला. यावेळीच उपाहाराची विश्रांतीही घेण्यात आली.

त्यानंतर भारतासमोर उर्वरित दोन सत्रांत ९५ धावांचे लक्ष्य होते. रोहित (८) व शुभमन गिल (६) यांना मेहदीने स्वस्तात टिपले. मात्र २ बाद ३४ वरून यशस्वी व विराट यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली. यशस्वीने कसोटी कारकीर्दीतील सातवे अर्धशतक साकारले. मात्र जिंकण्यासाठी ४ धावा आवश्यक असताना मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. अखेरीस डावखुऱ्या ऋषभ पंतने तैजुलच्या गोलंदाजीवर चौकार लगावून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विराट २९ धावांवर नाबाद राहिला.

-भारताचा हा कसोटी क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान विजय ठरला. भारताने या कसोटीत दोन्ही डावांत मिळून फक्त ३१२ चेंडू फलंदाजी केली. जानेवारी २०२४मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २८१ चेंडू फलंदाजी करून भारताने कसोटी जिंकली होती.

-भारताने बांगलादेशविरुद्ध आजवर एकही कसोटी गमावलेली नाही. उभय संघांतील १५ पैकी १३ लढती भारताने जिंकल्या आहेत, तर २ सामने अनिर्णित राहिले आहेत.

-भारताचा हा मायदेशातील (भारतातील) सलग १८वा मालिका विजय ठरला. गेल्या १२ वर्षांत भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. यापूर्वी इंग्लंडने २०१२मध्ये भारताला २-१ असे नमवले होते.

-भारताने २०२२ पासून मायदेशात अथवा विदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. दक्षिण आफ्रिकेने २०२१-२२मध्ये भारताला अखेरचे २-१ असे नमवले होते. त्यानंतर भारताने ७ पैकी ६ मालिका जिंकल्या, तर १ मालिका बरोबरीत सुटली.

-भारताने दोन्ही डावांत मिळून फक्त ३१२ चेंडू फलंदाजी केली. भारताचा हा कसोटीमधील दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान विजय ठरला. जानेवारी २०२४मध्ये आफ्रिकेविरुद्ध भारताने २८१ चेंडू फलंदाजी करून विजय मिळवला होता. इंग्लंड (२७६ चेंडू वि. वेस्ट इंडिज) या यादीत अग्रस्थानी आहे.

-यशस्वी हा एका कसोटीच्या दोन्ही डावांत ५०हून कमी चेंडूंत अर्धशतक साकारणारा पहिलाच भारतीय ठरला. यापूर्वी विश्वात मात्र ८ फलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे.

-अश्विनने कसोटीत तब्बल ११व्यांदा मालिकावीर पुरस्कार पटकावला. कसोटीत सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत त्याने आता श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनसह संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले.

संक्षिप्त धावफलक

-बांगलादेश (पहिला डाव) : सर्व बाद २३३

-भारत (पहिला डाव) : ९ बाद २८५ घोषित

-बांगलादेश (दुसरा डाव) : ४७ षटकांत सर्व बाद १४६ (शदमन इस्लाम ५०, मुशफिकूर रहिम ३७; जसप्रीत बुमरा ३/१७, रवींद्र जडेजा ३/३४)

-भारत (दुसरा डाव) : १७.२ षटकांत ३ बाद ९८ (यशस्वी जैस्वाल ५१, विराट कोहली नाबाद २९; मेहदी हसन २/४४)

-सामनावीर : यशस्वी जैस्वाल

-मालिकावीर : रविचंद्रन अश्विन

logo
marathi.freepressjournal.in