सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा : भूतानला २-१ असे नमवून भारताचा अंतिम फेरीत प्रवेश

भूतानने उत्तरार्धात जोरदार झुंज दिली, मात्र भारताने संयम आणि अनुभवाच्या जोरावर २-१ असा विजय मिळवत सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयामुळे भारताचे विक्रमी दहाव्या विजेतेपदाचे स्वप्न कायम आहे.
सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा : भूतानला २-१ असे नमवून भारताचा अंतिम फेरीत प्रवेश
सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा : भूतानला २-१ असे नमवून भारताचा अंतिम फेरीत प्रवेश X - Kol_Football
Published on: 

ढाका : भूतानने उत्तरार्धात जोरदार झुंज दिली, मात्र भारताने संयम आणि अनुभवाच्या जोरावर २-१ असा विजय मिळवत सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या विजयामुळे भारताचे विक्रमी दहाव्या विजेतेपदाचे स्वप्न कायम आहे.

भारताकडून विष्णू याने नवव्या मिनिटाला, तर कर्णधार छिंगलेन्सना सिंग कोनशाम याने २७व्या मिनिटाला गोल केला. भूतानच्या किंझांग ताशी तोबदेन याने ४८व्या मिनिटाला गोल करत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र, उर्वरित वेळेत भारताने आघाडी कायम राखली. गतविजेत्या भारताचा अंतिम सामना १७ नोव्हेंबरला बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्याशी होणार आहे.

विष्णूच्या गोलमुळे आघाडी

स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच व्हिडिओ असिस्टंट रेफरी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या तंत्रज्ञानाचा सामन्याच्या निकालावर महत्त्वपूर्ण परिणाम झाला. नवव्या मिनिटाला भारताने अप्रतिम चालीवर पहिला गोल केला. लांबून आलेला चेंडू डाव्या बाजूला विष्णूकडे आला. त्याने उत्कृष्ट नियंत्रण मिळवत बचावपटूला आणि गोलरक्षक झांगपोला चकवत चेंडू गोलजाळ्यात धाडला. मग २८व्या मिनिटाला किपगेनने उजव्या बाजूने मारलेल्या कॉर्नरवर भूतानच्या बचावपटूंना चेंडू योग्य प्रकारे दूर करता आला नाही. समोर आलेल्या चेंडूवर छिंगलेन्सनाने जोरदार फटका मारत चेंडू गोलजाळ्यात पाठवला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)